
Supreme Court On Dallewal Hunger Strike : शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचे आमरण उपोषण सुरूच आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकाला खडे बोल सुनावले. त्यांना दवाखान्यात भरती करण्याचे आदेश दिले असतानाच शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी उद्या (ता. ३०) पंजाब बंदची हाक देण्यात आल्याची माहिती दिली आहे. उद्या संपूर्ण पंजाबमध्ये रेल्वे रोको करण्यात येणार आहे. तसेच बाजारपेठाही बंद राहणार असून अकाली दल आणि काँग्रेसने आपली भूमीका स्पष्ट करावी, असे आवाहन पंढेर यांनी केले आहे.
संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली १३ फेब्रुवारी २०२४ पासून शेतकरी आंदोलन करत आहेत. ते पंजाबच्या खनौरी आणि शंभू सीमेवर हमीभाव कायद्यासह विविध १३ मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान याच मागण्यांवरून डल्लेवाल यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा ३३ दिवस आहे. तर याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दोन्ही शेतकरी आघाड्यांतर्फे पंजाब बंदची घोषणा करण्यात आली आहे. पंजाब बंदची संपूर्ण तयारी झाली असून अनेक संघटना यात सहभागी होतील, अशी माहितीही पंढेर यांनी दिली आहे.
तसेच शेतकरी आंदोलनाला देशभरातील शेतकरी, सामाजिक संघटना आणि मजुरांनी मोठ्या संख्येने पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. उद्याच्या बंदअंतर्गत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून रेल्वे रोको केला जाणार आहे. मात्र, आपत्कालीन सेवा सुरू राहिल, असेही पंढेर यांनी म्हटले आहे.
पंढेर म्हणाले की, ३० डिसेंबर रोजी पंजाब बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी राज्यभरातील पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सी पूर्णपणे बंद राहतील. वाहतूक पूर्णपणे बंद राहील. रेल्वे सेवाही बंद राहतील. बाजारपेठा देखील बंद राहणार असून वैद्यकीय सेवा, विवाह कार्यक्रम, विमान सेवा तसेच अत्यावश्यक सेवांसह परीक्षा थांबवली जाणार नाही, असे पंढेर यांनी म्हटले आहे.
पंजाब बंदबाबत शेतकरी व इतर संघटनांकडून संपूर्ण सहकार्य मिळत असून या बंदमुळे देशातील सरकारच्या कॉर्पोरेट धोरणावर लोक प्रश्न उपस्थित करतील. डल्लेवाल शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. पण भाजपचे प्रवक्ते डल्लेवाल हट्टी असल्याचा आरोप करत आहेत. ते हट्टी नाहीत, तर शेतकऱ्यांच्या पाठिशी आहेत. हट्टी तर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत. पंतप्रधानांनी आपला हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या मागण्या चर्चेतून सोडवाव्यात अशी मागणी पंढेर यांनी केली आहे.
पंजाब सरकारने ते कोणासोबत आहेत. हे एकदा स्पष्ट करावे. तसेच अकाली दल आणि काँग्रेसनेही उद्या होणाऱ्या आंदोलनाबाबत भूमीका स्पष्ट करावी, असेही पंढेर यांनी म्हटले आहे. दरम्यान डल्लेवाल यांच्या प्रकृतीबाबत शनिवारी (ता.२८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पंजाब सरकारला डल्लेवाल यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. डल्लेवाल २६ नोव्हेंबरपासून खनौरी सीमेवर आमरण उपोषणाला बसले आहेत. तर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.
या सुनावणीवेळी न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुरेशी पावले उचलली नाहीत. डल्लेवाल यांच्यावर काही सहकाऱ्यांचा दबाव असून त्यांना रुग्णालयात नेण्यास परवानगी न देणारे शेतकरी नेते त्यांचे हितचिंतक असल्याचे दिसत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.