
रत्नागिरी ः हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी (Untimely Rain) पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा फटका अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा हंगामावर (Mango Season) होणार आहे. गुरुवारी (ता. १९) रात्रीपासून सुरू झालेला पाऊस (Rain) शुक्रवारी (ता. २०) दिवसभर सुरूच होता. झाडावरील आंबा (Mango Harvesting) काढणे अशक्य असल्यामुळे तो गळून जाण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
अंदमान बेटापर्यंत मॉन्सून दाखल झाला असून, त्याची वेगाने घोडदौड सुरू झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे. गेले काही दिवस कडकडीत उन्हाचा सामना रत्नागिरी जिल्हावासीयांना करावा लागत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना गुरुवारी रात्रीपासून गारवा अनुभवायला मिळाला आहे. गुहागर, संगमेश्वर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांत गुरुवारी रात्री पावसाने हजेरी लावली. तर अन्य तालुक्यांमध्ये शुक्रवारी (ता. २०) पहाटे हलका पाऊस झाला. रत्नागिरीत शुक्रवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच आहे. हवामान विभागाच्या सूचनेनुसार कोकण किनारपट्टीवर २१ ते २३ मे या कालावधीत हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणात मॉन्सूनचे आगमन ५ जूनपर्यंत होईल, असा अंदाज आहे. सध्या पडणाऱ्या पावसामुळे शेतीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका अंतिम टप्प्यात आलेल्या आंबा हंगामाला बसणार आहे. या वर्षी पहिल्या दोन टप्प्यांत उत्पादन कमीच राहिले. ५ मेनंतर आंबा उत्पादन वाढले आणि बागायतदारांची तारांबळ उडाली होती. सध्या पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा काढणी लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे झाडावर तयार झालेला आंबा पिकून गळून जाऊ शकतो. किनारी भागात काही ठिकाणी आंबा गळ झाली आहे. सध्या बाजारात आंब्याला दर नसल्यामुळे कॅनिंगकडील कल वाढलेला आहे. पावसामुळे दर्जा घसरल्याने कॅनिंगचा आंब्याचा दरही कमी होणार आहे. मागील आठवड्यात ३४ रुपये किलोने कॅनिंगला आंबा दिला जात होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.