Sports Fishing : ‘स्पोर्ट्स फिशिंग’मधून पर्यटनाला चालना

Tourism : अमेरिकेत पर्यटनासाठी केल्या जाणाऱ्या मासेमारीला ‘स्पोर्ट्स फिशिंग' म्हणतात. जगात अनेक देशातील लोक पर्यटन करताना मासेमारीचा आनंद लुटतात. आनंद आणि मनोरंजन याचा सुंदर मिलाफ येथे पाहायला मिळतो.
Sports Fishing
Sports FishingAgrowon
Published on
Updated on

डॉ. व्यंकटराव घोरपडे
अमेरिकेत पर्यटनासाठी केल्या जाणाऱ्या मासेमारीला ‘स्पोर्ट्स फिशिंग' म्हणतात. जगात अनेक देशातील लोक पर्यटन करताना मासेमारीचा आनंद लुटतात. आनंद आणि मनोरंजन याचा सुंदर मिलाफ येथे पाहायला मिळतो. अशा प्रकारची मासेमारी गोड्या पाण्यातील असो किंवा समुद्र, खाडीतील असो त्याचा संबंध हा निसर्गाशी आहे. त्यामुळे विश्रांतीसह कुटुंबासोबत पर्यटनाचाही आनंद घेता येतो.


नेदरलँड, ॲमस्टरडॅम येथे अभ्यास दौऱ्यावर असताना मी रोज सकाळी फिरायला जात असे. त्या वेळी तेथे कॅनॉलवर अनेक मंडळी मासेमारी करताना दिसायचे. सुट्टीच्या दिवशी तर अख्खे कुटुंब खुर्च्या टाकून मुला-मुलींसह प्रत्येक जण कॅनॉलवर फिशिंग रॉड टाकून बसलेले दिसायचे. मला कुतूहल मिश्रित आश्‍चर्य वाटायचं, की ही मंडळी कामधंदा सोडून असं कसं बसतात? पण ते एक प्रकारचा आनंद लुटताना दिसायचे. मासा गळाला लागला की सगळं कुटुंब आनंदाने नाचायचे. मला विशेष वाटले. आपल्याकडे आपण ओढ्याकाठी, धरणावर, तलावावर, विहिरीतून गळ टाकून मासेमारी करताना अनेकांना पाहतो. अनेक मंडळी तो खाण्यासाठी किंवा अतिरिक्त सापडल्यास त्यातून विक्री करताना दिसायची. त्यामुळे विशेष काही वाटत नव्हते.

अमेरिकेत अभ्यास दौऱ्यावर असताना बंधूंच्या गॅरेजमध्ये मासेमारीसाठी लागणारे पाच रॉड पूर्ण तयारीसह पाहिल्यावर मला नेदरलँडची आठवण आली. मी त्याला याबाबत विचारलं तेव्हा तो म्हणाला, की मला कंटाळा आला की येथील समुद्रकिनारी जाऊन मासेमारी करतो.कधी कधी बोटीवर पण मासेमारीसाठी जातो. मलाही त्याने बोटीवरील मासेमारीसाठी घेऊन जाण्याचे आश्‍वासन दिले. अमेरिकेतील समुद्रकिनारी अनेक ठिकाणी खास तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवर अनेक मंडळी, वयस्कर स्त्री-पुरुष मासेमारी करताना दिसायचे.

अमेरिकेतील हौशी मासेमारी ः
एक दिवस मी बंधू आणि माझा पुतण्या रणजित असे सर्व जण बोटीवर मासे पकडायला गेलो. या बोटीवर मासेमारीसाठी पन्नास जण जमले होते. त्यामध्ये स्त्री-पुरुष, तरुण मंडळी बरीच होती. या किनाऱ्यावर आम्ही फी भरून एक दिवसाचा मासे पकडण्याचा परवाना घेतला. त्यानंतर आम्ही तिघेही बोटीवर गेलो. ही बोट किमान सात तास समुद्रात मासेमारीसाठी फिरत असते.
तासाभराच्या प्रवासानंतर समुद्रात एका ठिकाणी ही बोट नांगरली जाते आणि सर्वांना मासेमारी करण्यासाठी गळ टाकायला सांगितले जाते. सुरुवातीच्या तासभर प्रवासात बोटीवरील त्यांचे कर्मचारी फिशिंग रॉड, वजन, गळाचा आकार याबाबत काही अडचण असेल तर मार्गदर्शन करतात. सुरक्षित ठिकाणी बोट नांगरल्यावर मासेमारीला सुरुवात होते. गळ ठेवलेल्या ठिकाणी छोट्या माशांचे तुकडे ठेवलेले असतात. ते बेट (आमिष) म्हणून गळाला लावून समुद्रात सोडायचे आणि वाट पाहत उभे राहायचं. अधून मधून कानोसा घेत रॉडच्या टोकाकडे लक्ष देऊन अंदाज घेत झटके देऊन मासा लागला आहे का, याची खात्री करायची. एकदा का मासा अडकल्याची खात्री झाली की वेगाने रील फिरवून तो गुंडाळायचा. साधारणपणे ३०० ते ३५० फूट खाली गेलेला गळ परत घेताना चांगलीच दमछाक व्हायची. पण पण गळाला काय आणि कसा मासा लागला असेल हे पाहण्याची उत्सुकता असायची. वेगाने रील गुंडाळला जायचा, अनेक वेळा अंदाज चुकायचा. परत गळ सोडायचा.

Sports Fishing
Beekeeping : मधमाशीपालन व्यवसायातून पर्यटनाला चालना मिळाल्याचे सिद्ध

आम्हा तिघांना मिळून सहा ते सात मासे मिळाले. बोटीवरील अनेकांना त्याच प्रमाणात कमी जास्त मासे मिळाले. विशेष म्हणजे लहान मासे तेथील कर्मचारी तत्काळ गळातून सोडवून समुद्रात परत सोडायचे. बोटीवरील आम्हाला प्रत्येकी एक क्रमांक देऊन ज्यूटचे पोते दिले होते. त्यामध्ये प्रत्येकाने सगळे पकडलेले मासे गोळा केले. बोटीवर छोटसे कॅन्टीन असते. त्या ठिकाणी शीतपेये, काही खाद्यपदार्थ देखील उपलब्ध असतात. किमान चार तास मासेमारी झाल्यावर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्या वेळी नंबर प्रमाणे
तेथील कर्मचारी आम्ही पकडलेले मासे साफ करून प्रत्येकाला व्यवस्थित पॅक करून देत होते. मासे साफ करताना टाकून दिलेले तुकडे खाण्यासाठी अनेक सीगल पक्ष्यांचे थवे बोटीभोवती शेवटपर्यंत सोबत होते. असा सात तासांचा हौशी मासेमारीचा खेळ अनुभवता आला आणि खूप मजाही आली. या ठिकाणी भाडेतत्त्वावर फिशिंग रॉड मिळतात हे विशेष.

Sports Fishing
Land Acquisition : उस्मानाबाद रेल्वेमुळे पर्यटनाला मिळणार चालना

पर्यटनासाठी ‘स्पोर्ट्स फिशिंग'
मनोरंजनासाठी केलेली मासेमारी त्याला स्पोर्ट्स फिशिंग म्हणतात. जगात अनेक देशांतील लोक त्याचा आनंद लुटतात. आनंद आणि मनोरंजन याचा सुंदर मिलाफ येथे पाहायला मिळतो. अशा प्रकारची मासेमारी गोड्या पाण्यातील असो किंवा समुद्र, खाडीतील असो त्याचा संबंध हा निसर्गाशी आहे. त्यामुळे विश्रांतीसह कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्याशी एक नाते निर्माण करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर हा एक चांगला खेळ देखील होऊ शकतो. तुमची ताकद, लवचिकता आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी निश्‍चित मदत होते. याच्या लोकप्रियतेचे कारण म्हणजे पाण्याजवळील शांत वातावरण, निसर्गात मग्न होऊन त्यातून तणाव व चिंता दूर होते. मन उल्हसित होते, दैनंदिन घाईगडबडीतून सुटकादेखील मिळते. त्याही पुढे जाऊन पर्यावरण, जैवविविधता, बारीकसारीक गोष्टींच्या निरीक्षणातून आनंद मिळतो आणि अभ्यासदेखील होतो. आज काल अनेकांना कुटुंबातील व्यक्तींना वेळ देता येत नाही. अशावेळी अशा हौशी मासेमारीतून कुटुंब एकत्र आल्याने आठवणीने त्यांच्या भावना समृद्ध होतात. परस्पर संबंध आणि कौटुंबिक मूल्यांना बळकटीदेखील येते. याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होते.

आपल्याकडे हौशी मासेमारी सारखे प्रकार क्वचित आढळतात. मासे खाणाऱ्यांना पकडायला देखील निश्‍चित आवडत असते. पण ते संधीची वाट पाहत असतात. अशा प्रकारे जर संधी आपल्या कोकणात उपलब्ध केल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळेल. नाहीतर आपण बंदरावर जाऊन ताजे मासे विकत आणतो आणि कुठेतरी शिजवून घेऊन खातो, जर मग अशी सोय योग्य नियमावलीसह केली तर अनेक मंडळी मासेमारीचा आनंद घेतीलच त्याचबरोबर पर्यटनासह इतर अनेक व्यवसाय पुढे येतील. योग्य नियोजन, सुरक्षितता आणि शुल्क आकारून पर्यटन विभाग व मत्स्यव्यवसाय विभाग अशा प्रकारच्या सेवा सुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर निश्‍चितपणे परदेशी पर्यटकांसह भारतीय मंडळींना देखील चांगली संधी मासेमारी पर्यटन उद्योगातून संधी मिळेल यात शंका नाही.

संपर्क ः डॉ. व्यंकटराव घोरपडे, ९४२२०४२१९५
(सेवानिवृत्त सहायक आयुक्त (पशुसंवर्धन) सांगली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com