Latur News : लातुर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांत रब्बीची सर्वसाधारण १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर क्षेत्राच्या पुढे जाऊन जवळपास १५ लाख ९२ हजार ५८६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणीचा हा टक्का सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११६ टक्के आहे. धाराशिव वगळता चार जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात लातूर कृषी विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांसाठी सर्वसाधारण १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टरवर पेरणी अपेक्षित होती. खरिपात पावसाअभावी मोठा नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बीवर लागून होत्या. परंतु सुरुवातीला पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने रब्बीची पेरणी होईल की नाही हा प्रश्न होता. परंतु पावसाळा संपल्यानंतर आलेल्या पावसाने रब्बीच्या क्षेत्र वाढ होण्यास मोठा हातभार लावला आहे. त्यातही पेरणी करताना शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांच्या पेरणीला प्राधान्य दिले आहे.
पीकनिहाय क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी
रब्बी ज्वारी : लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यांत रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात ३ लाख ९२ हजार ८१४ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारीचे पीक सध्या दाणा भरण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
गहू : पाचही जिल्ह्यांत गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ३० हजार ४०६ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. गव्हाचे पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.
हरभरा : हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर होते. प्रत्यक्षात १० लाख ९ हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२८ टक्के आहे. हरभऱ्याचे पीक काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी काढण्यास सुरुवात झाली आहे. या पिकावर अल्प प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शिवाय मर रोगाचेही हरभऱ्यावर आक्रमण आढळून आले आहे.
करडई : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर होते. प्रत्यक्षात ३४ हजार ८४२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १७८ टक्के क्षेत्रावर करडईची पेरणी झाली आहे. पीक सध्या बोंड्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
पिकांचे लागवड क्षेत्र
इतर पिकांपैकी मकाची १७९९ हेक्टरवर, इतर तृणधान्य १०८४ हेक्टर, इतर कडधान्य ३२२ हेक्टर, जवस ३१७ हेक्टर, तीळ १७१ हेक्टर, सूर्यफूल ४६४ हेक्टर, इतर गळीत धान्य २२८२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
जिल्हानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जिल्हा सर्वसाधारण प्रत्यक्ष टक्केवारी
लातूर २ लाख ८० हजार ४३९ ३ लाख ६४ हजार ४१४ १२९
धाराशिव ४ लाख ११ हजार १७२ ३ हजार ७५ हजार ५५५ ९१
नांदेड २ लाख २४ हजार ६३४ ३ लाख ४८ हजार ८३५ १५५
परभणी २ लाख ७० हजार ७९४ २ लाख ९१ हजार ३३१ १०७
हिंगोली १ लाख ७६ हजार ८९१ २ लाख १२ हजार ४४८ १२०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.