Camel Farming : रबारी आणि उंटाभोवतालचे शहाणे

Diwali Article 2024 : उंटाला पाळणे हे गाय-म्हैस पाळण्याइतके सोपे नाही. त्याला बांधून ठेवले आणि कुठून तरी चारा आणून खाऊ घातले असे उंटाच्या बाबतीत चालत नाही. त्याची विशिष्ट काळजी घ्यावी लागते आणि त्यासाठी विशिष्ट कलेची गरज आहे.
Camel Farming
Camel Farming Agrowon
Published on
Updated on

अजिंक्य शहाणे

Rabari Community Update : उंटाला पाळणे हे गाय-म्हैस पाळण्याइतके सोपे नाही. त्याला बांधून ठेवले आणि कुठून तरी चारा आणून खाऊ घातले असे उंटाच्या बाबतीत चालत नाही. त्याची विशिष्ट काळजी घ्यावी लागते आणि त्यासाठी विशिष्ट कलेची गरज आहे.

भारतात उंट फक्त राजस्थानात आहे असा एक गैरसमज आहे. कारण लहानपणापासून आम्हाला उंट म्हणजे ‘वाळवंटातील जहाज’ असेच आणि एवढेच सांगण्यात आलेले आहे. पण राजस्थान सोडून भारतातील इतर भागांत सुद्धा उंट हा प्राणी आढळतो. नॅशनल ब्यूरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस (NBAGR) या संस्थेवर भारतातील पशुधनाची नोंदणी करण्याची जबाबदारी आहे.

या संस्थेकडील आकडेवारीनुसार भारतात उंटांच्या ९ जाती आहेत. त्यापैकी ६ राजस्थानात, २ गुजरातमध्ये, १ हरियानात (राजस्थान- हरयाना मिळून) आणि १ मध्य प्रदेशमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. परंतु उंटाच्या याही पेक्षा अधिक जाती असण्याची शक्यता आहे आणि येणाऱ्या काळात त्यांची सुद्धा नोंद करण्यात येईल. यातील एक विशिष्ट प्रजाती म्हणजे खराई. खराई उंट ही जगातील एकमेव अशी उंटाची जात आहे जी खाऱ्या म्हणजेच समुद्राच्या पाण्यात पोहते.

वर्षानुवर्षे या उंटांच्या जातींचा सांभाळ काही विशिष्ट समुदायांनी केलेला आहे आणि त्यांची संख्या वाढविण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. पण सध्या उंटांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. देशात २०१२ मध्ये ४ लाख उंट होते. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विसाव्या पशुगणनेनुसार देशात फक्त २.५ लाख उंट राहिल्याचे दिसून आले. २०२४ मध्ये सुरू झालेल्या एकविसाव्या पशुगणनेत ही संख्या १ लाखापेक्षा कमी असेल, अशी भीती काही जण व्यक्त करत आहेत. यावर उपाययोजना केल्या नाहीत, तर उंट हे फक्त प्राणी संग्रहालयातच बघायला मिळतील.

Camel Farming
Agriculture Success Story : फळबागेने दिली आर्थिक समृद्धी...

वास्तविक संयुक्त राष्ट्र संघाने २०२४ हे जागतिक उष्ट्र वर्ष (International Year of Camelids) जाहीर केलेले आहे. उष्ट्रपालकांना आणि या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना पाठिंबा देणे, उंटांच्या परिस्थितीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि उंटपालनाशी संबंधित आर्थिक आणि सामाजिक धोरणांमध्ये सुधारणा करणे हे त्यामागचे उद्देश आहेत. Camelids म्हणजे उष्ट्र प्रजातीमध्ये उंट, लामा, अल्पाका, विकुनास, आणि ग्वानाकोस प्राण्यांचा समावेश होतो.

उंटाला पाळणे हे गाय-म्हैस पाळण्याइतके सोपे नाही. त्याला बांधून ठेवले आणि कुठून तरी चारा आणून खाऊ घातले असे उंटाच्या बाबतीत चालत नाही. त्याची विशिष्ट काळजी घ्यावी लागते आणि त्यासाठी विशिष्ट कलेची गरज आहे. ती काही ठरावीक पशुपालक समाजात दिसून येते. उंट हा केवळ वाहतुकीसाठीच वापरला जात नाही, तर त्याचा उपयोग दूध, मांस, लोकर आणि शेण यासाठीही केला जातो. उंटाच्या दुधाची मागणी वाढत चाललेली आहे, कारण उंटाचे दूध मधुमेह, लॅक्टोज इनटॉलरन्स आणि ऑटिझम या आजारांवर फायद्याचे आहेत, असे अनेक अभ्यास सांगतात.

Camel Farming
Agriculture Success Story : शेतीसारखे समाधान कुठेच अनुभवले नाही...

ढेबरिया रबारी कोण आहेत?

महाराष्ट्रात अनेक पशुपालक समाज वास्तव्यास आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे ढेबरिया रबारी. रस्त्याने हजारोच्या संख्येने मेंढ्या घेऊन जात असलेले पुरुष दिसतात, ज्यांच्या डोक्यावर पांढरा फेटा बांधलेला असतो आणि संपूर्ण पोशाख म्हणजे शर्ट आणि धोतर हेसुद्धा पांढऱ्याच रंगाचे असते.

स्त्रियांचा संपूर्ण पोशाख हा काळ्या रंगाचा असून घागऱ्याप्रमाणे कपडे त्या परिधान करतात आणि रस्त्याने जाताना सोबत उंट किंवा बैलगाडी घेऊन जातात. या लोकांना आपल्याकडे राजस्थानी धनगर या नावाने सुद्धा संबोधले जाते; पण मुळात हे लोक राजस्थानी नाहीत. ते मूळचे गुजरात येथील कच्छ मधले आहेत.

हा समाज गावात फार कमी वेळ राहत असे आणि आपल्या पशूंना घेऊन गावाबाहेर जात असे. त्यामुळे गावातील इतर समाजांचे लोक त्यांना गुजराती भाषेत रह-बाहरी (बाहेर राहणारा) म्हणत असत आणि पुढे त्याचं अपभ्रंश होऊन त्यांना रबारी हे नाव पडले. महाराष्ट्रात काही रबारी परिवार १९५० ते ६० दरम्यान आले.

पण नंतर १९७० ते ८० च्या काळात देशातील काही भागांत भयानक दुष्काळाची परिस्थिती होती तेव्हा अनेक भागात लोकांनी स्थलांतर केलं. त्यातील काही पशुपालक समाज चारा आणि पाण्याच्या शोधात भारतभर पसरले. ढेबरिया रबारीसुद्धा त्यांच्या पशूंच्या चारा-पाण्यासाठी कच्छ येथील अंजार, भदरोई, रापड, भचाऊ इत्यादी भागांतून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होऊन विदर्भात आले. येताना सोबत मेंढी, शेळी, उंट आणि कुत्रा हे प्राणीसुद्धा घेऊन आले.

रबारी समाज त्यांच्या पूर्ण परिवारासोबत स्थलांतर करतात. ते ज्या ठिकाणी थांबतात त्याला डेरा किंवा बेडा म्हणतात आणि त्या डेऱ्यात एकाच परिवारातील तीन ते चार वेगवेगळी घरं असतात. त्यात एकूण १० ते १५ लोकं वास्तव्य करतात.

तात्पुरत्या उभारलेल्या घराला वांढिया किंवा उतारा म्हणतात. प्रत्येकी १० ते १२ डेऱ्यांचा मिळून एक पटेल म्हणजेच प्रमुख व्यक्ती असतो, जो त्यांचे प्रश्‍न सोडविण्यास मदत करतो. त्यांनी दिलेला आदेश सगळ्यांनी पाळणे बंधनकारक असते.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com