Digital Agriculture : डिजिटल युगातील प्रगतीचा शेतकऱ्यांना फायदा

Madan Pandey, Managing Director, Zuari PharmHub Limited : झुआरी फार्महब लिमिटेड या कंपनीने या संकल्पनेवर काम करून अनेक उपक्रम सुरू केले आहेत. या संदर्भात या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मदन पांडेय यांच्याशी केलेली बातचीत.
Madan Pandey, Managing Director, Zuari PharmHub Limited
Madan Pandey, Managing Director, Zuari PharmHub LimitedAgrowon
Published on
Updated on

A conversation with Madan Pandey, Managing Director, Zuari PharmHub Limited :

सध्याच्या काळात भारतीय कृषी व्यवस्थेची वाटचाल कशी सुरू आहे?

अतिशय समाधानकारक अशी वाटचाल सुरू आहे. बघा, समस्या तर आहेत. त्या नाहीत असे मी म्हणणार नाही. परंतु, कृषी व्यवस्थेमध्ये सरकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने बदल करू पाहते आहे. शेतकरीदेखील बदलत आहेत. अनेक शेतकरी आता भाजीपाला व फलोत्पादनाकडे झपाट्याने वळत आहेत. त्यामुळे फळे,भाजीपाल्याचे उत्पादन वाढले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

परंतु अनेकदा शेतकऱ्यांना कष्टाच्या आणि खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळत नाही हीदेखील वस्तुस्थिती आहे. परंतु, शेतकरी आता झपाट्याने नवतंत्रांचा अवलंब करीत आहेत. त्यांचा नगदी पिकांकडे (कॅश क्रॉप) ओढा आहे. भरपूर उत्पादन आणि गुणवत्तेसाठी ते अधिक प्रयोगशील होत आहेत. माझ्या नजरेतून भारतीय शेतकरी शेतीविषयक शास्त्रोक्त माहिती, नवतंत्र, नव्या पद्धती याविषयी सजग होतो आहे. शेतकरी अशा चांगल्या मानसिकतेत असतानाच सरकारने ड्रोन वापरण्यासंदर्भात धोरण आणले आहे. माझ्या मते येत्या काही वर्षात भारतीय शेतीत ड्रोन तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

कारण, देशात शेतीसाठी मजुरांची तीव्र टंचाई आहे. त्यामुळेच भारतीय शेतकरी वेगाने स्वयंचलन (ऑटोमेशन) तंत्राचा स्वीकार करतील. ड्रोन हा ऑटोमेशनमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. सध्या ड्रोनची किंमत जास्त आहे. त्याचा वापरही अत्यल्प होतो आहे. परंतु, हे चित्र भविष्यात बदलेल. मी तुम्हाला सांगतोय की, एकदा का ड्रोनचा वापर वाढला की आपोआप शेतीत विद्राव्य खतांचा (लिक्विड फर्टिलायझर्स) वापर झपाट्याने वाढेल.

तुम्ही बघा, एखाद्या भागातून महामार्ग गेल्यास तेथे जसे झपाट्याने शहरीकरण होते किंवा उद्योग वाढतात; अगदी तसेच ड्रोनमुळे विद्राव्य खतांचा वापर वाढणार आहे. त्यामुळे या पुढील काळात नॅनो विद्राव्य खतांचा वापर निश्चित वाढेल. शेतकरी डिजिटल युगात जात आहेत. शेतकऱ्यांच्या नवपिढीकडून होणारा नवतंत्रांचा, शास्त्रोक्त पद्धतींचा, ऑटोमेशनचा वाढता वापर यामुळे देशाचे कृषी भवितव्य आश्वासक आहे.

Madan Pandey, Managing Director, Zuari PharmHub Limited
Interview with Dr. Manish Das : अर्क औषधी, सुगंधी वनस्पती संशोधनाचा!

नेमक्या कोणत्या समस्या दिसत आहेत?

सर्वात मुख्य समस्या बाजारभावाची आहे. इतर कोणत्याही उद्योगापेक्षा शेतीमध्ये तयार होणाऱ्या मालाच्या भावाबाबत सर्वाधिक अनिश्चितता आहे. आपला शेतकरी सतत अनिश्चित अशा घडामोडींचा सामना करीत असतो. मग तो मॉन्सून असो, नैसर्गिक आपत्ती असोत की बाजारभाव असोत. त्यात केव्हा, काय होईल हेच सांगता येत नाही. या संकटांशी सामना करीत भारतीय शेतकरी वाटचाल करीत असतो. त्याची ही जिद्द वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या कष्टामुळेच हा देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला आहे.

शेतीमधील समस्यांच्या मुळाशी जी कारणं आहेत, त्यात प्रमुख मुद्दा आहे उपलब्धतेच्या अभावाचा (अॅक्सेस डेफिसिट). हा अभाव दर्जेदार बियाणे, बाजारपेठ, पुरवठा साखळी, साठवणगृहे, पायाभूत सुविधा अशा कितीतरी बाबींचा आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला चांगले भाव मिळत नाहीत. भाव नसल्यास माल साठवून ठेवायचा तर साठवण सुविधा नाहीत. नुकताच माझ्या वाचनात एक अहवाल आला. काही घटनांमध्ये शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा केवळ ३०-३५ टक्के मोबदला मिळालेला आहे. उर्वरित ६५-७० टक्के नफा हा व्यापारी वर्गाच्या साखळीला मिळतो आहे. पुरवठा साखळीच्या अभावामुळे हे घडते आहे.

आणखी एक मोठी समस्या मी तुम्हाला सांगतोय ती जमीन नापिकीची. जमिनीमधील सेंद्रिय कर्ब पातळी कमालीची घटलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खतांची शक्ती पूर्णत्वाने वापरताच येत नाही. २५-३० वर्षांपूर्वी समजा एक किलो खत लागत असेल तर आता तेथे अडीच- तीन किलो खत वापरावे लागतेय. कारण, जमीन सुपीकता घटलेली आहे. हे सारे सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे होत आहे. हा कर्ब खरं तर सूक्ष्मजीवांचं अन्न आहे. सूक्ष्मजीव असल्याशिवाय मृदा सुपीक, आरोग्यदायी होऊ शकत नाही.

सूक्ष्मजीव असले तरच पिकांकडून खत ग्रहण करण्याचे (फर्टिलायझर अपटेक) प्रमाण वाढते. त्यातून वनस्पतीचे पोषण वाढते आणि मग उत्पादकता चांगली मिळते. माझ्या मते आपल्याला या मुद्द्यावर गांभीर्यानं काम करावं लागेल. पोषण, पीक संरक्षण, उत्पादकता हे सारे विषय एकात एक गुंतलेले आहेत. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांना त्यासाठी कसे बळकट करता येईल, याचा विचार धोरणकर्त्यांना करावा लागेल. अनेकदा असंतुलितपणे खताचा वापर होतो, तो थांबला पाहिजे. पिकांची सतत फेरपालट केली पाहिजे.

आणखी एक समस्या म्हणजे माहितीची अनुपलब्धता (डेटा डेफिसिट). कधी पेरावे, नवतंत्र कसे वापरावे किंवा लागवड कशी करावी, मातीचा ओलावा किती आहे, कधी सिंचन करावे, मातीत नेमके कोणते घटक आहे अशी विविध माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध नसते. आता डिजिटल युगामुळे ही उणीव भरून निघते आहे. शेतकऱ्यांना माहिती मिळते आहे. परंतु, त्याचा वेग, अचूकता, विस्तार वाढवायला हवा. माझ्या मते या प्रमुख समस्यांवर काम होण्याची आवश्यकता आहे.

Madan Pandey, Managing Director, Zuari PharmHub Limited
Interview with Manikrao Khule : ऑक्टोबरमध्ये पाऊस दणका देणार का?

झुआरी फार्महब भविष्यात कोणते नवतंत्र आणणार आहे?

ड्रोनप्रमाणेच नॅनो तंत्रज्ञानदेखील देशाच्या कृषी व्यवस्थेत मोठी भूमिका बजावणार आहे. त्यामुळे आम्ही आता खतांमध्ये जैव पद्धतीवर आधारित नॅनो तंत्रज्ञान आणू इच्छितो. त्यासाठी खूप गांभीर्याने काम करत आहोत. आमचे नॅनो तंत्रज्ञान रासायनिक प्रक्रियेवर नव्हे तर जैव प्रक्रियेवर आधारित असेल.

देशातील बहुतेक सर्व विद्यापीठांमध्ये, शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये आमच्या उत्पादनांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यांचे निष्कर्ष अतिशय चांगले आहेत. आम्हाला शेतकऱ्यांना केवळ उत्पादने विकायची नसून त्यांना कमी गुंतवणुकीत जादा व दर्जेदार उत्पादनाकडे नेणे तसेच त्यांना शाश्वत शेती व्यवस्थेकडे नेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.

झुआरी फार्महब आता शेती व्यवस्थेसाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकेल?

देशाच्या कृषी व्यवस्थेत शेतकऱ्यांसाठी गेल्या पाच दशकांपासून कार्यरत असणाऱ्या अॅडव्हेन्टेज समूहाने ( Adventz Group) झुआरी अॅग्रो केमिकल्स्, पारादीप फॉस्फेटस्, मॅंगलोर केमिकल्स् अॅन्ड फर्टिलायझर्स उपक्रम सुरू केले. त्यानंतर काही वर्षांपूर्वी झुआरी फार्महब हा एक नवा उपक्रम आणला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व सुविधा एका छताखाली देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यात ड्रोन, कर्ज, पशुपालन, माती परीक्षण, पोषण, पीक संरक्षण, प्रशिक्षण, पीकसल्ला, बाजारव्यवस्थेशी जोडणी याच्याशी संबंधित सेवा तसेच कस्टमाईज्ड सोल्यूशन्स असे सारे देणार आहोत.

त्यासाठी आम्ही जयकिसान जंक्शन स्टोअर, डिजिटल किऑस्क, मोबाईल अॅप्लिकेशन किंवा प्रत्यक्ष प्रतिनिधी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत. आम्हाला मुख्यत्वे पिकाची अन्नद्रव्ये, पीकसंरक्षण आणि विस्तार सेवा यावर भर द्यायचा आहे. आधी मी सांगितले तसे जयकिसानची ६०० रिटेल स्टोअर्स आम्ही उघडली आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादने द्यावी; पण त्याच बरोबर सेवा, माहिती, सल्ला द्यावा, असे अपेक्षित आहे. त्यासाठी आम्ही इक्रिसॅट या संस्थेची मदत घेत आहोत. आम्हाला शेतकऱ्यांना इ-कॉमर्सबाबत सजग करायचे आहे. शेतकऱ्यांना शेतीमधील काय हवे ते त्यांनी ऑनलाइन सांगावे व त्याचा पुरवठा आम्ही थेट शेतशिवारात करावा, असे आम्हाला अपेक्षित आहे. कर्नाटकात ही सेवा सुरु झाली असून लवकरच महाराष्ट्रात सुरू होईल. यावर्षी आम्ही १००० कोटी रुपयांचा व्यावसायिक उलाढालीचा टप्पादेखील गाठणार आहोत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com