
Mumbai News: मे महिन्यात झालेल्या पूर्वमोसमी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्राला झोडपले असून राज्यातील ४९ हजार, २२८ हेक्टरवरील उन्हाळी पिके, भाजीपाला, फळांचे नुकसान केले आहे. १ मे ते २८ मे दरम्यान राज्यात झालेल्या पावसामुळे सर्वाधिक अमरावती, बुलडाणा, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, अकोला, चंद्रपूर, जालना आदी जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे.
पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कोकणातील भातरोपांसाठी टाकलेल्या रोपवाटिकांचेही (तरवा) नुकसान झाले आहे. राज्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे खरीपपूर्व मशागतीला ब्रेक लागला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी दलदल असल्याने खरीपपूर्व मशागत करता येत नाही. जून महिन्यात मॉन्सूनचे आगमन होणार असून सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पूर्वमोसमी पावसाने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटविली असली तरी उन्हाळी पिके, भाजीपाला आणि फळांचे मोठे नुकसान केले आहे.
अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून अचलपूर, भातुकली, चांदूर बाजार, चिखलदरा, धारणी, अमरावती, वरूड, चांदूर रेल्वे, तिवसा, धामणगाव रेल्वे तालुक्यांतील मूग, कांदा, ज्वारी, केळी, संत्रा आदी पिकांचे मोठे ८ हजार ८५६ एकरांवरील क्षेत्रावर नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात ४,५३८ एकरांवरील चाळीसगाव, जामनेर, रावेर, भडगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, धरणगाव, बोदवड, पारोळा, अंमळनेर, पाचोरा या तालुक्यांतील मका, ज्वारी, भाजीपाला, बाजरी, कांदा, केळी, पपई, आंबा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, बागलाण, सटाणा, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, मालेगाव, दिंडोरी, येवला, कळवण, नाशिक, इगतपुरी, चांदवड, नांदगाव या तालुक्यांतील ३,५३४ एकरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. येथे बाजरी, मका, डाळिंब, आंबा, कांदा, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी, राहुरी, कोपरगाव, राहता, जामखेड, कर्जत, पारनेर, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा, अहिल्यानगर, अकोले आदी जिल्ह्यांत ४,४५० हेक्टरवरील बाजरी, कांदा, पपई, भाजीपाला, चिकू, आंबा आणि इतर फळपिकांचे नुकसान झाले आहे.
अकोला तालुक्यासह बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, पातूर, बाळापूर या तालुक्यांतील २,४३५ हेक्टरवरील कांदा, लिंबू, ज्वारी, तीळ, भूईमूग, मूग, उडीद, केळी, पपई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यासह अंबड, मंठा, बदनापूर, परतूर तालुक्यांतील पपई या पिकांचे १,७२६ हेक्टरवर नुकसान झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, पोभुर्णा, राजुरा, मूल, बल्लारपूर, कोरपना, नागभीड, ब्रह्मपुरी, शिंदेवाडी येथक्षल मका, धान, फळपिकांचे १७५६ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १६९५ हेक्टरवर नुकसान झाले असून पंढरपूर, माढा, सांगोला, मोहळ, माळशिरस, मंगळवेढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोट याजिल्ह्यातील केळी, आंबा आणि डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे.
अन्य बाधित जिल्हे (बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये)
पालघर (७९६), रायगड (४२), ठाणे (४७), संगमेश्वर (१), सिंधूदुर्ग (५), धुळे (६४५), नंदूरबार (१४४), पुणे (६७६) , सातारा (७३), सांगली, (१०), कोल्हापूर (९५), लातूर (९५७), धाराशीव (२३५), छत्रपती संभाजीनगर (४५६), बीड (१०),परभणी (३३८), नांदेड (७), हिंगोली (६०), यवतमाळ (२९०), वाशिम (२२४), वर्धा (२८१), नागपूर (४२), भंडारा (४६१), गोंदिया (१४२), गडचिरोली (३४२)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.