Pomegranate Farming: सेंद्रिय, रासायनिक पद्धतीने डाळिंब बहर व्यवस्थापनावर भर

Agriculture Production: बोहाळी (ता. पंढ‌रपूर) येथे संभाजीराव व मधुकर काळेया बंधूंची एकूण ४० एकर शेती आहे. त्यात काळे बंधूंनी डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, ॲपल बोर, द्राक्ष, ऊस, पेरू या फळपिकांची लागवड केली आहे.
Pomegranate Farming
Pomegranate FarmingAgrowon
Published on
Updated on

Farmer Management :

शेतकरी नियोजन । डाळिंब

शेतकरी : संभाजीराव लक्ष्मण काळे

गाव : बोहाळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

एकूण शेती : ४० एकर

डाळिंब क्षेत्र : १२ एकर

बोहाळी (ता. पंढ‌रपूर) येथे संभाजीराव व मधुकर काळेया बंधूंची एकूण ४० एकर शेती आहे. त्यात काळे बंधूंनी डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, ॲपल बोर, द्राक्ष, ऊस, पेरू या फळपिकांची लागवड केली आहे. त्यात सर्वाधिक ६ एकरांवरील डाळिंब लागवड ही एक खोड पद्धतीने केली आहे. गुणवत्तापूर्ण फळ उत्पादनासाठी त्यांनी स्वतःच्या मातृवृक्षापासून रोपे तयार करून लागवड केली आहे. जेणेकरून तेलकट डाग व मर या रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल.

डाळिंब बागेत सेंद्रिय आणि रासायनिक या दोन्ही पद्धतीने व्यवस्थापन करत समतोल साधला आहे. लागवडीसाठी डाळिंबाच्या भगवा आणि गणेश या वाणांची निवड केली आहे. लागवड टप्प्याटप्प्याने केली आहे. २०१५ मध्ये दोन एकरांत १४ बाय ७ फूट अंतरावर २ हजार झाडे, २०१७ मध्ये ४ एकरांत १४ बाय ७ फूट अंतरावर ३ हजार झाडे, तर २०२२ मध्ये ६ एकरांत एक खोड पद्धतीने १० बाय ५ फूट अंतरावर ५ हजार झाडांची लागवड केली आहे. बागेत प्रामुख्याने हस्त बहर धरला जातो. एकाच बहराचे काटेकोर व्यवस्थापन करून दर्जेदार डाळिंब उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एकरी सरासरी ८ ते १० टन डाळिंब उत्पादन ते घेतात.

Pomegranate Farming
Pomegranate Farming : डॉलर अर्नरच्या दबदब्यासाठी...

कुटुंबातील सर्वजण शेतीमध्ये राबतात. संभाजीराव यांचे बंधू मधुकर यांची मुले सध्या शालेय शिक्षण घेत आहेत. संभाजीराव यांनी मुलगा श्रीमंत आणि मुलगी सोनाली यांना शेतीतील शास्त्रशुद्ध माहिती होण्यासाठी दोघांना बीएसस्सी कृषीचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

एक खोड पद्धती व्यवस्थापन

सुरुवातीला रोपांपासून निर्माण झालेल्या अनेक फुटव्यांमधून दोन फुटवे ठेवले. त्यानंतर पेन्सिल साइज आकारांचे फुटवे झाल्यानंतर एकाच फुटीची निवड केली. त्या फुटव्यांचे रूपांतर खोडा‌मध्ये होईपर्यंत दुसरे फुटणारे फुटवे काढून टाकले. त्या खोडांची उंची ६ फूट होईपर्यंत सतत वाढणाऱ्या इतर फुटवे काढून टाकले.

खोड सुदृढ होण्यासाठी खत नियोजन व रोग-कीड व्यवस्थापनावर प्रामुख्याने भर दिला. तसेच पाण्याचे देखील काटेकोर नियोजन केले. जास्त पाणी दिल्यास जमिनीमध्ये हानिकारक बुरशींचा मुळ्यांवर प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे बागेत वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर दिला जातो.

खोडकीड व इतर कीड-रोगांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी बोर्डो पेस्ट व कावा पेस्टचा वापर करण्यात आला.

खोडांची वाढ सरळ होण्यासाठी द्राक्षामधील मंडप पद्धती (ट्रेलिस पद्धती) चा उपयोग करण्यात आला. तसेच फळांचा अतिरिक्त भार झाडाला पेलण्यासाठी या ट्रेलिस पद्धतीचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो, असे संभाजीराव सांगतात.

Pomegranate Farming
Pomegranate Export : महाराष्ट्रातून डाळिंबाची २२ हजार टन निर्यात

नियोजनातील ठळक बाबी

पाऊस कमी झाल्यानंतर संपूर्ण बागेची स्वच्छ केली. खोडे साफ करून त्यावर बोर्डो पेस्ट लावून घेतली.

बहर नियोजनानुसार ताण धरण्याच्या १५ दिवस आधी म्हणजेच साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला बागेतील झाडांची हलकी छाटणी केली. त्यानंतर बोर्डोची फवारणी केली.

पानगळ होण्यासाठी इथरेलची एक फवारणी घेतली. संपूर्ण बागेतील झाडांची पानगळ झाल्यानंतर छाटणीनंतर साधारणपणे १२ ते १३ दिवसांनी पुन्हा बोर्डोची फवारणी घेतली.

त्यानंतर प्रत्येक झाडाला २० ते २५ किलो शेणखत, त्यासोबत गांडूळखत अधिक निंबोळी पेंड ५ किलो प्रमाणे दिले. तसेच १८ः४६ः०, पीएसबी आणि केएसबी यांच्या प्रति झाड मात्रा देण्यात आल्या. संपूर्ण खतमात्रा झाडाभोवती आळी करून देण्यात आल्या.

फुलकळी निघण्यासाठी अमिनो ॲसिड, फॉस्फेरीक ॲसिड यांचा फवारणीद्वारे वापर केला.

बहर धरल्यापासून दर ८ दिवसांच्या अंतराने शिफारशीत सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरावर भर दिला.

बागेचे सातत्याने निरिक्षण करून किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ८ दिवसांच्या अंतराने रासायनिक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा आलटून पालटून वापर केला. सेटिंग होईपर्यंत दर ८ दिवसांच्या अंतराने फवारणीमध्ये सातत्य राखले आहे.

मागील कामकाज

फळ धारणा चांगली होण्यासाठी बागेत मधमाशी पेट्या ठेवल्या. त्यामुळे नैसर्गिक परागीभवन होऊन फळधारणेत ६० ते ६५ टक्के वाढ होण्यास मदत होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

सेटिंग झाल्यानंतर फळांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढीसाठी जैविक घटकांच्या फवारणीवर अधिक भर दिला. आगामी काळातही दर्जेदार गुणवत्तापूर्ण फळ उत्पादनासाठी जैविक घटकांचा नियमित वापर करण्यात येणार आहे.

अतिरिक्त वाढलेल्या फुटी काढून घेतल्या आहेत.

तण नियंत्रणासाठी मजूर लावून तण काढून घेतले. बागेची स्वच्छता केली.

वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन एकदिवसाआड सिंचन करण्यावर भर दिला.

आगामी नियोजन

सध्या झाडांवर ८० ते १०० ग्रॅम वजनाची फळे लगडलेली आहेत. प्रति झाड साधारणपणे ६० ते ७० फळे झाडावर दिसत आहेत.

फळ फुगवणीसाठी पोटॅशयुक्त खतांचा वापर तसेच जैविक स्लरी दिली जाईल. त्यामुळे फळ फुगवणीसह फळांची गुणवत्ता आणि वाढ चांगली होण्यास मदत मिळते.

दर १५ दिवसांच्या अंतराने शिफारशीत बुरशीनाशके आणि कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातील.

बागेतील वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन एकदिवसाआड साधारणपणे ३ ते ४ तास सिंचन केले जाईल. सिंचन कालावधी आवश्यकतेनुसार कमी जास्त केला जाईल.

पुढील १० ते १२ दिवसांमध्ये संपूर्ण बागेवर पांढरे क्रॉप कव्हर टाकून बाग झाकून घेतली जाईल. कारण, उन्हाळ्यात फळांचे सनबर्निंगमुळे नुकसान होण्याची शक्यता असते. फळांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आणि दर्जा राखण्यासाठी क्रॉप कव्हर तंत्रज्ञान फायदेशीर ठरते. त्यामुळे निर्यातक्षम फळे तयार होण्यास मदत असल्याचे संभाजीराव सांगतात.

संभाजीराव काळे, ९६६५६५६५८०

श्रीमंत काळे (मुलगा), ९९२२२६७७४०

(शब्दांकन : सुदर्शन सुतार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com