Pune News : पर्यावरणाचा ढासळता असमतोल सावरण्यासाठी बांबू हे हमखास पीक असून, पर्यावरण आणि रोजगारासाठीदेखील हे शाश्वत पीक आहे. त्यामुळेच बांबूला ‘हिरवे सोने’ म्हणून ओळखले जाते.
बांबूची लागवड केली की त्याला जास्त खते, औषधे द्यावी लागत नाहीत, भोर तालुक्याच्या डोंगरी भागात बांबू नैसर्गिकरित्या उत्तम प्रकारे येतो. बांबूच्या स्थानिक प्रजातीची लागवड वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः बांबूची रोपे तयार करून लागवड वाढवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक संजय काचोळे यांनी केले.
वारवंड (ता.भोर) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व बांबू एन्व्हायरमेंट अँड टुरिझम असोसिएशन (बेटा) यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांबूची शाखीय पद्धतीने रोपवाटिका उभारणी व बांबू प्रक्रिया याविषयी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन रविवारी (ता.१७) करण्यात आले होते
या वेळी आत्मा प्रकल्प संचालक विजय हिरेमठ व भोर तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये हिरडस मावळातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या मेस जातीच्या बांबूची रोपे शासकीय पद्धतीने कसे तयार करायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली वनशास्त्र विभागाचे प्राध्यापक अजय राणे, बांबू मार्गदर्शक विनय कोलते, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत सरडे, बांबू उत्पादक शेतकरी संतोष दिघे, हनुमंत देशमुख, तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, युवा बांबू प्रक्रिया उद्योजक दत्तात्रय घोलप यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी शेतकऱ्यांना बांबूची शाखीय पद्धतीने रोपवाटिका उभारणीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
१० हजार रोपांचे उद्दिष्ट
तालुक्यात शंभर शेतकरी प्रत्येकी शंभर शाखीय पद्धतीने बांबूची रोपवाटिका तयार करणार असल्याने १० हजार रोपनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना एक दिवसीय प्रशिक्षण दिल्यानंतर रोपवाटिकेसाठी आवश्यक प्लॅस्टिक पिशवी, खते, औषधे, कोकोपीट, याचे कीट दिले जाणार आहे.
रोपवाटिका ही शेतकऱ्यांच्या घराजवळ गोठ्यामध्ये, परड्यामध्ये किंवा तात्पुरता निवारा उभा करून करण्यात येणार आहे. रोपवाटिका शाखीय पद्धतीने मेस, मानगा व इतर स्थानिक प्रजातींची करणे बंधनकारक असणार आहे. यशस्वी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रशस्तिपत्रक, गौरवचिन्ह व रोख रकमेचे बक्षीस देण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.