Soybean Farming : सुधारित लागवड तंत्रातून उत्पादनवाढीचे नियोजन

Soybean Cultivation : डॉ. अनिल उद्धवराव बुलबुले हे वैद्यकीय शाखेतील पदवीधर असून, त्यांनी सोयाबीन लागवडीमध्ये वेगळी ओळख तयार केली आहे.
Soybean Farming
Soybean FarmingAgrowon

शेतकरी नियोजन

पीक : सोयाबीन

शेतकरी : डॉ.अनिल बुलबुले

गाव : बोरी,ता. जिंतूर, जि. परभणी

सोयाबीन क्षेत्र : सहा एकर

डॉ. अनिल उद्धवराव बुलबुले हे वैद्यकीय शाखेतील पदवीधर असून, त्यांनी सोयाबीन लागवडीमध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. बोरी शिवारात त्यांची १२ एकर शेती आहे. २००० पासून ते महाबीज अंतर्गत सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम घेतात. डॉ. बुलबुले हे २००० ते २०१९ पर्यंत सोयाबीनच्या जे.एस. ३३५ जातीची लागवड करत होते.

त्या वेळी बैलचलित अवजाराद्वारे दोन ओळीत १८ इंच, तर दोन झाडांमध्ये ३ ते ४ इंच अंतर ठेवून पेरणी करत असत. या पद्धतीने एकरी ३० किलो बियाणे लागत असे. तण नियंत्रणासाठी खुरपणी, कोळपणी करत असत. २००७ पासून त्यांनी बैलचलित पेरणी यंत्राचा वापर सुरू केला. जे.एस. ३३५ या जातीचे सरासरी एकरी १० ते १३ क्विंटल उत्पादन मिळायचे.

२०२० मध्ये त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीनच्या एमएयूएस ६१२ या जातीची दोन ओळींतील १८ इंच अंतर ठेवून सहा एकर सीताफळ बागेत आंतरपीक आणि सलग सहा एकरावर बीजोत्पादन घेतले होते. २०२१ मध्ये जेएस-३३५ आणि २०२२ आणि २०२३ या वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले संगम (केडीएस-७२६) या जातीची लागवड केली होती.

Soybean Farming
Soybean Farming : उत्पादनक्षम जातींच्या निवडीवर भर

जोडओळ पद्धतीने लागवड

डॉ. बुलबुले यांनी २०२३ मध्ये जोडओळ पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवड केली होती. जमीन तयार झाल्यानंतर बैलचलित यंत्राद्वारे सिंगल सुपर फॉस्फेट २०० किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट १० किलो एकरी याप्रमाणात खत मात्रा दिली. यंत्राने खत दिल्याने रेषा पडल्या. दोन ओळींत दोन फूट आणि दोन जोडओळींतील अंतर तीन फूट ठेऊन हस्तचलित टोकण यंत्राद्वारे पेरणी करताना दोन बियांतील अंतर ७.५ इंच ठेवले. एका जागी २ ते ३ बिया टाकल्या. या पद्धतीने एकरी १४ किलो बियाणे लागले. लागवडीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया केल्याने उगवण चांगली झाली.

दोन ओळींमध्ये लॅटरल अंथरली. त्यामुळे पावसाच्या खंडकाळात दोनवेळा ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे फायदेशीर ठरले.

पूर्वी खुरपणी, कोळपणीद्वारे आंतरमशागत करून तण नियंत्रण करत असत. २०१० पासून सोयाबीनमध्ये तणनाशकांचा वापरास सुरुवात केली. त्यामुळे आता खुरपणी बंद झाली आहे. २० ते ३० दिवसांच्या दरम्यानच्या एक कोळपणी केली जाते.

एकात्मिक पद्धतीने कीड,रोग नियंत्रणावर भर दिला जातो. पीक उगवण झाल्यानंतर विसाव्या दिवशी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बुरशीनाशकाची फवारणी घेतली जाते. वाढीच्या टप्प्यात प्रादुर्भाव तपासून खोडमाशी, पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी करतात.

चाळीसाव्या दिवशी पीक फुलोरा अवस्थेत असताना गरज असेल तर बुरशीनाशक तसेच फुले, कळी खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी घेतली जाते. डॉ. बुलबुले यांना एकरी सरासरी १० ते १३ क्विंटल उत्पादन मिळते. गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीतही ठिबक सिंचनावर एकरी १३ क्विंटल सोयाबीनचे चांगले बीजोत्पादन घेतल्याबद्दल ‘महाबीज’तर्फे त्यांना गौरविण्यात आले होते.

Soybean Farming
Soybean Management : सोयाबीन पिकातील पाणी बचतीचे उपाय

यंदाचे नियोजन

पाच एकरांवर गादी वाफा पद्धतीने सोयाबीन लागवडीचे नियोजन आहे. लागवडीसाठी फुले किमया (केडीएस ७५३) या जातीची निवड केली आहे. या जातीचा कालावधी १०५ दिवसांचा आहे. उत्पादनदेखील चांगले मिळते.

हरभरा काढणीनंतर जमिनीची नांगरणी केली आहे. माती परीक्षण, पिकाच्या गरजेनुसार शिफारशीनुसार खतमात्रांचे नियोजन केले जाते. या वर्षी एकरी १२ः३२ः१६ खत १०० किलो तसेच मॅग्नेशिअम सल्फेट १० किलो, बेन्टोनाइट सल्फर १० किलो खत मात्रा देणार आहे. दर तीन वर्षाला जमीन आणि पिकाची गरज लक्षात घेऊन खत मात्रा बदलली जाते. खत बदलताना सिंगल सुपर फॉस्फेट एकरी २०० किलो देतो. त्यामुळे जमिनीतील सल्फर, कॅल्शिअमचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

शिफारशीत खताची मात्रा दिल्यानंतर रोटाव्हेटर फिरविणार आहे. त्यानंतर ट्रॅक्टरचलित यंत्राव्दाद्वारे गादी वाफे तयार करून त्यावर लागवड करणार आहे. गादीवाफ्याचा आकार दोन फूट आणि दोन गादीवाफ्यांतील सरी ३ फूट असेल. त्यामुळे ठिबक सिंचन करणे सोपे जाणार आहे. दोन ठिबकच्या नळीतील अंतर पाच फूट ठेवणार आहे.

वखराने गादी वाफ्याचा वरचा भाग सपाट करून दोन ओळींत सव्वा ते दीड फूट आणि दोन झाडांत पाच इंच अंतर ठेवून हस्तचलित टोकण यंत्राद्वारे बियाणे लागवड करणार आहे. सध्या विहिरीला पाणी नाही. पाऊस पडल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यानंतरच लागवड करणार आहे. लागवड केल्यानंतर ठिबक सिंचनासाठी लॅटरल अंथरणार आहे. त्यामुळे खंडकाळात पाणी देणे सोपे जाणार आहे.

डॉ. अनिल बुलबुले, ९४२१३८८४१६

(शब्दांकन : माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com