Desi Cucumber Farming: देशी वाणाच्या काकडी लागवडीवर भर

Agriculture Success: गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील राजेंद्र तासगावे यांनी उन्हाळी हंगामासाठी ऊस खोडव्यानंतर देशी वाणाच्या काकडीची यशस्वी लागवड केली आहे. योग्य नियोजन, सिंचन आणि बाजारपेठेची निवड यांच्या जोरावर त्यांनी उत्पादन घेतले.
Cucumber Farming
Cucumber FarmingAgrowon
Published on
Updated on

Summer Vegetable Cultivation :

शेतकरी नियोजन । पीक : काकडी

शेतकरी : राजेंद्र बाबूराव तासगावे

गाव : गणेशवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

काकडी लागवड : एक एकर

गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील राजेंद्र बाबूराव तासगावे यांची एकूण पावणेपाच एकर शेती आहे. त्यापैकी बहुतांशी क्षेत्रात ऊस लागवड असते. उन्हाळी हंगामात बाजारात काकडीस चांगली मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन काकडी लागवड करण्याचा निर्णय घेतला. काकडी उत्पादकांसोबत चर्चा करून बाजारात चांगली मागणी असलेल्या देशी वाणाची लागवड केली. फेब्रुवारीत खोडवा गेल्यानंतर त्याच क्षेत्रात काकडी लागवडीसाठी तयारी केली. या वर्षी वाढत्या तापमानामुळे काकडी उत्पादनात घट आल्याचे राजेंद्र तासगावे सांगतात.

Cucumber Farming
Cucumber Farming: उन्हाळ्यातली सुवर्णसंधी! कमी खर्चात जादा नफा! पाहूयात काकडी शेतीचे यशस्वी तंत्र!

लागवड नियोजन

खोडवा ऊस तोडणी झाल्‍यानंतर रोटर मारून शेत तयार केले. पूर्वमशागतीवेळी एकरी ४ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत देऊन पुन्हा रोटर मारला. त्यानंतर ठिबकच्या नळ्या अंथरण्यात आल्या.

साधारणपणे २४-२५ फेब्रुवारीच्या दरम्यान दोन सरींमध्ये ८ फूट, तर वेलींमधील सव्वा फूट अंतर राखत टोकण पद्धतीने देशी काकडी वाणाची लागवड केली. देशी वाणाच्या काकडीचा आकार छोटा असला तरी चवीला गोडी असते. त्यामुळे बाजारात चांगली मागणी असून दरही चांगले मिळतात. शिवाय लागवडीसाठी बेड तयार करणे आणि रोपांना आधार देण्यासाठी मंडप उभारण्याची आवश्यकता भासत नाही, असे श्री. तासगावे सांगतात.

लागवडीसाठी एकरी साधारणतः ३०० ग्रॅम बियाणे लागले. बियाणे टोकण केल्यानंतर साधारण ८ दिवसांच्या कालावधीत उगवण झाली. सुरुवातीच्या काळात प्रतिदिन अर्धा तास याप्रमाणे ठिबक संचाने पाणी दिले. मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला. याकाळात दररोज एक तास ठिबकद्वारे सिंचन केले. वेलीच्या वाढीनुसार तापमानाचा अंदाज घेऊन सिंचनाचा कालावधी वाढविला.

लागवडीनंतर दर पाच ते सात दिवसांनी रासायनिक खतांचा वापर करण्यात आला. तसेच पिकाचे नियमित निरीक्षण करून प्रतिबंधात्मक रासायनिक फवारण्या घेण्यात आल्या. बदलते हवामान आणि पिकाची अवस्था पाहून कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या फवारण्या घेण्यात आल्या आहेत. या वर्षी अति तापमान व अचानक ढगाळ हवामान अशी स्थिती असल्यामुळे रोग- किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता होती. त्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करण्यावर भर देण्यात आला.

Cucumber Farming
Cucumber price: उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला मागणी

अन्नद्रव्ये व्यवस्थापन

रोप एका पानावर आल्यानंतर ठिबकमधून सुरुवातीचे आठ दिवस ह्युमिक ॲसिड, १९ः१९ः१९ या विद्राव्य खतांचा वापर केला.

वेलीच्या वाढीसाठी १३ः४०ः१३, सूक्ष्म अन्नद्रव्ये, मॅग्नेशिअम सल्फेटचा वापर.

फुलधारणेच्या सुरुवातीस १३ः०ः४५, कॅल्शिअम नायट्रेटचा वापर.

फळधारणेस सुरुवात झाल्यानंतर फुलकिडे, पांढरी माशी, नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येण्यास सुरुवात झाली. पिकाचे नियमित निरीक्षण करून नियंत्रणासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर केला.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकामध्ये पिवळे आणि निळे चिकट सापळे लावण्यात आले.

स्थानिक बाजारात विक्री

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिला तोडा झाला. त्यातून साधारण ६० ते ७० किलो उत्पादन मिळाले. सुरुवातीच्या काळात उत्पादन कमी होते. मात्र हळूहळू उत्पादनात वाढत गेले. मार्च- एप्रिल महिन्यात पूर्ण क्षमतेने काकडीचे उत्पादन मिळू लागले. आतापर्यंत ३० ते ३५ तोडे झाले आहेत. उत्पादित काकडीची कुरुंदवाड येथील बाजारपेठेत विक्री करण्यात आली.

आगामी नियोजन

सध्या काकडीचा प्‍लॉट अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ३० ते ३५ तोडे झाले आहेत. या वर्षी तापमानात जास्त वाढ झाल्याने काकडीची वाढ अपेक्षित झाली नाही, परिणामी उत्पादनात घट आली.

मागील आठवड्यापासून मॉन्सूनपूर्व पाऊस होत आहे. त्यामुळे सिंचन करणे कमी केले आहे. मात्र ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने योग्य काळजी घेत आहे.

पुढील साधारण पंधरा दिवस हंगाम चालेल अशी शक्यता आहे. त्यातून २०० ते ३०० किलो काकडी उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.

काकडीचे तोडे पूर्ण झाल्यानंतर खरीप हंगाम नियोजनानुसार पीक लागवडीसाठी शेत तयार केले जाईल.

- राजेंद्र तासगावे ९७६५७८९९११

(शब्दांकन : राजकुमार चौगुले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com