Mulshi Dam : मुळशी धरणग्रस्तांच्या समस्या आजही कायम - नंदिनी ओझा

Dam Affected : मुळशी धरणातून निर्माण झालेल्या येथील धरणग्रस्तांच्या समस्या शंभर वर्षानंतरही आपण सोडवू शकलो नाही.
Mulshi Dam
Mulshi DamAgrowon

Pune News : ‘‘मुळशी धरणातून निर्माण झालेल्या येथील धरणग्रस्तांच्या समस्या शंभर वर्षानंतरही आपण सोडवू शकलो नाही. धरणावरील कोणा एका कंपनीचा ताबाही आजपर्यंत तसाच आहे.

हे बदलायचे असेल तर हा संघर्ष लोकांसमोर यायला पाहिजे. लोकांमधील इतिहासकार लिहीत राहतील, तोपर्यंत सत्य जगासमोर येत राहील,’’ असे मत नर्मदा आंदोलनाचा मौखिक इतिहास लिहिणाऱ्या नंदिनी ओझा यांनी व्यक्त केले.

ऐतिहासिक मुळशी सत्याग्रहाच्या १०३व्या स्मृतीदिनानिमित्त पौड (ता. मुळशी) येथे लेखक बबन मिंडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या ‘मुळशी सत्याग्रह : जगातील पहिला धरणविरोधी दीर्घ लढा’ या माहितीपटाच्या चर्चेदरम्यान ओझा बोलत होत्या.

Mulshi Dam
Mulshi Dam : मुळशी धरणाची उंची वाढणार!; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार

यावेळी व्यासपीठावर टाटा धरणग्रस्तांच्या नेत्या सुनीती सु. र., विंदा भुस्कुटे आणि विद्याधर भुस्कुटे उपस्थित होते. मुळशी सत्याग्रह इतिहास लेखन मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, दादाराम मांडेकर आदी उपस्थित होते.

यावेळी सुनीती सु. र. यांनी टाटा धरणग्रस्तांनी एकत्रित येऊन लढा देण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘‘टाटा धरणग्रस्तांसाठी अजून गावठाण उपलब्ध नाही. २७ हजार एकर अतिरिक्त जमीन अजूनही कंपनीच्या ताब्यात आहे.

ज्या कारणासाठी जमीन घेतली त्या कारणासाठी ती वापरली जात नसेल तर अशा प्रकल्पातील जमीन ज्या किमतीने घेतली त्याच किमतीने परत देण्याची कायद्यात तरतूद असताना ही जमीन अजूनही कंपनीच्या ताब्यात आहे.या जमिनी शेतकरी कसत आहे, त्याचा भाडेपट्टा मात्र कंपनी १०० वर्षे घेत आहे. शेतकरीही देत आहे. मात्र कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर आणि कुळ कायदाही असताना, तो कुळ कायदा टाटा कंपनीला लागू होत नाही.’’

Mulshi Dam
Mulshi Dam : मुळशी धरणाची क्षमता दोन टीएमसीने वाढणार

मिंडे म्हणाले, ‘‘मुळशीचा सत्याग्रह ‘जान किंवा जमीन’ या घोषणेपासून सुरू झाला होता. आज तो ‘लढेंगे जितेंगे’ या घोषणेपर्यंत आला आहे. यामधल्या शंभर वर्षांच्या काळात खूप काही घडलं. जे घडलं त्याच्या नोंदी या माहितीपटात आहेत आणि त्या जगासमोर आल्या पाहिजेत म्हणूनच हा माहितीपट बनवला आहे.’’

विंदा भुस्कुटे यांनी मुळशी सत्याग्रहाचे प्रवर्तक विनायकराव भुस्कुटे यांच्या त्या काळातील दैनंदिनीविषयी सांगताना दैनंदिनीमधील काही उतारे वाचून दाखवले. एकनाथ दिघे व अनिल पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. रमेश ससार यांनी प्रास्ताविक; तर बंडू दातीर यांनी सूत्रसंचालन केले. धोंडिबा कुंभार यांनी आभार मानले.

आज टाटा कंपनीकडून कुठलीही कागदपत्र उपलब्ध होत नाहीत. त्या काळातला सरकार आणि टाटा कंपनी यातील पत्रव्यवहारही सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे सत्य लोकांसमोर येत नाही. मात्र, लोकांमधून आलेले इतिहासकार जोपर्यंत हा सगळा इतिहास लिहीत राहतील, तोपर्यंत सत्य लपवलं जाणार नाही. लोकांमधून आलेला आणि लोकांनी सांगितलेला इतिहास अधिक विश्वासार्ह असतो. त्या अर्थाने बबन मिंडे यांचा हा माहितीपट याचे उत्तम उदाहरण आहे.
- नंदिनी ओझा, लेखिका, इतिहास अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com