डॉ. एस. डी. रामटेके, अभिजीत ठोंबरे
Weather Effects : राज्यातील सांगली या द्राक्ष विभागामध्ये गेल्या संपूर्ण पाऊस हंगामात वाढलेला पाऊस आणि अनियमित वादळामुळे बागांमध्ये काही समस्या निर्माण झाल्याचे दिसते. त्यातही तासगाव आणि परिसरामध्ये सातत्याने राहिलेले ढगाळ वातावरण आणि झालेल्या मोठ्या पावसासह एक वेळ गारपीटीमुळे सध्या वाढीच्या अवस्थेमध्ये असलेल्या द्राक्ष बागांमध्ये काही समस्या आढळत आहेत.
त्या संदर्भात नुकत्याच द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी मणी राजुरी व सावळज भागामध्ये गुरुवार (ता. १४) रोजी केलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळलेली निरीक्षणे व त्यावरील उपाययोजना पुढील प्रमाणे...
या वर्षी हवामानातील बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पादन पट्ट्यामध्ये लक्षणीय पातळीवर दिसून येत आहे. सामान्य पर्जन्यमान ४०० मिमी ऐवजी १६०० मिमी पर्यंत वाढल्याचे दिसते. त्यामुळे द्राक्ष विभागामध्ये दीर्घकाळ ढगाळ वातावरणही राहिले. त्याचे अनेक परिणाम द्राक्ष वेल आणि मातीच्या संरचनेवर होत असतात. त्यामुळे वेलीमध्ये निर्माण होणारे ताण हे अंतिम उत्पादनावरही विलक्षण परिणाम करण्याची क्षमता राखतात.
बागेमध्ये दिसणारे परिणाम :
कॅनोपी निर्माण : ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे वाढलेल्या आर्द्रतेमुळे द्राक्ष वेलीची वाढ जोमाने झाली. कॅनोपी अधिक वाढलेली दिसते. पाने अधिक असली तरी वादळी वाऱ्यामुळे पाने फाटणे व इजा होण्याचे प्रमाणही अधिक होते. त्याचा विपरीत परिणाम प्रकाश संश्लेषण क्रियेवर झाला. पानांना झालेल्या इजांमधून रोगकारक घटकांचा प्रवेश सुलभ होतो.
रोगांचा प्रादुर्भाव : वाढत्या कॅनोपीमुळे आत पर्यंत हवा खेळती न राहणे, फवारणीचे कव्हरेज न मिळणे या दोन्ही कारणांनी विविध रोगांचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढला. उदा. डाऊनी, झांथोमोनास आणि अँथ्रॅक्नोज आदी. बागांमध्ये मातीतील आर्द्रताही (WL) जास्त आढळली.
मुळांची क्रियाशीलता : जास्त पावसामुळे बागेत पाणी अधिक काळ साचून राहिले. मुळांच्या परिसरात हवा खेळती राहत नाही. परिणामी वेलीच्या मुळांची कार्यक्षमता कमी झाली. अन्नद्रव्यांची शोषणही कमी झाल्याने वेलीवर त्याचा परिणाम झाला. वेलीच्या रोग व अन्य बाबींच्या प्रतिकारक्षमतेत घट झाली.
पाने पिवळी होणे : एकंदरीतच वाढलेली कॅनोपी व त्या तुलनेत न मिळालेली अन्नद्रव्ये यामुळे पाने पिवळी पडली. पिवळ्या पानांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला.
उपाययोजना : कॅनोपी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे. अतिरिक्त पाने आणि शेंडे काढून घ्यावीत. त्यामुळे वेलीमध्ये सूर्यप्रकाश आणि हवा आतपर्यंत पोचू शकेल. पाने प्रभावी प्रकाशसंश्लेषण करू शकतील. रोगांचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल.
उंच बोद तयार करणे : वेलीच्या ओळीमध्ये चांगले कुजलेले शेणखत व सेंद्रिय पदार्थ भरून बोदाची उंची वाढवावी. या सेंद्रिय घटकांमुळे वेलीच्या मुळांच्या कक्षेतील मातीची संरचना सुधारण्यास मदत होते. उंच बोद व त्यातील सेंद्रिय घटकांमुळे त्यावर पडलेले पावसाचे पाणी त्वरीत निचरा होईल. मुळांच्या आसपास पाणी न साचल्यामुळे त्यांची कार्यक्षमता अबाधित राहील.
निचऱ्यासाठी चर काढणे : पावसाचे पाणी बागेतून त्वरीत बाहेर काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात. त्यासाठी दर काही ओळीनंतर किंवा शेताच्या सीमेवर ठराविक रूंदीचे चर काढावेत. त्यामुळे मुळे सडण्याची समस्या कमी होईल.
बुरशीनाशक वापर : कटींग आणि कॅनोपी व्यवस्थापनानंतर झालेल्या इजामधून बुरशींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तो टाळण्यासाठी अनेक्श्चर पाच प्रमाणे योग्य निवडक बुरशीनाशकांच्या फवारणीचे नियोजन करावे. उदा. डाऊनी मिल्ड्यूसाठी सायमोक्झॅनील २ मिलि किंवा मॅन्कोझेब २ मि.लि प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी.
पोषण व्यवस्थापन : पानामध्ये हरितद्रव्याच्या निर्मितीला चालना मिळण्यासाठी पानांवर ‘सी वीड एक्स्ट्रॅक्ट’ २ मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. पाणी साचलेल्या ठिकाणी मातीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतील. वर सुचवलेले चर व अन्य तितके कार्यक्षम नसल्याचे दिसून आल्यास माती ‘एरिएशन उपकरणे’ वापरता येतील.
पिवळी व रोगग्रस्त पाने काढून टाकणे : पिवळी, मृत किंवा रोगग्रस्त पाने, शेंडे छाटून टाकावीत. कॅनोपीमध्ये हवा खेळती राहते. या दोन्हीमुळे रोगाचा संभाव्य प्रसार रोखला जातो. योग्य छाटणी पद्धतीचा अवलंब केल्यामुळे वेलीची ऊर्जा उत्पादन वाढीकडे वळवता येते.
वादळानंतर करावयाची कार्यवाही : वादळानंतर द्राक्ष बागेची तपासणी करावी. त्यामध्ये वेलींचे झालेले नुकसान उदा. पाने फाटणे, फांद्या तुटणे, ओलांड्यांना मोठ्या इजा होणे या बाबी तपासाव्यात. त्याच प्रमाणे बागेतील संरचनात्मक नुकसान, जास्त पाणी साचलेले किंवा किडींच्या संसर्गाची लक्षणे तपासावीत. या बाबीवर त्वरीत निर्णय घेऊन कार्यवाही करावी. म्हणजे पुढील समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.
डॉ. एस. डी. रामटेके, ९४२२३१३१६६ (प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.