
Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन वाढले आहे. गतवर्षी ३२ हजार ६४६ टन निर्यातक्ष डाळिंबांचे १६३२ हेक्टर क्षेत्रावर उत्पादन झाले होते. यंदा हा आकडा २३७१ हेक्टरमधून ४३ हजार टनांवर गेला आहे. द्राक्षांचे यंदा ६२८ हेक्टरवर निर्यातक्षम उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षी ७२७ हेक्टरवर निर्यातीसाठी उत्पादन घेतले होते.
अहिल्यानगर जिल्हा राज्यात फलोत्पादनात अग्रेसर असून, मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या अर्थसाह्याद्वारे फळे व भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे. विशेषतः द्राक्ष, डाळिंब, आंबा, संत्री, केळी, या फळपिकांची व विविध भाजीपाला व कांदा पिकांची व्यवसायिक दृष्टिकोनातून लागवड करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन करण्यात येत आहे.
जागतिक बाजारपेठेतील ग्राहकांबरोबर स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांमध्ये आरोग्याच्या सुरक्षतेबाबत विशेषतः कीडनाशक उर्वरित अंशाबाबत जागरूकता निर्माण झालेली आहे. ‘भारतीय अन्न सुरक्षा मानक’ प्राधिकरणाने अधिकतम उर्वरित अंश मर्यादा निर्धारित केल्यानुसार फळे व भाजीपाला पिकांचे उत्पादन करून युरोपियन व इतर देशांना निर्यात करण्यावर भर आहे.
युरोपियन देशांनी कीडनाशक उर्वरित अंश मुक्तची हमी अट घातल्याने २००४-०५ पासून जिल्ह्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली ग्रेपनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची ऑनलाइन नोंदणी केली जाते. हॉटीनेट ट्रेसिबिलिटीद्वारे नोंदणी केलेल्या निर्यातक्षम द्राक्ष, आंबा, डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू इतर फळपिके व भाजीपाला पिकांच्या निर्यातक्षम बागांची तपासणी करण्याकरिता जिल्ह्यात विशेष उपक्रम राबवला.
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा डाळिंबाची निर्यात वाढली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०२३-२४ मध्ये १६३२ हेक्टरवरील २४७१ शेतकऱ्यांनी नोंदणी करून ३२ हजार ६४६ टन निर्यातक्षम डाळिंब उत्पादन घेतले. यंदा (२०२४-२५) २३७१ हेक्टरवर ३६९२ शेतकऱ्यांनी नोंदणी करून ४२ हजार ९९१ टन निर्यातक्षम डाळिंब उत्पादन घेतले. गेल्या वर्षीपेक्षा दहा हजार टन डाळिंबाची निर्यात वाढली.
द्राक्ष फळपिकासाठी २०२३-२४ मध्ये ७२७ हेक्टर क्षेत्रावर १४ हजार ५४० टन निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतले. यंदा (२०२४-२५) मध्ये ६२८ हेक्टरवर निर्यातक्षम उत्पादन घेतल्याची नोंद असून हा आकडा वाढण्याचा अंदाज आहे.
तालुकानिहाय डाळिंब निर्यात
झालेले हेक्टर क्षेत्र (कंसात द्राक्षांचे क्षेत्र)
अहिल्यानगर १९७ (०)
पारनेर १८६ (१६.२३)
पाथर्डी ३०७ (०)
कर्जत २१६ (२.२७)
जामखेड २० (०)
श्रीगोंदा २१७ (२२४)
श्रीरामपूर ८४ (१४.७०)
राहुरी १४६ (१७.७४)
नेवासा ३६७ (०.८)
शेवगाव १७ (६.०४)
संगमनेर २७८ (४४.८८)
अकोले ७३ (०)
कोपरगाव १०५ (१७७)
राहाता १५१ (१२३)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.