
Mumbai News : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याबाबतचा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेला प्राथमिक अहवाल कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांच्याकडे सोपविला.
हा विषय यंदापासून अभ्यासक्रमात असेल की, पुढील वर्षांपासून याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याबाबत २८ एप्रिल रोजी शालेय शिक्षण विभागाची बैठक असून त्यामध्ये या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
कृषी विषयाचा शालेय शिक्षणात कशा प्रकारे समावेश करावा, याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याचे श्री. सत्तार यांनी सांगितले.
शालेय शिक्षणात कृषी विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे तयार केलेल्या समितीमध्ये परिषदेचे दोन सदस्य, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळांचे दोन, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे दोन अशा सहा सदस्यांची समिती नेमली होती.
विषयांची पुनर्रचना करताना तसेच पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करताना या अहवालाचा विचार करावा, अशी शिफारस या समितीने केली आहे. तसेच अभ्यासक्रम समितीसमोर हा अहवाल विचारार्थ ठेवावा, असेही अहवालात नमूद केले आहे.
‘‘कृषिकेंद्रित आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल. तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण होईल,’’ असा यामागे आग्रह असल्याचे सत्तार म्हणाले.
यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ई. मु. काझी, कृषी विभागाचे सहसचिव बाळासाहेब रासकर, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी संचालक (शिक्षण) प्रा. डॉ. उत्तम कदम, संचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर, अवर सचिव उमेश चांदिवडे आदींची या वेळी उपस्थिती होती.
तीन टप्प्यांत अभ्यासक्रम असावा
‘‘कृषी शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी तीन टप्प्यांसाठी अभ्यासक्रम तयार करावा,’’ अशी सूचना सत्तार यांनी केली. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी कृषी विभाग घेईल, असेही त्यांनी सूचित केले.
केसरकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषदेने तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा. अभ्यासक्रमाची रचना करताना विद्यार्थ्यांना त्या विषयाबद्दल रुची निर्माण होईल, या पद्धतीने असावी.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.