
Raigad News : रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्षलागवड व फलोत्पादन कार्यक्रम व्यापक प्रमाणात हाती घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यात तब्बल १८ लाख ६४ हजार बांबू लागवड व शेवगा लागवड करण्यावर भर दिला जाणार आहे.
दरडप्रवण क्षेत्रातील डोंगर तसेच पूर क्षेत्रातील नदीकिनारच्या गावात ही वृक्ष लागवड केली जाणार असल्याने गावांना पूर व दरडीचा धोका कमी होणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेकडून १५ तालुक्यातील ८०६ ग्रामपंचायतींमध्ये सरकारी कार्यालये, सर्व शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळे या ठिकाणी ही लागवड केली जाणार आहे.
प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतींना शेवगा व बांबू लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून तब्बल १८ लाख ६४ हजार २५२ बांबू व शेवगा वृक्षांची लागवड केली जाणार आहे. ही वृक्ष लागवड आठ जूनपासून केली जाणार होती, परंतु पावसाने दडी मारल्याने कार्यक्रम पुढे गेला आहे. आता एक जुलैला कृषी दिनाचे औचित्य साधून ही मोहीम व्यापक प्रमाणात हाती घेतली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील चौथी ते आठवीपर्यंतच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी किमान एक व शिक्षक किमान दोन रोपे यांचे वृक्षारोपण करून ती दत्तक घेणार आहे. या वृक्ष लागवडीनंतर हे झाडे जगवण्यासाठी संरक्षक जाळी तसेच पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून कुंपण करणे असे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तलावांभोवती जैवविविधता पार्क असा नावीन्यपूर्ण उपक्रमही राबवण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे.
वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेणाऱ्या ग्रामपंचायती, शाळा तसेच शिक्षक विद्यार्थी व कर्मचारी अशा प्रत्येक गटातून तीन क्रमांकाचे पारितोषिक दिले जाणार आहेत. गावांमधील विविध स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट ,भजनी मंडळ, युवक यांनाही सहभाग करून घेतले जाणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होण्याचे संकेत दिसत आहेत.
लोकसहभागातून वृक्षसंवर्धन
१- जिल्ह्यात शेवग्याला प्रचंड मागणी आहे. रायगडसह मुंबई, पुणे येथील पर्यटकही शेवग्याची भाजीवर ताव मारतात. स्थानिकांना शेवगा व्यवसायातून आर्थिक बळ मिळावे यासाठी शेवग्याच्या रोपांची लागवड केली जाणार आहे.
२ - वृक्ष लागवडीसाठी तालुकास्तर, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाऊंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसहाय्यता बचत गट, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवक यांचा लोकसहभाग असेल.
बांबूची बेटे साकारणार
जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. महाड तालुक्यात तळिये येथील दरड प्रकरणानंतर जमिनीची धूप रोखणाऱ्या बांबूची बेटे उभी करण्याचा निर्णय रायगड जिल्हा परिषदेने घेतला आहे. बांबू लागवडीतून उत्पन्नाचे साधनही स्थानिकांना उपलब्ध होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.