
Alibaug : अलिबाग, जि. रायगड : संपूर्ण रायगड जिल्ह्यात शनिवारपासून (ता. २५) वादळी वाऱ्यासह मोसमी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे महाड, श्रीवर्धन, खालापूर, पेण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, बागायतदार, व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.
विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे रस्ते खचण्याचेही प्रकार घडले आहेत. काही मार्गांवर झाडे पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. २४ तासांत रायगड जिल्ह्यात सरासरी १४०.५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाची सरासरी ५७९ मिमी इतकी नोंद झाली आहे. मे महिन्यात पडलेल्या पावसाची आतापर्यंतची ही सर्वाधिक सरासरी आहे.
रायगड जिल्ह्यात रविवारी रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे. मुरूड तालुक्यात सर्वाधिक ३७१ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्याखालोखाल श्रीवर्धन ३०७ मिमी, म्हसळा ३०० मिमी इतकी नोंद झाली आहे. तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. ९ मेपासून रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरणास सुरुवात झाली होती. त्यानंतर १७ मेपासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने दक्षिण रायगडमध्ये पावसाच्या सरी कोसळू लागल्या. २१ मेपासून पावसाचा जोर वाढला आहे.
आतापर्यंत मॉन्सून सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात केव्हाही पाऊस पडलेला नव्हता. पावसाच्या सरासरी तक्त्यातही मे महिन्याचा समावेश नव्हता. तो नव्याने करावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडवर काम करीत असून, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तत्काळ बैठक घेऊन सर्व विभागांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
किल्ले रायगड मार्गावर कोंझर गावाच्या हद्दीत असलेल्या धबधब्याचा प्रवाह वाढल्याने रस्त्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे रायगड मार्ग प्रवासासाठी बंद करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक शंकर काळे यांनी दिली आहे. शहरातील एसटी थांबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
अलिबाग तालुक्यातील महाजने-बेलोशी पुलाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे नदीतून पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी तयार करण्यात आला होता, मात्र नदीला पूर आल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पोहोचण्यास अडथळे निर्माण होत आहेत. जोरदार वारा तसेच पावसामुळे शेती पाण्याखाली गेली असून, तोंडलीचे मांडव कोसळले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
पेरणीच्या दिवसांत लावणीसारखा पाऊस
श्रीवर्धन तालुक्यात तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यात पावसाची नोंद ३०७ मिमी इतकी झाली असून, यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे, तर रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्यात या वर्षी १५ दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे वातावरणात गारवा असून, पिकांना योग्य प्रमाणात उष्णता मिळत नाही. परिणामी, फळबागांचे नुकसान झाले आहे, याशिवाय पावसामुळे भात खाचरात पाणी साचल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी पेरणीपूर्व भाजणी करण्यासाठी आणलेला पालापाचोळादेखील भिजला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.