Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. ३०) अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत विविध पक्षांच्या जागावाटपाचा घोळ कायम राहिला. काही पक्षांनी सोमवारी रात्री, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने मंगळवारी सकाळी उमेदवार जाहीर केले.
जागावाटपाचा घोळ सर्वच पक्षांत असला तरी आपल्या संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्म दिले. त्यामुळे जागा जाहीर झाल्या झाल्या अर्ज दाखल करण्यावर भर देण्यात आला. अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याने बंडखोरांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागणार आहेत. ४ नोव्हेंबर रोजी लढती स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने माढा मतदार संघात अभिजित पाटील, मुलुंडमधून संगीता वाझे, मोर्शीतून गिरीश कराळे, पंढरपूरमधून अनिल सावंत, मोहोळमध्ये राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण ८७ उमेदवारांची यादी जाहीर केली असून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
भाजपने दोन उमेदवारांची यादी जाहीर केली असून उमरखेडमधून सुधीर पारवे, तर मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने १५ उमेदवार जाहीर केले असून दोन मतदार संघ सहयोगी पक्षांना दिले आहेत. हातकणंगलेमधून जनसुराज्य शक्ती पक्षांच्या अशोक माने, तर शिरोळमधून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या राजेंद्र यड्रावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपच्या वाट्याला आलेल्या चार जागा मित्रपक्षांना दिल्या असून बडनेरातून युवा स्वाभिमान पार्टी, गंगाखेडमधून राष्ट्रीय समाज पक्ष, कलिनामधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शाहूवाडीतून जनसुराज्य पक्षाला जागा सोडली आहे. यामध्ये बडनेरातून रवी राणा, गंगाखेडमधून महादेव जानकर तर शाहूवाडीतून विनय कोरे यांना उमेदवारी दिली आहे. कलिनातून एका वादग्रस्त अधिकाऱ्याला तिकीट देण्यात येणार असल्याचे समजते.
नवाब मलिक अजित पवार गटाचे उमेदवार
माजी मंत्री नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजपने आग्रह धरला होता. तसेच त्यांचा आम्ही प्रचार करणार नाही अशी उघड भूमिका घेतली होती. मात्र मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एबी फॉर्मसह अर्ज दाखल केला. मलिक हे मानखुर्द शिवाजीनगर येथून रिंगणात उतरणार आहेत, तर त्यांची मुलगी सना मलिक या अणुशक्तीनगरमधून रिंगणात आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.