
Rajma Crop Sowing : राजमा हे पीक घेवडा, श्रावणी घेवडा, फरसबी अशा वेगवेगळ्या नावांनीही ओळखले जाते. याचे हिरवे कोवळे दाणे, सोललेल्या शेंगांची भाजी आणि वाळलेल्या दाण्यांच्या भाजीलाहा आहारामध्ये पसंती दिली जाते. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण २२ टक्के असून, यासोबतच जीवनसत्त्वे व खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.
या पिकाचा कालावधी अत्यंत कमी (७०-८० दिवस) असून, वर्षभर या पिकाची लागवड करणे शक्य आहे. परिणामी, या पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. ईशान्य भारतात सिक्कीम, मेघालय, आसाम या राज्यांत शेतासोबतच परसबागेतही राजमा लागवड केली जाते. त्यामुळे रोजच्या भाज्यांसाठी हिरव्या शेंगाची उपलब्धता होते. आपल्या राज्यामध्ये प्रामुख्याने राजमा लागवड ही वाळलेल्या दाण्यासाठी केली जाते.
पेरणीची वेळ -
जानेवारी ते फेब्रुवारी
प्रामुख्याने ऑगस्ट ते सप्टेंबरची सुरुवात. मात्र राज्यामध्ये खरिपाची पिके निघाल्यानंतर रब्बी पीक म्हणून ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्येही अनेक जण लागवड करतात.
एप्रिल ते जून
फक्त अति थंड आणि अति पावसात पीक पक्वतेची अवस्था येणार नाही याची काळजी घ्यावी.
लागवडीसाठी वाण :
फुले मुठा (एचपीआर-३५) व फुले वरुण (राहुरी कृषी विद्यापीठाचे वाण), जीआर-१ व व्हीएल -६३ (गुजरातचे वाण), पुसा पार्वती, पुसा कोमल, पुसा सुकोमल, वाळलेल्या दाण्यासाठीचे वाण आणि वेलवर्गीय पिकासाठी म्हणजेच हिरव्या दाण्यांच्या शेंगांसाठी ‘केंचुकी वंडर’ यासारखे वाण लागवडीसाठी वापरता येतात.
जमिनीची निवड :
सर्वच प्रकारच्या जमिनीत लागवड शक्य. मात्र जमिनीचा सामू ६.० ते ७.० च्या दरम्यान असावा. भारी काळ्या जमिनींमध्ये चांगले उत्पादन येते. पावसाचे अथवा ओलिताचे पाणी साचून राहणाऱ्या (म्हणजेच पाण्याचा योग्य प्रकारे निचरा न होणाऱ्या) जमिनीत या पिकाची लागवड करू नये. उत्पादनात मोठी घट संभवते.
मशागत ः
जमीन तयार करताना खोल नांगरट करूनच जमिनीच्या मशागतीची सुरुवात करावी. एकरी २ टन चांगले मुरलेले व कुजलेले शेणखत शेवटच्या वाहीपूर्वी द्यावे.
बियाणे प्रमाण :
प्रचलित पद्धतीने ३५ ते ४० किलो प्रति एकर.
सरी वरंबा पद्धत अथवा गादीवाफ्यावर जोडओळीत, तीन ओळींत अथवा चार ओळींत लागवडीनुसार बियाणे त्या त्या प्रमाणात कमी अधिक लागेल.
बीजप्रक्रिया : थायरम २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति किलो बियाणे.
पेरणीचे अंतर :
प्रचलित पद्धत व सुधारित पद्धत ः ३०-४५ सेंमी दोन ओळींतील अंतर व १०-१५ सेंमी दोन झाडांतील अंतर वेलीवर्गीय वाणासाठी ६०-७५ सेंमी × १५-२० सेंमी.
वेलवर्गीय वाणांसाठी : हिरव्या शेंगांसाठी राजम्याचे वेलवर्गीय वाण लावायचे असल्यास, झाडांचे वेल चढण्यासाठी बांबूचे मंडप तयार करावेत. सुतळीने बांधून वेल मंडपावर चढवावेत. आपला गादीवाफा किंवा वरंब्याच्या रुंदीप्रमाणे मंडपाची रचना असावी. यासाठी एकरी बियाणे सुमारे १२ ते १५ किलो लागेल.
ओलीत व्यवस्थापन :
राजमा कमी कालावधीचे पीक आहे. त्यात हंगामनिहाय पेरणीच्या वेळेनुसार ओलीत व्यवस्थापन करावे लागते. सर्वसाधारण परिस्थितीत शेत तयार झाल्यानंतर स्पिंकलरद्वारे संपूर्ण शेत भिजवून घ्यावे. त्यानंतर वाफसा आल्यावर लागवड अथवा पेरणी करावी. उगवण झाल्यावर रोपट्याची सुरुवातीची अवस्था असताना हलके ओलित द्यावे. स्प्रिंकलर चालू ठेवण्याचा कालावधी अर्ध्यापर्यंत कमी करावा. यानंतर कळ्या अवस्थेपूर्वी ओलीत करावे. त्यानंतर शेंगामध्ये कोवळे दाणे असताना ओलित करावे. ठिंबक प्रणालीद्वारे लागवड असल्यास जेव्हा - जेव्हा गरज भासेल त्या वेळी सिंचन द्यावे.
अन्नद्रव्यांची मात्रा :
पेरणीवेळी १२ किलो नत्र : ३२ किलो स्फुरद : १२ किलो पालाश (आवश्यक असल्यास) प्रति एकर (डीएपी सव्वा बॅग व म्युरेट ऑफ पोटॅश अर्धा बॅग)
पीक २० दिवसांचे असताना - १२ किलो नत्र प्रति एकर (२० किलो युरिया प्रति एकर)
तण व्यवस्थापन :
दाण्यासाठीच्या राजमा पिकाची फार जास्त व उंच वाढ होत नाही. यामुळे तण व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुरुवातीचे ३०-३५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यासाठी प्रचलित पद्धतीने लागवड असल्यास पीक १८ ते २० दिवसांचे असताना पहिली व २५-२८ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी लहान कोळप्याने करावी. ओळीतील तणांसाठी हाताने खुरपणी पहिल्या कोळपणीनंतर करून घ्यावी. वरंबा सरी पद्धत अथवा गादीवाफा पद्धतीमध्ये खुरपणीद्वारे तणनियंत्रण करावे.
पीक संरक्षण :
राजमा पिकावर प्रामुख्याने शेंगा पोखरून दाणे खाणारी अळी, मावा, शेंगांवरील भुंगा या किडींचा आणि मूळसड, पानांवरील व शेंगांवरील ठिपके, दहीया या रोगांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. त्यासाठी शिफारस आणि आवश्यकतेनुसार फवारणीचे नियोजन करावे.
काढणी व्यवस्थापन :
राजमा दाण्यांसाठीचे पीक ७० ते ८० दिवसांत पक्व होते. त्यामुळे पक्व झालेल्या शेंगा २ ते ३ वेळा मजुरांद्वारे तोडाव्या लागतात. प्रति एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळते. पारंपरिक टोकणीच्या तुलनेमध्ये वरंबा सरी अथवा गादीवाफा पद्धतीने टोकण केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
पेरणी पद्धती :
प्रचलित पद्धतीमध्ये शेतकरी सपाट जमिनीवर टोकण पद्धतीने राजमा लागवड करतात. त्यासाठी ओळीतील राखावयाच्या अंतरानुसार शेतात काकर (हलक्या सऱ्या) पाडून घेतात. त्यानंतर मजुरांच्या साह्याने दोन झाडांतील अंतर साधारणत: १०-१५ सेंमी ठेवून टोकण पद्धतीने पेरणी करतात. अलीकडे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी या प्रचलित पद्धतीऐवजी वरंबा सरी अथवा गादीवाफ्यावर लागवडीला शेतकरी प्राधान्य देऊ लागले आहेत.
वरंबा सरी पद्धतीने लागवड करताना मशागतीनंतर साधारणत: २.५ ते ३.० फुटांवर सऱ्या पाडून घ्याव्यात. वरंबाच्या दोन्ही बाजूंनी उताराच्या मध्यभागी दोन बियाण्यांतील अंतर १० ते १५ सेंमी ठेवून माणसांच्या साह्याने टोकण करावी.
गादीवाफ्यावर लागवड करावयाची झाल्यास, शेतात साधारणत: ३.५ ते ४ फुटांवर सऱ्या पाडून घ्याव्यात. गादीवाफ्याचा पृष्ठभाग सपाट करून घ्यावा. यावर दोन ओळींतील अंतर १ फूट ठेवून तीन किंवा चार ओळींत बियांची टोकण करावी. गादीवाफ्याची रुंदी कमी असल्यास जोडओळीमध्ये टोकण करता येते. त्यामध्ये ठिबक सिंचन पद्धती वापरणे सोपे होते. गादीवाफ्यावर लॅटरल पसरून घेतल्यानंतर तिच्या दोन्ही बाजूंनी ६-९ इंच अंतरावर बियाणे टोकता येते. गादीवाफ्याची रुंदी थोडी जास्त असल्यास तीन ओळींत सुद्धा टोकण करता येईल. यासाठी लॅटरलला टेकून मधली ओळ घ्यावी. लॅटरलच्या दोन्ही बाजूंना ९ इंचांवर एक - एक ओळ घ्यावी. म्हणजेच केवळ एका लॅटरलद्वारे तिन्ही ओळींना ओलीत शक्य होईल.
सिंचनासाठी स्प्रिंकलर प्रणाली वापरणार असल्यास वरंबा सरी किंवा गादीवाफ्यावर लागवड करावी. वरंब्याच्या रुंदीनुसार त्यावर चार ओळी घेता येऊ शकतात.
आंतरपीक - उसामध्ये हंगामानुसार आंतरपीक म्हणून राजमा पिकाचा समावेश करता येईल. उसाची सऱ्यांमध्ये लागवड झाल्यानंतर, वरंबाच्या पृष्ठभागावर, वरंबाच्या पृष्ठभागाच्या रुंदीनुसार जोडओळीत अथवा तीन ओळी राजमा पिकाच्या घेता येतील. यासाठी वरंब्याचा पृष्ठभाग मजुरांच्या साह्याने सपाट करून घ्यावा. ते लागवडीसाठी अधिक सोयीचे ठरते.
स्प्रिंकलर प्रणालीद्वारे सिंचन करताना व प्रचलित सपाट जमीनीवर लागवड करताना प्रत्येक सहा ओळींनंतर सातवी ओळ खाली ठेवल्यास, पीक मोठे झाल्यानंतर स्प्रिंकलरचे पाइप टाकण्यासाठी आणि फवारणीसाठी मोकळी जागा उपलब्ध होईल. खाली ठेवलेल्या सातव्या ओळींच्या ठिकाणी कोळप्याने सऱ्या पाडून घ्याव्यात. म्हणजे त्यात पावसाचे अथवा ओलिताचे अतिरिक्त पाणी जमा होईल. दोन्ही स्थितींमध्ये होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल.
जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७
(सहयोगी प्राध्यापक- कृषी विद्या, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.