Pre Monsoon Rain : रायगड जिल्ह्याला पूर्वमोसमीचा तडाखा

Rain Update : गेल्‍या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याला पूर्व मोसमी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्‍यामुळे उन्‍हाळी भातशेतीसह, आंबा बागायतदार, वीटभट्टीचे मालक आदींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Mumbai News : गेल्‍या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याला पूर्व मोसमी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्‍यामुळे उन्‍हाळी भातशेतीसह, आंबा बागायतदार, वीटभट्टीचे मालक आदींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे; तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्‍यामुळे शासनाकडून मदतीचे अपेक्षा करण्यात येत आहे.  

पेण तालुक्यातील शेतकरी हे हेटवणे धरणाच्या पाण्यावर उन्हाळी भातशेती मोठ्या प्रमाणात करत असतात. पावसाळी भातशेतीपेक्षा उन्हाळी शेतीवर कमी खर्च येतो. त्‍यामुळे उन्हाळी भातशेती करण्याकडे शेतकरी जास्त कल देत आहेत; परंतु गेल्या काही दिवसांपासून अवकाळीने पेणकरांना अक्षरशः झोडपले असून तयार झालेली भातशेती आडवी झाल्‍याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Crop Damage
Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर

काही शेतकऱ्यांनी तयार झालेली भातशेती कापून ठेवली होती, तर काही भातशेती कापण्याच्या तयारीत होते; परंतु अचानकपणे अवकाळीने हजेरी लावल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनाकडून करण्यात येत आहे.

उन्हाळी भातशेतीची लागवड करण्यात आली होती; परंतु वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने तयार झालेली भातशेती आडवी झाल्याने खुप नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून भरघोस नुकसानभरपाई द्यावी.
सागर पाटील, शेतकरी
ज्या ज्या भागात उन्हाळी भातशेतीची लागवड करण्यात आलेली आहे, अवकाळीने ज्‍या शेतकऱ्यांच्‍या भातशेतीचे नुकसान झाले आहे, त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधवा.
सागर वाडकर, तालुका कृषी अधिकारी, पेण
Crop Damage
Pre-Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाने शेतकरी हवालदिल

रोहे तालुक्यात सलग तीन दिवस तुफान वादळी वाऱ्यासहित बिगर मोसमी पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. या तुफान वादळी वाऱ्यासहित कोसळलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कोलाड विभागाला बसला असून सोसायट्याच्या वाऱ्यात कोलाड - सुतारवाडी मार्गावरील जावटे गावातील पांडुरंग सखाराम शेंपोडे यांच्या राहत्या घरावरील पत्र्याचा शेड उडून गेल्याने त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे; तर कुडली भागात अनेक पोल्ट्री फार्मवरील पत्राशेड उडाल्याने लघु उद्योजकांना आर्थिक फटका बसला आहे.

तालुक्यात अवकाळीने हाहाकार माजवला आहे. वादळी वाऱ्यासहित कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे साऱ्यांची दाणादाण उडाली आहे. तालुक्यातील कोलाड परिसरातील जावटे, खांब, तिसे, महादेववाडी, पुई, मुठवली, वरसगाव, चिंचवळी, कुडली, नडवली, हेटवणे इत्यादी भागाला या अवकाळीने झोडपून काढले आहे.

वीटभट्टीमालकांचे नुकसान

मागील आठवड्यात अवकाळीने सर्वच क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वीटभट्टी व आंबा बागायतदारांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. अवकाळीने अनेकांची फळे खराब झाली आहेत; तर कच्च्या वीटांचे पाण्यामुळे चिखल झाला असल्‍याने वीटभट्टी मालकांचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com