Mumbai News : वाडा तालुक्यात मंगळवारी (ता. २९) सायंकाळी अचानक जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. कापलेल्या भातपिकाचे पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरीवर्ग धडपड करीत होता. सुमारे दोन तास मुसळधार पाऊस पडल्याने भातशेतात पाणीच पाणी साचले होते. या पावसामुळे पिकाचे पुन्हा मोठे नुकसान झाले.
गेल्या काही दिवसांपासून वाडा तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले असून भातपिकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. अनेक कृत्रिम आणि नैसर्गिक संकटांचा सामना करीत मोठ्या धैर्याने बळीराजा शेती करतो. प्रसंगी कर्ज काढून शेती करणाऱ्यांसमोर या नैसर्गिक संकटाचा डोंगर उभा राहिल्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे, संसाराचा गाढा हाकायचा कसा, असा प्रश्न आज तालुक्यातील शेतकऱ्यांना सतावत आहे.
सततच्या नासवणी पडणाऱ्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाल्याने तातडीने ओळा दुष्काळ जाहीर करून शासनस्तरावरून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे. जीपीएस मॅप कॅमेऱ्याद्वारे जिओटॅग फोटो प्रिंट देणे, ही बंधनकारक असलेली अट काढून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्यात यावी, तसेच बळीराजाला जाचक अटी घालून हैराण करू नये, अशी मागणी तालुक्यातील शेतकरीवर्ग करत आहे.
अधिकारीवर्ग गायब
शेतकऱ्यांच्या झालेल्या भातपीक नुकसानीचे शासन स्तरावरून प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे होत नाहीत कृषी आणि महसूल विभागातील अधिकारीच निवडणुकीच्या कामामध्ये व्यग्र असल्याने शेतकर्यांत संताप व्यक्त होत आहे.
अपार कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर अनेक संकटांवर मात करीत भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे यावर्षी पावसामुळे शंभर टक्के नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना सरकारने कुठल्याही अटी-शर्ती न ठेवता तातडीने सरसकट भरपाई द्यावी.- प्रभाकर पाटील, शेतकरी, कोंढले
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.