Political Diplomacy : उन्हाच्या प्रचंड तडाख्यात अखेर सातही टप्प्यातील लोकसभा निवडणुकांचे मतदान आटोपले. उद्या निकाल लागेल. निकालानंतर आरोप, प्रत्यारोप होतील. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ला बहुमत मिळाले तर ईव्हीएमवर खापर फोडले जाईल. मतदानाच्या काही दिवसानंतर मतांची टक्केवारी वाढवल्याने असे निकाल लागल्याबाबत निवडणूक आयोग आरोपीच्या पिंजऱ्यात असेल.
‘इंडिया’ आघाडीला सरकार बनविण्याची संधी मिळाली तर मात्र ''मोदी - शहां''च्या एकाधिकारशाहीला लोक कंटाळले होते, असे निष्कर्ष काढले जातील. ईडी-सीबीआयच्या भीतीने जे भाजपमध्ये गेले त्या नेत्यांच्या भविष्याचे पुढे काय? हा विषय चघळला जाईल. परंतु प्रचारात दिग्गज नेत्यांच्या भाषणांमुळे जे मनभेद झालेत ते सहज विसरून जायचे का? हा राजकारणाचा भाग होता म्हणून सोेेडून देता येईल का?
लोकसभेच्या निवडणुका ऐन उन्हाळ्यात घेतल्या जातात त्याचा परिणाम मतदानावर होतो. आतापर्यंत १३ निवडणुका या कडक उन्हाळ्यात पार पडल्या. यावेळी उन्हाने कहर केला. दिल्लीचा पारा ५० अंश से. वर गेला. देशभर असेच चित्र होते. विविध राज्यात उष्माघाताने लोक मृत्यूमुखी पडले. ओडिशामध्ये मृतकांचा आकडा चाळीसच्या घरात गेला. मतदान कमी होण्याला उन्हाचा तडाखा हेही एक मुख्य कारण आहे.
तरीही सरासरी ६० टक्के मतदान होते. तेवढचे लोक देशाची धूरा कोणावर सोपवायची ते ठरवतात. १९८० ते १९९१ पर्यत थंडी आणि पावसाच्या दिवसात निवडणुका पार पडल्या. हवामानातील बदल पाहता पुढच्या काळात उन्हाळ्यातील निवडणुका असह्य ठरणार आहेत. शनिवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर देशातील ५४२ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले.
भाजपने देशभरातून ४४१ जागा लढविल्या, त्या पाठोपाठ कॉँग्रेसने ३१८, समाजवादी पक्षाने ६२, तृणमूल कॉंग्रेसने ४७, राजद २४, डीएमके २१, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे २१ उमेदवार नशीब आजमावत आहेत. या निवडणुकांमध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसेवाटप झाल्याच्या चर्चा होत्या. दारू, अंमली पदार्थही जप्त करण्यात आले. निवडणुकांच्या काळात लागलेली आचारसंहिता ही आदर्श आहे असे म्हटले जाते.
परंतु यावेळी आदर्शाचा जराही अंश दिसला नाही. लोकशाही असलेल्या देशात धर्मावरून मते मागितली जातात आणि अल्पसंख्यांकाबाबत जनमानसात भीतीही निर्माण केली जाते. या निवडणुकीत मोदी सरकारने गेल्या दहा वर्षाचा लेखाजोखा सादर न करता हिंदु-मुस्लीम, देव-धर्म या मुद्द्यावर निवडणूक लढवली. देशात रोजगार, महागाईचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर भाष्य झाले नाही. विरोधकांनीही हा मुद्दा लावून धरला नाही.
निवडणूक रोख्यांच्या निमित्ताने सरकारला जाब विचारण्याची संधी विरोधकांना होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा त्यांना आधार घेता आला असता. पण विरोधकांच्या प्रचारातून हा मुद्दा गायब होता. असा निधी मिळवण्यात भाजपसह अन्य पक्षही असल्याने हा मुद्दा हवेतच विरला. काही कंपन्या अशा आहेत की त्यांची उलाढाल नाही मात्र, त्यांनी कोट्यवधीचे रोखे विकत घेऊन भाजपला दिलेत. भाजपसाठी ‘गोमाता’ हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. परंतु गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्याकडूनही निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोट्यवधीची वसुली केली गेली. तेव्हा कुठे असते नैतिकता? याही विषयांपासून विरोधक दूर होते.
वेगळ्याच विषयांचा काथ्याकूट
यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय डावपेच आखत विरोधकांना वेगळ्याच विषयांचा काथ्याकूट करायला भाग पाडले. त्यामुळे ज्या मुद्यांवरून भाजप अडचणीत येईल, अशा विषयांना आपसूकच बगल मिळत गेली. मोदींनी त्यांच्या भाषणातून शेकडो वेळा मंदिर-मशीद, मुस्लिम, पाकिस्तान व अल्पसंख्यांक अशा शब्दाचा वापर केला. मंगळसूत्र, नळ, म्हैस, नळाची तोटी, मटण, मासे हे विषय मोदींना महत्त्वाचे वाटले.
निवडणूक आचारसंहितेनुसार धर्म व मंदिराच्या आधारावर प्रचार करता येत नसताना भाजपच्या नेत्यांचा प्रचार या विषयांभोवती केंद्रित झाला होता. निवडणूक आयोग मात्र या नेत्यांना चाप लावू शकला नाही. कॉँग्रेसचे म्हणणे आहे, गेल्या ७२ दिवसांत लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना २७२ प्रश्न विचारले; परंतु एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून आले नाही. मोदी दहा वर्षांत एकही पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत, पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांनी केव्हाच गुंडाळून ठेवला. तेव्हा ते सामान्य लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील, अशी अपेक्षा विरोधकांनी तरी का करावी?
‘‘माझा जन्म बायोलॉजिकल नाही. ईश्वराने आपल्याला भारतात पाठवले’’, यासारखे मोदींचे दावे अंधश्रद्धेचाच भाग होता. विज्ञानवाद्यांनी यावर प्रखर टीका करायला हवी होती. पण फारसे पडसाद उमटले नाहीत. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे कलम-१९ अद्याप कायम आहे. विज्ञानाच्या कसोटीवर न टिकणारे थोतांड सांगितले जात आहे’, असे म्हणण्याचे धाडस कोणाचेही झाले नाही. हेच वक्तव्य एखाद्या गल्लीतील बाबाचे असते तर हे सगळे लोक त्यांच्यावर तुटून पडले असते.
मोदींनी म्हटले म्हणून विषय हसून सोडून द्यायचा, ही बाबही विज्ञानवादी चळवळींसाठी लाजिरवाणी आहे. ‘‘पंतप्रधान असलेल्या व्यक्तीने त्या पदाची प्रतिष्ठा गुंडाळून ठेवली’’, असे आता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाटते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात का होईना कॉँग्रेसने डॉ. सिंग यांना लिहिते केले. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या काळात अर्थात गेल्या दहा वर्षांमध्ये देशाची अर्थव्यवस्था दिशाहीन होती, असे त्यांना वाटते. डॉ. सिंग यांनी मोदींच्या काळातील राष्ट्रीय सकल उत्पन्नात कशी घट झाली हे नोंदवले आहे.
गांधीजींची ओळख...
‘‘महात्मा गांधीना जगात ओळख मिळाली, ती १९८२ ला त्यांच्यावर चित्रपट आल्यानंतर’’ मोदींच्या मुलाखतीतील हे अंश सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. यावेळी मुलाखत घेणारे पत्रकार मात्र गप्प होते. मोदी मुलाखत देत असल्याचा त्यांना हर्षवायू झालेला असतो. इतिहासातील दाखले देऊन त्यांनी केलेले चुकीचे वक्तव्य खोडून काढण्याचा मुलाखतकाराने प्रयत्नही केला नाही. ‘बायोलॉजिकल नाही’ या वक्तव्यावरही संबंधित पत्रकार लॉजिकल प्रश्न विचारू शकले नाही.
आता तर अनेकांनी गांधीजींचे जुने संदर्भ आणि टाइम मॅगेझीनने त्यांच्यावर छापलेले अंक दाखवायला सुरूवात केली आहे. हे दाखवताना मोदींवर टाईम मॅगेझिनने छापलेले अंकही दाखवले जात आहे. ‘टाइम’ने मोदींची दखल कोणत्या कारणाने घेतली होती, याकडे लक्ष वेधले जात आहे. गांधीजींचे शंभरावर देशात पुतळे आहेत. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघापुढे सुद्धा महात्मा गांधी यांचा पुतळा बसविला आहे.
हे त्यांना माहिती नाही असे समजायचे का? मोदींना गांधीजींबद्दल आदर आहे, म्हणूनच त्यांनी २०१४ मध्ये गांधीजीच्या चष्म्याचा वापर ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी केला. जगाने गांधींना स्वीकारले आहे, त्यामुळे त्यांना केव्हापासून ओळखले जाते हा विषय गौण आहे. मोदी सरकारच्या काळात वाराणशी, दिल्ली व अहमदाबाद येथील गांधीवादी संस्था नष्ट झाल्या आहेत. त्या मोदींना शाबूत ठेवल्या आल्या असत्या. मोदींच्या एकूणच वक्तव्यामुळे घटनात्मक कर्तव्याचा मुद्दा निर्माण झाला आहे आणि पंतप्रधानपदाच्या व्यक्तीसाठी या बाबी अशोभनीय ठरतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.