
PM Modi Speech on Independence Day : ‘आपल्याला २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण या विकासाच्या तीन सर्वांत मोठ्या शत्रूंना नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे. हे दुर्गुण देश आता कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही’, असे निक्षून सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शत्रूत्रयीविरुद्ध लढा उभारण्याची हाक देशवासीयांना मंगळवारी (ता. १५) दिली. त्याचसोबत, ‘पुढील वर्षी याच दिवशी, म्हणजे १५ ऑगस्ट २०२४ रोजी मी याच लाल किल्ल्यावरून तुमच्याशी संवाद साधत देशाने साधलेली प्रगती, क्षमता, यश यांचा लेखाजोखा मांडेन’, अशा शब्दांत आगामी लोकसभा निवडणुकीत फेरविजयाचा विश्वासदेखील मोदी यांनी व्यक्त केला.
देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी प्रथेनुसार मंगळवारी (ता. १५) येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशवासीयांशी संवाद साधला. ‘घराणेशाही, भ्रष्टाचार, तुष्टीकरण या तीन शत्रूंनी भारताचे फार मोठे नुकसान केले आहे. हे तीनही दुर्गुण व्यवस्थेच्या अंगी इतके मुरले आहेत की नागरिकांच्या ते जणू अंगवळणीच पडलेले आहेत’, असे ते म्हणाले. ‘भ्रष्टाचाराने तर देशाला पोखरले. त्याविरुद्ध लढाई लढण्यावाचून तरणोपाय नाही’, असे त्यांनी नमूद केले.
आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी, ‘मी देशासाठी जगतो आणि माझ्या लोकांचे दुःख पाहू शकत नाही’, असे भावनात्मक उद्गार काढले. ‘२०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य आपल्या डोळ्यांसमोर आहे. येत्या ५ वर्षांत भारत ही जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होईल’, असा पुनरूच्चार पंतप्रधानांनी केला. ‘आगामी पाच वर्षे देशाच्या विकासाच्या धडाक्याची असतील’, असेही ते म्हणाले.
‘अन्नधान्याची वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी आणखी उपाय केले जातील’, अशी ग्वाही मोदी यांनी या वेळी दिली. ‘सुतारकाम करणारे श्रमिक, केशकर्तन कर्मचारी अशा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या घटकांच्या कल्याणासाठी १५ हजार कोटी रुपयांची योजना आखली जाईल’, असे त्यांनी सांगितले. तसेच ‘देशभरातील सुमारे दोन कोटी महिलांना छोटे-छोटे उद्योग, व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळावे, त्यांना कौशल्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी ‘लखपती दीदी’ ही योजना आखली जाणार आहे. खेड्यापाड्यांतील दोन कोटी महिला लखपती दीदी व्हाव्यात, हे माझे स्वप्न आहे’, असे मोदी यांनी या वेळी जाहीर केले.
मोदी म्हणाले, ‘गेल्या काही आठवड्यांत हिंसाचार अनुभवणाऱ्या मणिपूरमध्ये आता शांतता परतू लागती आहे. मणिपूरमधील हिंसाचारात अनेकांनी जीव गमावला. अनेक माता-मुलींच्या सन्मानाला धक्का पोहोचला. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. मणिपूरमधील समस्येवरील तोडगा शांततेच्या मार्गानेच निघेल.’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.