Fertilizing Methods : पिकांना खते देण्याच्या योग्य पद्धती कोणत्या?

Fertilizer Update : खतांचा वापर करताना योग्य खतांची निवड, योग्य मात्रा, योग्य पद्धत आणि योग्य वेळ या चार योग्य प्रकारांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. तरच आपण रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवू शकतो. त्यासाठी खालील प्रमाणे खते देण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा.
fertilizer
fertilizer Agrowon

डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. संतोष काळे

Chemical Fertilizers : जमिनीतून खते देण्याच्या पद्धतीमध्ये सेंद्रिय तसेच रासायनिक खते जमिनीत मिसळून देतात, ही खते पाण्यात विरघळल्यानंतर पिकांस लागू पडतात, ही पद्धत जास्त प्रचलित आहे. सेंद्रिय खते (शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत इ.) पेरणीपूर्वी एक महिना अगोदर फोकून देऊन शेवटच्या कुळवाच्या साह्याने मातीत मिसळतात.

पाण्यात अविद्राव्य असणाऱ्या भूसुधारकांसाठी उदा. रॉक फॉस्फेट किंवा चुना शेणखतात मिसळून आम्ल जमिनीत टाकणे तसेच जिप्सम किंवा गंधक शेणखतात मिसळून विम्ल / चोपण जमिनीवर टाकले जाते. जवळ जवळ अंतरावर उभ्या पिकात नत्राची दुसरी मात्रा देण्यासाठी उपयुक्त आणि कमी खर्चिक पद्धती आहे. पण पीक उत्पादनासाठी अकार्यक्षम ठरते.

या पद्धतीत नत्राचा जास्त ऱ्हास होतो. स्फुरदाचे स्थिरीकरण जास्त होऊन त्याची पिकाद्वारे उचल कमी होते. खत सर्वत्र समप्रमाणात न पडल्यामुळे पिकाची वाढ सर्व ठिकाणी सारखी होत नाही. तणांचा प्रादुर्भाव वाढून खतांची उपयुक्तता कमी होते.

खते योग्य खोलीवर देणे

- पाण्यात विरघळणारी खते पृष्ठभागावर न पसरविता ती जमिनीत मोगड्याच्या साह्याने १० ते १५ सेंमी खोलीवर आंतरपिकांना देतात किंवा ऊस, कापूस, भाजीपाला पिकांना अर्धा फूट बाजूने कुदळीच्या साह्याने कोली घेऊन खत मातीआड करतात.

- खतामधील अन्नघटक क्रियाशील मुळांच्या सान्निध्यात आल्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते. नत्राचा ऱ्हास कमी होतो, स्फुरदाचे स्थिरीकरण कमी होते.

- ही पद्धत पेरणीपूर्वी तसेच पेरणीनंतर खते देण्यासाठी वापरता येते.

- अविद्राव्य रासायनिक खते आणि जमीनसुधारक यांच्यासाठी ही पद्धत वापरू नये.

fertilizer
Fertilizer Market : अप्रमाणित खते विकणाऱ्या कंपनीचा परवाना निलंबित

ओळीत पेरणे

- दोन चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून दिल्याने खतांची कार्यक्षमता वाढते. दाणेदार खते पेरणीसाठी योग्य असतात.

- या पद्धतीत खत बियाण्याच्या बाजूला दोन ते तीन सेंटिमीटर आणि खाली दोन ते तीन सेंटिमीटर पडते. त्यामुळे बियाण्यास इजा होत नाही. मुळाद्वारे योग्य प्रकारे शोषण होते, खतांची कार्यक्षमता वाढते.

- युरिया खत बियाण्यामध्ये मिसळून पेरू नये.

- उभ्या पिकामध्ये प्रत्येक ओळीच्या एका बाजूला खुरप्याच्या साह्याने उथळ सऱ्या पाडून किंवा कोली घेऊन खते घालून मातीने बुजवावीत. विशेषत: भाजीपाला पिके, लांब अंतराची पिके उदा. मका, ज्वारी, ऊस, कापूस यांना ही पद्धत उपयुक्त आहे.

- कोरडवाहू तसेच बागायती शेतीमध्ये पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या साह्याने खते पेरून देण्याची पद्धत सर्वांत चांगली आहे. या पद्धतीमुळे खतांचा कार्यक्षम वापर करून पीक प्रतिसाद वाढविता येतो.

आळे पद्धत

- ही पद्धत बांगडी पद्धतीसारखी आहे फक्त आळे मात्र कमी खोलीचे असते.

- ही पद्धत विशेषकरून फळझाडे, फळभाज्या, पुष्पशेतीसाठी वापरतात.

- फळझाडांची दुपारी १२ वाजता जी सावली पडते त्याच्या आतील बाजूने ९ इंच चर काढून त्यामध्ये सेंद्रिय व रासायनिक खत देऊन चर मातीने झाकून टाकावेत.

ब्रिकेटच्या स्वरूपात खतांचा वापर

- भात पिकासाठी युरिया-डीएपी ब्रिकेटचा वापर फायदेशीर दिसून आला आहे. साधारणतः २.७ ग्रॅमच्या उशीच्या आकाराच्या ब्रिकेट तयार करतात. युरियाचे प्रमाण ६० टक्के अधिक डीएपीचे प्रमाण ४० टक्के असे एकत्र करून यंत्रामध्ये टाकतात. यातून ब्रिकेट तयार होते.

- भात पिकासाठी हेक्टरी १७० किलो प्रति हेक्टरी दिल्यास ५९ किलो नत्र व ३१ किलो स्फुरद प्रति हेक्टरी ब्रिकेटद्वारे दिले जाते, त्यामुळे रासायनिक खतात ४० टक्के बचत होते. भात लावणीच्या वेळी दर चार ओळींच्या मधोमध हाताने एक ब्रिकेट गोळी ८ ते १० सेंमी खोलवर खोचावी.

- ब्रिकेटचा वापर ऊस खोडवा व्यवस्थापन तसेच भाजीपाला पिकांनाही केल्यास फायदेशीर ठरतो. खतांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

- ब्रिकेटचा वापर इतर बागायती पिकांमध्ये फायदेशीर दिसून आला आहे. पिकामध्ये ब्रिकेट वापरावयाचे असल्यास पारंपरिक लागण पद्धतीत थोडा बदल करून पिकांची लागण ब्रिकेटजवळ कशी येईल त्याप्रमाणे ओळीतील व रोपांतील अंतर बदलावे लागते.

ठिबकद्वारे खते देणे

- विद्राव्य खतामध्ये नत्रासाठी युरिया, युरिया फॉस्फेट, स्फुरदासाठी फॉस्फरिक ॲसिड (८५ टक्के) तसेच पालाशसाठी पांढरे पोटॅश तसेच १२:६१:० ०:५२:३४, ०:०:५०, ००:५०:१८, १३:०:४५ इत्यादी विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास पीकवाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करता येते. जमिनीचे रासायनिक गुणधर्मही चांगले राहतात, कारण ही खते १०० टक्के पाण्यात विरघळणारी असतात.

- ही पद्धत विशेषतः नगदी पिके, ऊस, आले, हळद, भाजीपाला, फळपिके इत्यादीसाठी ठिबक सिंचनाची सोय असल्यामुळे फायदेशीर आहे.

फवारणीद्वारे खते देणे

- काही वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीतच उभ्या पिकावर फवारणीद्वारे खते दिली जातात. ही पद्धत पहिल्या पद्धतीस पूरक म्हणून वापरावी.

- फवारणीतून उभ्या पिकास नत्र, हे युरिया खतातून १-२ टक्क्यांपर्यंत फवारावे, कपाशीवर २ टक्के डीएपीची फवारणी बोंडे बोराएवढी असताना करावी.

- सल्फेट ऑफ पोटॅश १ ते २ टक्क्यांपर्यंत पिकावर फळवाढीच्या अवस्थेत फवारल्यास नत्राचे नियोजन चांगले होऊन फळे लवकर पक्व होतात. फळाच्या गुणवत्तेसाठी पोटॅशियम शोनाइटची (१ टक्का) फवारणी करावी.

- तांबड्या जमिनीत कॅल्शिअमची कमतरता असल्याने पिकावर कॅल्शिअम नायट्रेट (०.५ ते १.० टक्का) फवारणी करावी तसेच चुनखडीयुक्त जमिनीत मॅग्नेशिअम सल्फेटची (०.५ टक्का) फवारणी करावी.

- सूक्ष्मअन्नद्रव्ये लोह, जस्त, बोरॉनसाठी अनुक्रमे चिलेटेड-लोह (०.१५ टक्का). चिलेटेड-जस्त (०.२० %टक्का), बोरीक अॅसिडची फवारणी (०.५ टक्का) पिकावर कमतरतेनुसार करावी. मात्र या फवारण्या तीव्र उन्हाच्या अगोदर सकाळी ११ वाजेच्या आत किंवा संध्याकाळी ४ नंतर वारा नसताना करावी.

- अन्नद्रव्यांच्या विशेषतः सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीत कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक अथवा बुरशीनाशक मिसळू नये.

बीजप्रक्रियेद्वारे तसेच मुळावर जिवाणू खतांची प्रक्रिया

- नत्र स्थिर करणारे जिवाणू खते पावडर किंवा द्रवरूप स्वरूपात बियाण्यास चोळून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविता येते.

- तृणधान्यासाठी अॅझोटोबॅक्टर (२५ ग्रॅम किंवा मिलि, प्रती १० किलो बियाण्यास), कडधान्ये पिकासाठी रायझोबियम (२५ ग्रॅम किंवा १ मिलि, प्रती १० किलो बियाण्यास) ऊस बेणे प्रक्रियेसाठी ॲसिटोबॅक्टर (२.५ लिटर /५०० लिटर पाणी) याप्रमाणे वापर केल्यास ऊस पिकास ४० ते ५० टक्के नत्राचा पुरवठा होऊन १० ते २० टक्के उत्पादनात वाढ होते. तसेच निळे हिरवे शेवाळ भात पिकासाठी चिखलणीत वापरावे.

fertilizer
Fertilizer : पुण्यासाठी रासायनिक खते उपलब्ध

- चुनखडीयुक्त जमिनीत स्फुरदयुक्त खते शेणखतात मुरवून दिल्यास स्थिर स्फुरद उपलब्ध होण्यास मदत होऊन मुळ्यांची वाढ चांगली होते. स्फुरद विरघळविणाच्या (पीएसबी) या जिवाणू खतांचा वापर केल्यास (बीजप्रक्रिया २५ मिलि किंवा ग्रॅम प्रती १० किलो बियाणास) स्फुरदयुक्त खतांतील स्फुरदाची जमिनीतील उपलब्धता वाढते. मायकोरायझा जिवांणूमुळेही जमिनीतील स्फुरदाची उपयुक्तता वाढविता येते.

- भाजीपाला पिकांमध्ये लावणीसाठी आणलेल्या रोपांच्या मुळ्या ॲझोस्पिरीलियम सारख्या जिवाणूंच्या घट्ट द्रावणात लागणीपूर्वी दहा मिनिटे बुडवून लागवड केल्यास अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते. या सर्व जिवाणू खतांचा वापर बीजप्रक्रिया करून रासायनिक खतामध्ये १५ ते २० टक्के बचत होऊन पिकांच्या उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

संपर्क - डॉ. अनिल दुरगुडे, ९४२०००७७३१, डॉ. संतोष काळे, ९७६४८८१७९९, (मृद्‍ विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com