Jalgaon News : खानदेशात सोमवारनंतर (ता. १) अपवाद वगळता जोरदार किंवा चांगला पाऊस झालेला नाही. मंगळवारी (ता. २) काही भागात तुरळक पाऊस झाला. मंगळवारी दुपारी काही भागात हलका, तुरळक पाऊस झाला. कुठेही पावसाचा जोर नव्हता. दुपारनंतर सूर्यदर्शनही बऱ्यापैकी झाले. सोमवारीदेखील खानदेशात काही भागात पाऊस झाला होता. सर्वत्र पाऊस नव्हता.
मंगळवारी सायंकाळी सुसाट वाराही होता. रात्रीही पाऊस आला नाही. सोमवारी खानदेशात काही भागांत पाऊस झाला. त्यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, बोदवड भागात तुरळक पाऊस झाला. चाळीसगावात फक्त पाच मिलिमीटर पाऊस सोमवारी झाल्याची नोंद आहे. तर मंगळवारी कुठलाही पाऊस चाळीसगाव अन्य भागात नव्हता.
मंगळवारी जळगाव, चोपडा, अमळनेर, यावल, धरणगाव, रावेर, धुळ्यातील शिरपूर या भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. या भागातही १० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला नाही. मंगळवारी जळगाव तालुक्यात सर्वाधिक आठ मिलिमीटर पाऊस झाला. तर सर्वात कमी ०.१ मिलिमीटर पाऊस जामनेरात झाला. चाळीसगावात मंगळवारीदेखील कोरडे वातावरण होते. ऊन सावल्यांचा खेळ चाळीसगाव, पाचोरा भागात सुरू होता.
बुधवारी (ता. ३) सकाळपासून सूर्यदर्शन झाले. हलका वाराही होता. खानदेशात मंगळवारी व बुधवारी सकाळी अपवाद वगळता कुठेही पाऊस झाला नसल्याने शेतीकामेही सुरू झाली. हलक्या, मध्यम जमिनीत कापूस व अन्य पिकात आंतरमशागत सुरू झाली. तसेच फवारणी, तणनियंत्रण, खते देणे आदी कामेही वेगात सुरू झाली. काळ्या कसदार जमिनींतही साचलेले पाणी जिरण्यास अनुकूल स्थिती तयार झाली आहे. शेतातील सखल भागात पाणी तुंबल्याने उडीद, मूग, कापूस आदी पिकांची हानी झाली. पिके पिवळसर झाली होती. परंतु ऊन व वारा यामुळे वाफसा तयार होऊन पिवळसर पिके जोम धरतील, अशी स्थिती तयार झाली आहे.
काही भागांत प्रतीक्षा
खानदेशात जूनमध्ये पाऊसमान बरे राहीले आहे. परंतु जूनमध्येही सर्वत्र एकसारखा पाऊस झालेला नाही. काही मंडलांत मध्यम ते तुरळक पाऊस झाला आहे. तर काही भागात अतिजोरदार पाऊस झाल्याने जमीनी खरडून गेल्या आहेत. बांध, बंधारे फुटून माती वाहून गेली आहे. यामुळे बांध, बंधारे दुरुस्तीचे कामही शेतकऱ्यांना करावे लागत आहे. जूनच्या अखेरीस म्हणजेच २९ व ३० रोजी जोरदार पाऊस जळगाव, पाचोरा, चोपडा, शिरपूर भागात झाला. यात पिकांची हानीही झाल्याची माहिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.