Raju Shetti Loksabha 2024 : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व शेतकरी चळवळीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा व विचाराचा वारसा तळागाळात पोहोचविण्यासाठी मी लोकसभेची निवडणूक लढवित असून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारास व कार्यास तडा जाईल असे एकही काम माझ्या हातून घडले नाही. त्या नैतिकतीच्या जोरावर आज चौथ्यांदा लोकसभेच्या निवडणूकीचा प्रचार शुभारंभ क्रातिंसिंह नाना पाटील यांना अभिवादन करून करत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
यावेळा बोलताना राजू शेट्टी म्हणाले की देशामध्ये लोकसभेचे बिगुल वाजले आहे. गल्लीतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न दिल्लीच्या संसदेत प्रभावीपणे मांडून त्यांना वाचा फोडली पाहिजे. शेतकरी, कामगार, छोटे मोठे उद्योजक, व्यापारी यांच्यासह सर्वच घटकातील लोक सरकारच्या धोरणावर असमाधानी आहेत. विद्यमान खासदार हे प्रश्न मांडण्यासाठी कमी पडले असून हजारो कोटींची बोगस कामे दाखवून जनतेची दिशाभूल करत आहेत.
पाच वर्षात अज्ञात वासात गेलेले धैर्यशील माने सध्या स्वत:च कर्तृत्व नसल्याने मोदींच्या जीवावर मते मागत आहेत. त्याबरोबरच महाविकास आघाडीच्या उमेदवाराची सुध्दा तीच अवस्था असून १० वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात ते कधीही विधानसभेत शेतकरी, कामगार, कष्टकरी लोकांचे प्रश्न मांडले असल्याचे ऐकिवात नाही. मतदारसंघातील विकासकामांना खो घालण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळेच त्यांचा विधानसभेला पराभव झाले असल्याची टिका राजू शेट्टी यांनी केली.
२००९ प्रमाणे सामान्य जनतेने माझी निवडणूक हातात घेतली असून प्रचाराची यंत्रणा गतिमान केलेली आहे. लोकांनी लोकवर्गणी गोळा करून एक व्होट व एक नोट प्रमाणे देशामध्ये लोकशाहीचे बळकटीकरणाचा आदर्श पुन्हा एकदा हातकंणगले लोकसभा मतदारसंघातील जनता घडवून आणत आहे.
महागाई, बेरोजगारी, शेतीमालाचे पडलेले दर, औद्योगिक क्षेत्रात आलेली मंदी व त्यामुळे झालेले नुकसान, शिक्षणाचे झालेले बाजारीकरण, यामुळे जनता मेटाकुटीस आलेली आहे. सामान्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी स्वच्छ व प्रामाणिक चेहऱ्याची आवश्यकता असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून नारळ फोडून प्रचार शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास वाळवा तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान प्रा. डॅा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, ॲड. एस यु सनदे, सुर्यभान जाधव, पोपट मोरे, संदीप राजोबा, डॅा. श्रीवर्धन पाटील, भागवत जाधव यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.