Sorghum Variety : मध्यम जमिनीसाठी रब्बी ज्वारीचा वाण : फुले सुचित्रा

Rabi Sorghum : फुले सुचित्रा वाणाच्या झाडांची उंची सरासरी २३० ते २४० सेंमी असते. ताटे भरीव, रसदार व गोड असून कडब्याची प्रत उत्तम असते.
Sorghum Variety
Sorghum Variety Agrowon
Published on
Updated on

डॉ. विजू अमोलिक, डॉ. विजयकुमार शिंदे

Suchitra Varietal Characteristics : फुले सुचित्रा वाणाच्या झाडांची उंची सरासरी २३० ते २४० सेंमी असते. ताटे भरीव, रसदार व गोड असून कडब्याची प्रत उत्तम असते. दाण्याचा रंग पांढरा शुभ्र व चमकदार आकर्षक आहे. अवर्षणास प्रतिकारक, खडखडा, खोडमाशी व खोडकिडीस प्रतिकारक्षम हा वाण आहे.

महाराष्ट्रात कोरडवाहू भागातील मध्यम जमिनीत ४८ टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारी लागवड होते. या क्षेत्राचा विचार करून ज्वारी सुधार प्रकल्पाने मध्यम जमिनीसाठी अधिक उत्पादन देणारा ‘फुले सुचित्रा’ हा वाण विकसित केला आहे.

लागवडीची सूत्रे :

निचरा होणारी मध्यम प्रकारची जमीन निवडावी.

पेरणीपूर्वी कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन तयार करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी प्रति हेक्टरी १० ते १२ गाड्या शेणखत पसरावे. जमिनीत पाणी मुरविण्याकरिता नांगरट, कुळवाच्या पाळ्या, मशागतीची कामे उतारास आडवी करावीत.

पावसाचे पाणी साठविण्यासाठी १० × १० मीटर आकाराचे वाफे तयार करावे. वाफे तयार करताना सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये बळिराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात. त्यामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाफ्यात साचून जमिनीत मुरण्यास मदत होते. कोरडवाहू ज्वारीची पेरणीपूर्वी रानबांधणी केल्याने उत्पादनात ३० टक्के वाढ होते.

Sorghum Variety
Rabbi Jowar Variety : कोरडवाहू, बागायतीसाठी रब्बी ज्वारीचे वाण

योग्य वेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यामुळे पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी. प्रति हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक आणि २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टरची प्रक्रिया करावी.

पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने ४५ सेंमी अंतरावर करून एकाच वेळी खते व बियाणे दोन स्वतंत्र चाड्यातून पेरावे. खत खाली आणि त्यावर बियाणे पडेल अशा रीतीने पेरणी करावी. प्रति हेक्टरी ४० किलो नत्र (७८ किलो युरिया) आणि २० किलो स्फुरद (१२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) द्यावे. संपूर्ण नत्र आणि स्फुरद पेरणीच्या वेळेस द्यावे. पेरणी करताना दोन रोपांतील अंतर १५ सेंमी ठेवावे. उगवण झाल्यानंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करावी. हेक्टरी १.४८ लाख इतकी झाडाची संख्या राखली जाईल याची काळजी घ्यावी.

Sorghum Variety
Jowar Production : ज्वारी पिकाच्या उत्पादनवाढीची सूत्रे

पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी. या कोळपणीमुळे तणांचे नियंत्रण होऊन मातीचा थर जमिनीवर तयार होतो. दुसरी कोळपणी पेरणीनंतर ५ आठवड्यांनी करावी. त्यामुळे रोपांना मातीचा आधार मिळतो. पेरणीनंतर पीक ८ आठवड्याचे झाल्यावर दातेरी कोळप्याने तिसरी कोळपणी करावी. त्यामुळे जमिनीच्या भेगा बुजण्यास मदत होईल.

पाणी देण्याची सोय असल्यास वाढीच्या टप्प्यात पिकाला पाणी द्यावे. कोळपण्या करून ओलावा टिकवून ठेवावा.

कोरडवाहूमध्ये पीक ३ ते ४ आठवड्यांचे झाल्यावर हेक्टरी ५ टन तुरकाट्याचे आच्छादन करावे. यामुळे ताटे जमिनीवर पडण्याचे प्रमाण ४२ टक्क्यांनी कमी होऊन धान्य उत्पादनात १४ टक्क्यांनी वाढ होते.

वाणाची वैशिष्ट्ये :

पश्‍चिम महाराष्ट्रातील मध्यम खोलीच्या जमिनीसाठी प्रसारित.

१२०-१२५ दिवसांत पक्वता.

फुले चित्रा, फुले माउली, मालदांडी ३५-१ पेक्षा २२, ६२ व २३ टक्के अधिक धान्य उत्पादन.

प्रचलित वाण फुले चित्रा, फुले माउली व मालदांडी ३५-१ पेक्षा १६, ३६ व १९ टक्के अधिक कडबा उत्पादन.

झाडांची उंची सरासरी २३० ते २४० सेंमी. ताटे भरीव, रसदार व गोड, कडब्याची प्रत उत्तम.

दाण्याचा रंग पांढरा शुभ्र व चमकदार आकर्षक.

अवर्षणास प्रतिकारक, खडखडा, खोडमाशी व खोडकिडीस प्रतिकारक्षम.

प्रति हेक्टरी सरासरी २५ ते ३० क्विंटल धान्य आणि कडब्याचे ६० ते ६५ क्विंटल उत्पादन.

डॉ. विजू अमोलिक, ९४२०८५७६०५

डॉ. विजयकुमार शिंदे, ८२७५४४०७१५

(ज्वारी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com