डॉ. रवींद्र झेंडेPoultry Processing Industry: कोंबडीचे यकृत आणि स्पेंट हेन मांस यांसारख्या कमी मूल्याच्या कुक्कुट उप-उत्पादनांचे वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन करता येते. त्यापासून चिकन लिव्हर पावडर, चिकन लिव्हर च्यूज आणि एक्सट्रुडेड पाळीव प्राणी खाद्यपदार्थ विकसित करता येतात..भारतात कुक्कुटपालन उद्योग हा पशुसंवर्धन क्षेत्रातील सर्वांत वेगाने वाढणारा उद्योग आहे. देशात दरवर्षी साधारणतः ८५१ लक्ष ब्रॉयलर आणि लेयर कोंबड्यांचे उत्पादन होते. कोंबडीचे मांस आणि अंडी यांची मागणी वाढत असताना कुक्कुट प्रक्रिया उद्योगातून मोठ्या प्रमाणावर विविध उपउत्पादने देखील निर्माण होत आहेत. यामध्ये यकृत (लिव्हर), हृदय, पोट, पंख, रक्त, हाडे तसेच भाकड कोंबड्यांचे मांस (स्पेंट हेन) यांचा समावेश होतो. यापैकी अनेक उप-उत्पादने कमी किमतीत विकली जातात किंवा त्यांचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नाही. परिणामी, उद्योगाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते..Backyard Poultry: परसातील कोंबड्यांचा आहाराचा खर्च कमी करायचाय? ५ गोष्टी लक्षात ठेवा.याच पार्श्वभूमीवर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य व महामारीशास्त्र विभागामध्ये कुक्कुट उपउत्पादनांचे मूल्यवर्धन करून पाळीव प्राण्यांसाठी पौष्टिक आणि सुरक्षित खाद्यपदार्थ विकसित करण्याचे संशोधन झाले आहे. या संशोधनातून कुक्कुट यकृत पावडर, कुक्कुट यकृत च्यूज आणि भाकड कोंबड्यांच्या मांसापासून (स्पेंट हेन) पाळीव प्राण्यांसाठी तयार केलेले एक्स्ट्रुडेड खाद्यपदार्थांसारखी उत्पादने विकसित करण्यात आली आहेत..यकृत : पोषणाचा उत्कृष्ट स्रोत१) कोंबड्यांचे यकृत हे अत्यंत पौष्टिक उप-उत्पादन आहे. त्यामध्ये उच्च दर्जाची प्रथिने, लोह, झिंक, फॉस्फरस, सेलेनियम, तसेच जीवनसत्त्व अ, बी १२ आणि फॉलिक ॲसिड यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात..२) मानवी आहाराबरोबरच पाळीव प्राण्यांच्या पोषणासाठी देखील यकृत हा एक उत्कृष्ट घटक मानला जातो. तथापि, ताज्या यकृताची साठवणूक क्षमता कमी असल्यामुळे यकृत खराब होऊन आर्थिक नुकसान होण्याची संभावना असते. या समस्येवर उपाय म्हणून विभागातील संशोधकांनी यकृताचे निर्जलीकरणकरून चिकन लिव्हर पावडर तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.३) प्रक्रियेमुळे यकृतातील पोषक घटक मोठ्या प्रमाणात टिकून राहतात, उत्पादनाचे साठवणूक क्षमता वाढते, वाहतूक व विपणन सुलभ होते. चिकन लिव्हर पावडरचा वापर पाळीव प्राण्यांच्या विविध खाद्यपदार्थांमध्ये, बिस्किटांमध्ये, ट्रिट्समध्ये आणि पूरक खाद्यामध्ये करता येतो. यामुळे खाद्याची चव, सुगंध आणि आवश्यक असणारी जीवनसत्त्वे यांमध्ये वाढ होते..Poultry Industry Reform: हरियाना शासन पोल्ट्री क्षेत्रासाठी नियमांत शिथिलता आणणार.चिकन लिव्हर च्यूज : पाळीव श्वानांसाठी पौष्टिक ट्रिट्सपाळीव श्वानांसाठी विविध प्रकारचे ट्रिट्स आणि च्यूज बाजारात उपलब्ध आहेत. तथापि, यातील अनेक उत्पादने परदेशातून आयात केलेली असल्यामुळे त्यांची किंमत जास्त असते. काही उत्पादनांमध्ये कृत्रिम रंग, स्वादवर्धक किंवा रासायनिक संरक्षकांचा वापर केल्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर विकसित केलेले चिकन लिव्हर च्यूज हे स्थानिक कच्च्या मालापासून तयार केलेले उच्च प्रथिनयुक्त आणि रुचकर उत्पादन आहे. २) चिकन लिव्हरचा वापर करून तयार करण्यात आलेले हे च्यूज श्वानांच्या नैसर्गिक चावण्याच्या सवयीस पूरक ठरतात. या उत्पादनाची ठळक वैशिष्ठे म्हणजे उच्च प्रतीची प्रथिने उपलब्ध करून देतात, पाळीव प्राण्यांना आर्कषक चव आणि सुगंध मिळतो. पचनास सुलभ आहे. स्थानिक पातळीवर उत्पादन शक्य असल्याने किंमत कमी आहे..पर्यावरणपूरक दृष्टिकोनकत्तलखान्यातील उप-उत्पादनांचा योग्य वापर केल्यास त्यांची विल्हेवाट लावण्याची समस्या कमी होते. त्यांचे मूल्यवर्धित पाळीव प्राण्यांच्या खाद्यात रूपांतर केल्यास उपलब्ध साधनांचा पुनर्वापर होतो. त्यामुळे पर्यावरणपूरक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि पाळीव प्राण्यांबाबत वाढती जागरूकता यामुळे दर्जेदार खाद्यपदार्थांची मागणी सातत्याने वाढत आहे. ग्राहक आता उच्च प्रथिनयुक्त, सुरक्षित आणि नैसर्गिक घटकांपासून बनविलेल्या उत्पादनांना प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीत चिकन लिव्हर पावडर, चिकन लिव्हर च्यूज आणि स्पेंट हेन मांसावर आधारित एक्स्ट्रुडेड उत्पादने यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. या उत्पादनांच्या निर्मितीमुळे कुक्कुटपालक, उद्योजक, स्वयंरोजगार इच्छुक युवक आणि महिला बचत गटांसाठी नवीन व्यवसाय संधी निर्माण होऊ शकतात. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांनी विकसित केलेली ही उत्पादने केवळ संशोधनापुरती मर्यादित नसून भविष्यात व्यावसायिक उत्पादनासाठीही उपयुक्त ठरू शकतात..भाकड कोंबडी (स्पेंट हेन)अंडी उत्पादनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोंबड्यांना भाकड कोंबडी (स्पेंट हेन) असे संबोधले जाते. या कोंबड्यांचे मांस तुलनेने कमी लुसलुशीत असते, हे मांस प्रथिनांनी समृद्ध आणि पौष्टिक असले तरी काही पोषणात्मक मर्यादा आढळतात, विशेषतः त्वचेसह मांसामध्ये चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण ब्रॉयलर मांसापेक्षा अधिक असू शकते. कोलेजनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे प्रथिनांचे प्रमाण चांगले असले तरी त्याची पचनक्षमता आणि जैवउपलब्धता काही प्रमाणात कमी होऊ शकते. स्नायू तंतू आणि संयोजी ऊतक अधिक विकसित असल्याने मांसाचे पचन तुलनेने कमी सुलभ असते..वयस्क पक्ष्यांच्या मांसातील चरबीमध्ये ऑक्सिडेशन होण्याची शक्यता अधिक असल्याने साठवणुकीदरम्यान गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, म्हणून या मांसाला बाजारात मर्यादित मागणी असते त्यामुळे उत्पादकांना कमी दर मिळतो. महाविद्यालयातील संशोधकांनी स्पेंट हेन मांसाचा उपयोग करून मूल्यवर्धित पाळीव प्राणी खाद्यपदार्थ तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.स्पेंट हेन मांसाचे प्रक्रिया करून चिकन मीट पावडर तयार करण्यात आले आणि त्यापासून पाळीव प्राण्यांसाठी एक्सट्रुडेड खाद्यपदार्थ विकसित करण्यात आले आहे..एक्स्ट्रुजन तंत्रज्ञानाचे महत्त्वएक्स्ट्रुजन हे आधुनिक अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान असून त्यामध्ये नियंत्रित तापमान आणि दाबाखाली मिश्रण प्रक्रिया केले जाते. या प्रक्रियेमुळे उत्पादनाला विशिष्ट आकार, पोत आणि चव प्राप्त होते. स्पेंट हेन मांसापासून तयार करण्यात आलेल्या एक्स्ट्रुडेड उत्पादनांचे वैशिष्ट्ये म्हणजे उच्च प्रथिनयुक्त आणि संतुलित पोषण, जास्त साठवण कालावधी, सुलभ वाहतूक आणि पॅकेजिंग, पाळीव प्राण्यांसाठी आकर्षक पोत आणि चव, मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उत्पादनासाठी उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानामुळे कमी मूल्य असलेल्या स्पेंट हेन मांसाचे आर्थिक मूल्य लक्षणीयरीत्या वाढू शकते.- डॉ. रवींद्र झेंडे, ९९६९६२५७४४, (प्राध्यापक व विभाग प्रमुख, प्राध्यापक व विभाग प्रमुख, पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.