डॉ. नागेश टेकाळे
Rainy Season Update : ‘यंदा पाऊसकाळ उत्तम’ ही बातमी १६ एप्रिलला ‘ॲग्रोवन’मध्ये वाचली आणि अचानक मला एका प्रवचनात महाराजांनी सर्व भक्तांना उद्देशून सांगितलेली बोधप्रद गोष्ट आठवली. या गोष्टीला अर्थातच त्यांनी सद्यपरिस्थितीस जोडले होते. एका वृद्ध शेतकऱ्याने आपल्या दहा एकर जमिनीची दोन मुलांत सारखी वाटणी केली. सोबत दहा लाख रुपयांचे संचित दोघांना अर्धे वाटून दिले. विहीर सामाईक ठेवली.
मोठ्याने हातात पैसे आल्याबरोबर जुन्या चांगल्या मोटर सायकली विकून टाकून दोन नवीन घेतल्या, एक स्वतःला व दुसरी मुलाला. शेतात पारंपरिक पिके होती, त्याऐवजी दोन एकर ऊस आणि उरलेल्या क्षेत्रावर कापूस, सोयाबीन घेतले. विहिरीमधील पाण्याचा उपसा करून पाटाने पाणी दिले, त्याचे पैसे जवळपास संपून गेले. विहिरीचे पाणी आटून गेले, दुष्काळी वातावरण, गारपीट, वादळवारा यामुळे त्याने कापूस वावरात तसाच सोडून दिला. सोयाबीन नुकसानीत गेले.
इकडे लहान भावाने वडिलांनी दिलेले पैसे बँकेत ठेव म्हणून ठेवले, वडिलांनी सांभाळलेली उडीद, मूग, तूर ही शेती नंतर रब्बीला गहू, ज्वारी करून सुखात राहिला. ऊस वाळल्यामुळे मोठ्या भावाला आता पाण्याची गरज नव्हती. म्हणून लहान भावाने त्या पाण्यावर मिरची, धणे आणि आल्याचे उत्पादन घेतले. जवळच्या नदीमधील गाळ आणून शेतात टाकू, असे त्याने मोठ्याला सांगितले तेव्हा तो म्हणाला,
‘‘असले उद्योग मी करत नाही, बांधावर शासन रासायनिक खत देत आहे तेच मी शेतात घालणार, तू गाळात जा!’’ लहान भावाने नदीमधला गाळ शेतात घालून त्यावर तीन लाख रुपयांचे आल्याचे उत्पन्न घेतले, त्यातले दोन लाख पुन्हा बँकेत ठेव म्हणून ठेवले. महाराज तब्बल अर्धा तास ती बोधकथा खुलवून सांगत होते. शेवटी त्यांनी प्रश्न विचारला? सद्यपरिस्थितीत कोण चांगला? मोठा की लहान? सगळ्यांच्या मुखातून उत्तर आले, ‘लहान भाऊ.’
१५ एप्रिलला बळीराजासह उन्हाच्या काहिलीमध्ये भाजून निघणाऱ्या समस्त भारतीयांसाठी हवामान विभागाने शुभवर्तमान वर्तविले. त्यापाठोपाठ इतरही संस्थांचे चांगल्या पावसाचे अंदाज आले. या वर्षी मॉन्सून वेळेवर येणार, तो सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त म्हणजे १०६ टक्के असणार. शेतकऱ्यांचा शत्रू ‘एल निनो’चा प्रभाव कुठेही जाणवणार नाही.
८ जूनपासून केरळमध्ये मॉन्सून राजा येणार आणि जून ते सप्टेंबर तो मुबलक बरसत राहणार. हा अंदाज पुढे सांगतो, की जून, जुलैमध्ये तो कमी असला तरी त्याची भरपाई तो ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये करेल. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेचा अंदाज ९६ ते १०४ टक्के पावसाचा आहे. देशामधील एकूण पावसापैकी ७० टक्के पाऊस मॉन्सूनमध्ये पडतो आणि शेतीसाठी हाच खरा अमृतवर्षाव असतो.
म्हणूनच या पावसाची ‘ठेव’ प्रत्येक शेतकऱ्याने करावयास हवी. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब शेतात मुरला पाहिजे याची काळजी आपण प्रत्येकानेच घेणे गरजेचे आहे. बांधावर वृक्ष असणे, शेतात सेंद्रिय कर्ब जास्त असणे, या दोन गोष्टी जमिनीमध्ये पावसाचे पाणी मुरण्यासाठी उत्तम समजल्या जातात. दुर्दैवाने आज आपल्याकडे या दोनही गोष्टींची कमतरता आहे.
बांधाच्या खालच्या बाजूस चर घेणे, त्यांची संख्या वाढवणे, जमिनीला उतार असेल तर उताराच्या बाजूला चर घेणे हे केव्हाही चांगले. पावसाळ्यात शक्यतो जास्त रासायनिक खते वापरू नयेत. ज्या मातीत जैवविविधता जास्त असते तेथे पाणी जास्त मुरते. मातीचे कण आणि उपयोगी जिवाणू हे पावसाचे पाणी धरून ठेवतात आणि याचाच फायदा रब्बीसाठी आपणास जास्त होतो. या वर्षी
पडणारा पाऊस आपण सर्वानीच एकत्र येऊन जमिनीत मुरवला पाहिजे. रिमझिम पाऊस शेतात मुरतो. मात्र मुसळधार पाऊस शेत वाहून नेतो. अशावेळी पावसाळ्यात शेतात पीक असले तरी जिथे मोकळी जागा आहे तेथे मल्चिंग जरूर करावे मात्र नंतर ते काढू नये.
शेतकऱ्यांनी खरिपामध्ये कडधान्ये म्हणजे द्विदल धान्यास प्राधान्य द्यावे, त्यांचा आंतरपीक म्हणून वापर करावा. मूग, उडीद, तूर, भुईमूग यांसारखी रासायनिक खते न खाणारी भारतीय वंशाची पिके पावसाचे पाणी शेतात मुरवून भूजल समृद्ध करतात. लागवडीखालील क्षेत्र जास्त असेल तर एका तुकड्यात तरी द्विदल गटामधील रांगते पीक घ्यावे. सोयाबीन, कापूस यास पर्याय नसेल तर बांधालगत तरी कडधान्य, भरडधान्यांच्या दोन-तीन सरी असाव्या.
विहिरीचे पुनर्भरण कसे होईल, ते पाहावे. कोरडी बोअरवेल असेल तर तिला मृत म्हणून न सोडता मृगाच्या पहिल्या पावसामध्येच जिवंत करता येते. प्रत्येक शेतकऱ्याने प्लॅस्टिक आच्छादित शेततळ्याबरोबर, आच्छादन नसलेले लहान का असेना पण एक शेततळे जरूर करावे. पावसाळी पाणी व्यवस्थापनात अशी शेततळी भूगर्भामधील जलसाठ्यास संजीवनी देतात.
बांधावरील सहा फूट अंतरावर ओळीने लावलेले सागवान वृक्ष म्हणजे शेतकऱ्याची वीस वर्षाची जमा ठेव आहे. हा वृक्ष उंच वाढत असल्यामुळे शेतावर त्याची सावली पडत नाही. त्याची पानगळ शेताला नत्र खत तर देतेच त्याचबरोबर जमीन भुसभुशीत करून पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत सुद्धा करते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधील अनेक शेतकऱ्यांनी या पद्धतीने मॉन्सून जल व्यवस्थापन करून विविध पिकांचे चांगले उत्पादन घेतले आहे.
पावसाच्या पाण्यावर सर्वांचाच अधिकार आहे पण सर्वांत जास्त अधिकार हा भूजलाचा आहे. पृथ्वीचे पाणी पुन्हा पृथ्वीला म्हणजे भूजलास परत जाणे आवश्यक आहे. अन्यथा, पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या सरळ समुद्रास जाऊन मिळतात, हे यातनादायक चित्र बदलणे गरजेचे आहे. जेमतेम १० ते १५ से.मी. पाऊस पडणारा इस्राईल देश याचा प्रत्येक थेंब वापरून अर्ध्या जगाला ताजा भाजीपाला, फळे, फुले पोहोचवतो आणि आपण ८५ से.मी. पाऊस असूनही आपल्या भूजलास तहानलेले ठेवतो.
भूजल कमी होणे हे वाढत्या उष्णतेचे आमंत्रण आहे. आपली जमीन सुपीक मातीच्या कणाने समृद्ध असेल तरच भूजल श्रीमंत होईल. रासायनिक खतांच्या भरमसाठ वापरामुळे शेतजमिनीमध्ये वालुका कण वाढू लागतात. जमीन तापू लागते. या उष्णतेची झळ भूगर्भामधील जलापर्यंत जाऊ शकते. ‘खोल खोल पाणी’, हे याचमुळे होते. म्हणूनच येणारा पावसाळा आपण सर्वांनी एक आव्हान म्हणून स्वीकारला पाहिजे.
‘‘माझे शेत मी वाहून जाऊ देणार नाही, सर्व पाणी शेतातच मुरवेन, मातीमधील सेंद्रिय कर्ब, जिवाणूंची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करेन, बांधावर सागवानसारख्या उपयुक्त वृक्षांची चारही बाजूने मजबूत फौज उभी करून आतल्या पिकांचे रक्षण करेन, कोरड्या बोअरवेलला पुन्हा पुनरुज्जीवित करेन, तहानलेल्या विहिरीस पुन्हा तिचे हक्काचे पाणी देईल.’’ मॉन्सूनला यापेक्षा वेगळे ते काय हवे. तो प्रेमळ आहे, शेतकऱ्यांवर माया करणारा आहे. त्याचबरोबर त्याची शेतकऱ्यांच्या पाठीवर पडणारी थाप धनधान्य समृद्धीचा आशीर्वाद देणारी आहे.
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.