सांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र या सूर्यवंशी बंधूंनी सात ते आठ वर्षांचे सातत्य ठेवत ऑयस्टर मशरूम (अळिंबी) व्यवसाय यशस्वी केला आहे. दर्जेदार उत्पादन घेत 'सूर्यवंशी मशरूम' या ब्रॅंडने मुंबई येथील तारांकित होटेल्सचे मार्केट त्यांनी मिळवले आहे. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात बावची हे गाव आहे. ऊस या मुख्य पिकासह हळदीची लागवडही गावात चांगल्या प्रकारे होते. दोन्ही पिकांच्या उत्पादनात इथला शेतकरी माहिर आहे. याच गावात प्रदीप शिवाजी सूर्यवंशी राहतात. आई सौ. विमल, वडील शिवाजी, बंधू राजेंद्र असे मिळून दहा सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वी कमजोर असल्याने दोघा भावांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. वडिलांसोबतच ते शेतीत कष्ट करायचे. पण श्रम व चिकाटी हे गुण कायम जपले. रेशीम शेतीचा अनुभव ऊसशेतीला आधार म्हणून पूरक व्यवसायाकडे ते वळले. कृषी विभागाच्या माध्यमातून सन २००२ मध्ये रेशीम शेती सुरु केली. त्यातील बारकावे, बाजारपेठ यांचा अभ्यास केला. दर्जेदार कोष निर्मिती होऊ लागली. महाराष्ट्र शासनाचा रेशीम पंडित पुरस्कारही मिळाला. पुढे अनेक संकटे आली. वाढता खर्च, कोषांना मिळणारा दर यांचा ताळमेळ बसणे मुश्कील झाले. मग २०१० मध्ये हा व्यवसाय करणे थांबवले. नव्या उमेदीने नवा शोध नव्या व्यवसायाच्या शोधात सूर्यवंशी होते. पण भांडवल गुंतवून अतिरिक्त खर्च करण्यापेक्षा तयार रेशीम शेडमध्येच व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न होता. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथील श्री.. लाटे यांच्याकडील अळिंबी (मशरूम) व्यवसायाची माहिती मिळाली. तेथे जाऊन दहा दिवस मुक्काम ठोकला. बेडनिर्मितीपासून ते उत्पादन, पॅकिंगपर्यंतचे शिक्षण घेतले. बाजारपेठ शोधण्याचेही आव्हानही होते. त्याचाही अभ्यास केला. रीतसर प्रशिक्षण मशरूम निर्मितीचे शास्त्रीय प्रशिक्षण आवश्यक होते. दर्जेदार उत्पादन झाले तरच मार्केटमध्ये टिकणे शक्य होते. त्यादृष्टीने पुणे येथील कृषी महाविद्यालयातील अखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन प्रकल्पामध्ये प्रशिक्षण घेतले. येथील कृषी सहाय्यक नामदेव देसाई आणि कवकशास्त्रज्ञ डॉ. अशोक जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. मशरूम निर्मिती ३६ बाय १२ फूट रेशीम शेडचा वापर मशरूम तयार करण्यासाठी केला. स्पॉन निर्जंतुकीकरणासाठी वेगळी खोली (कक्ष) तयार केली. सुरवातीला बाजारपेठेतील मागणीचा पूर्ण अंदाज नव्हता. त्यामुळे अत्यल्प प्रमाणात उत्पादन सुरु केले. मशरूम तयार करताना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. मुंबईची बाजारपेठ अळिंबीचे मार्केटिंग करणे सोपी गोष्ट नव्हती. त्याचे कारण म्हणजे मशरूम खाणारा वर्ग वेगळा आहे. मुंबईतील ‘थ्री स्टार’, फाइव्ह स्टार होटेल्स’ तसेच चायनीज रेस्टॉरंट येथे अळिंबीला मागणी असते हे सूर्यवंशी यांनी ओळखले. त्यांचे भाचे शशिकांत गायकवाड मुंबईत राहतात. मग थेट मुंबई गाठली. त्यांना घेऊन मुंबईतील ठराविक हॉटेल्समध्ये उत्पादित मशरूम घेऊन गेले. तेथे चवीसाठी नमुने दिले. त्याचे अभिप्राय घेतले. पसंतीस उतरल्यानंतर पुढील उत्पादन व विक्री सुरु केली. बाजारपेठेसाठी प्रयत्न हवेत प्रदीप सांगतात की मशरूम ही संकल्पना अजूनही ग्रामीण भागात तेवढी रुजलेली नाही. त्यामुळे उत्पादन घेणे तितकेच जोखमीचे आहे. ग्राहक मिळाला नाही तर तोटाही होऊ शकतो. आम्ही ग्रामीण भागात विक्रीसाठी पुढाकार घेतला. मशरूमची रेसिपी देखील सोबत द्यायचो. परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे हा व्यवसाय करायचा असेल तर बाजारपेठ शोध, जोखीम, स्वजबाबदारी या बाबी स्वीकारणे गरजेचे आहे. स्वतः ‘मार्केटिंग’साठी चांगले प्रयत्न केले पाहिजेत. मागणी व जमा-खर्चाचा अभ्यास करूनच उत्पादनाचा विचार केला पाहिजे. कोरोनाचे संकट गेली दीड वर्षे कोरोनाचे संकट होते. त्यावेळी हॉटेल्स बंद होती. त्याकाळात उत्पादन कमी झाले. आता हळू हळू हॉटेल्स सुरू झाली आहेत. त्यामुळे पुन्हा उत्पादनाला चालना मिळाली आहे.अडचणीच्यावेळी आपल्याकडे मशरूम तयार असायला हवे. अन्यथा ग्राहक तुटू शकतो. अशावेळी पर्यायी व्यवस्था म्हणून वाळवलेले मशरूम तयार करण्यास सुरवात केली. त्यामुळे वेळेत देणे शक्य होते असे सूर्यवंशी सांगतात. अळिंबी व्यवसाय- ठळक बाबी
उत्पादन व विक्री
संपर्क- प्रदीप सूर्यवंशी-९९७५३८२६३५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.