Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Watershed Project : जालना जिल्ह्यातील कडवंची पाणलोट प्रकल्प म्हणजे पर्जन्याधारित कोरडवाहू शेतीचे राज्यातील आदर्श उदाहरण आहे. जलसंधारण उपचार, पाण्याचे अंदाजपत्रक मांडून त्यानुसार पीक पद्धती- पाणी व्यवस्थापन, व्यावसायिक शेतीतून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास असे हे कडवंचीचे मॉडेल कार्यातून सिद्ध झालेले व नावाजले गेलेले मॉडेल गणले आहे.
Kadavanchi Watershed Project
Kadavanchi Watershed Project Agrowon

पंडित वासरे, संतोष मुंढे

Cause of Economic Development of Agriculture : मराठवाड्यात अवर्षणप्रवण क्षेत्र सुमारे एक लाख ७० हजार हेक्‍टर आहे. या क्षेत्रावर शेती आधारित विकास करायचा तर मोठ्या प्रकल्पांची गरज आहे. मात्र आवश्‍यक जागेअभावी त्यास मर्यादा आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जालना जिल्ह्यात कडवंची येथे उभारलेला पाणलोट प्रकल्प हे राज्यासाठीच नव्हे तर अन्य राज्यांसाठी देखील सदैव आदर्श उदाहरण ठरले आहे.

सन १९९५ मध्ये सुरू झालेल्या कडवंची पाणलोट कामांची सांगता २००१ मध्ये झाली. नाबार्ड बँकेकडून त्यास अर्थसाह्य झाले. खरपुडी - जालना कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) तांत्रिक मार्गदर्शन आणि लोकसहभागातून हा प्रकल्प यशस्वी झाला. केंद्राचे विश्‍वस्त आणि राज्याच्या जलसंधारण सल्लागार परिषदेचे उपाध्यक्ष विजय संपतराव बोराडे यांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले.

Kadavanchi Watershed Project
Watershed Development : नव्या पाणलोट विकास कार्यक्रमाची गरज

कडवंची पाणलोट- वैशिष्ट्ये, झालेली कामे

भूगर्भीय सर्वेक्षणानुसार पाणलोट व मृद्संधारणातून जलसंधारण कामांची आखणी

माथा ते पायथा उपचार (कडवंची गावाच्या उत्तर, पूर्व व काही अंशी पश्‍चिमेस डोंगर आहे. त्यामुळे पाणलोट कामे करण्यापूर्वी भूगर्भीय सर्वेक्षण). १०० टक्के क्षेत्रीय उपचार. यात डोगर उतारांवर ३५० हेक्टरवर सीसीटी व वनीकरण कामे झाली. शेतकऱ्यांच्या सुमारे १४१० हेक्टर शेतांवर बांधबंदिस्ती झाली. ओढ्यांवर १९ सिमेंट बंधारे बांधण्यात आले.

आपल्या गावच्या उज्वल भविष्यासाठी गावकऱ्यांनी प्रत्येक कामावर लक्ष दिले.

पावसाचे मोजमाप व पाण्याचे अंदाजपत्रक.

पीक पद्धतीत शास्त्रीयदृष्ट्या बदल

शंभर टक्के ठिबकचा वापर

शेततळ्यांआधारे संरक्षित पाणी नियोजन

पाण्याचे अंदाजपत्रक (Water Budget)

कडवंची प्रकल्पातील हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. पाणलोट शिवारात माजी सरपंच चंद्रकांत क्षीरसागर, सुरेश नाना क्षीरसागर, संदीप क्षीरसागर व दत्तुभाऊ चव्हाण असे चार शेतकरी पावसाच्या नोंद ठेवतात. पर्जन्यमानाचे दैनंदिन मोजमाप राहिल्याने खरिपात दोन वेळा पाण्याचे अंदाजपत्रक मांडले जाते. त्यानुसार पुढीलप्रकारे नियोजन होते.

सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिमी झाल्यास संपूर्ण वर्षभराची पाण्याची गरज भागते. हा विश्‍वास वीस वर्षांच्या अनुभवातून आला आहे. त्यातून पीक पद्धती घेण्याचे सर्वानुमते ठरते.

सरासरी पर्जन्यमान ६० टक्के (४०० ते ५०० मिमी) झाल्यास उन्हाळी भाजीपाला लागवड, कांदा, गहू न घेण्याचे नियोजन होते. द्राक्ष, अन्य फळबागा, खरीप पिके व रब्बीतील ज्वारी (कडबा व चाऱ्यासाठी) तसेच हरभरा अशा कमी पाण्यावरील पिकांचे नियोजन होते.

सरासरी पर्जन्यमान २५ ते ३० टक्के (२०० ते ३०० मिमी) राहिल्यास दुष्काळी वर्ष समजले जाते. अशी वेळ आल्यास द्रक्षासारख्या व्यावसायिक पिकास प्राधान्याने पाणी देऊन मनुष्य, जनावरे व चाऱ्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन होते. अशी वेळ २०१२ मध्ये कडवंची शिवारावर एकदाच आली. त्या वेळी पाणलोटात १९८ मिलिमीटर पाऊस झाला. त्या वेळी जलसंधारण, शेततळी यातून पिके तगवण्यात शेतकऱ्यांना बऱ्यापैकी यश आले.

Kadavanchi Watershed Project
Watershed Development : पाणलोट क्षेत्र विकासामधील सिंचन निर्देशांक

शेततळे नव्हे ‘वॉटर बॅंक’

कडवंची पाणलोट शिवारातील भूगर्भात पाणी धरून ठेवणारा थर १५ ते २० मीटर खोल आहे. दोनशे ते २२५ मिमी पाऊस झाला तरी पाणलोट व जलसंधारण कामांमुळे १०० टक्के पाणी मुरून भूगर्भीय पाणीपातळीत व त्यातून विहिरीची पाणीपातळी वाढते. नाल्याला पाझर येतो. शेतकरी या पाण्याने शेततळे भरून ठेवतात.

ज्या ज्या वर्षी पावसाचे प्रमाण जसे असेल त्यानुसार जानेवारी ते मे दरम्यान शेततळ्यातील पाण्याचा खास करून द्राक्ष किंवा अन्य पिकांसाठी वापर शेतकरी कार्यक्षमपणे करतात. कडवंचीतील शेतकऱ्यांची ही ‘वॉटर बॅंक’च आहे.

कडवंची शिवारात घडलेला बदल

शिवारातील जमिनींची धूप थांबली. जमीन सुपीक होऊन सेंद्रिय कर्बवाढीस चालना मिळाली.

भूगर्भीय पाणी पातळीत ६ ते ७ मीटरने वाढ.

संरक्षित पाणी नियोजनासाठी शेतकऱ्यांनी उभारली शेततळी.

द्राक्ष लागवडीस चालना मिळाली. सध्या एकूण द्राक्ष लागवड सुमारे १२०० एकर. डाळिंब, पेरू, सीताफळ लागवड. भाजीपाला क्षेत्रातही वाढ.

दुबार व बारमाही सिंचित क्षेत्रात वाढ झाली. सध्याच्या घडीला बारमाही सिंचित क्षेत्र ४२ टक्के.

पाणलोटाची कामे होण्यापूर्वी १९९५ च्या सुमारास शिवारातील एकूण उत्पन्न ७७ लाख रुपयांपर्यंत होते. आजमितीला ते ४० कोटींपर्यंत. कोरोना संकटापूर्वी ते त्याही पुढे गेले होते.

कडवंचीची थोपटली पाठ

कडवंची गाव पूर्णपणे पर्जन्याधारित असूनही ४२ टक्के क्षेत्रावर बारमाही सिंचन आहे. द्राक्षासारख्या व्यावसायिक पिकाची निवड केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. रोजगारात मोठी वाढ झाली आहे. एकूण आठ कोटी रुपर्यांपर्यंत एकूण रक्कम मजुरांना त्यापोटी मिळते. गावातील अनेक शेतकऱ्यांनी गावापेक्षा शेतावर राहणे पसंत केले आहे. प्रत्येक पांदण रस्त्यांनी जोडली आहे.

सुमारे ४१ किलोमीटरचे शेतरस्ते शिवारात झाले आहेत. सुमारे २५० बायोगॅस प्रकल्प आहेत. त्यातील स्लरीचा वापर फळपिकांत होतो. हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्थेने (क्रीडा) मूल्यमापन करून कडवंची गाव पर्जन्याधारित कोरडवाहू शेतीचे आदर्श उदाहरण सांगत पाठ थोपटली आहे. आत गावातील तरुण पिढी फळपिकांच्या मूल्यवर्धनासाठी प्रयत्नशील झाली आहे.

पंडित वासरे, ९०२८२५४९५१

(कृषी अभियंता, केव्हीके, खरपुडी-जालना)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com