Paddy Pest Management : भातावरील खोडकिडीचे व्यवस्थापन

Paddy Stem Borer : सद्यःस्थितीत भात पिकावर खोडकिडा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडींच्या बंदोबस्तासाठी प्रादुर्भावाची लक्षणे माहिती असणे आवश्यक आहे.
Paddy Pest
Paddy PestAgrowon
Published on
Updated on

डॉ. ए. व्ही. कोल्हे

भात हे पूर्व विदर्भातील मुख्य पीक असून सर्वसाधारणपणे ८.० ते ८.५ लक्ष हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे. हे पीक पूर्व विदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात लागवड केली जाते. भाताची उत्पादकता कमी येण्यामागे पिकावर किडींचा होणारा प्रादुर्भाव हे एक प्रमुख कारण आहे. सद्यःस्थितीत भात पिकावर खोडकिडा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडींच्या बंदोबस्तासाठी प्रादुर्भावाची लक्षणे माहिती असणे आवश्यक आहे.

खोडकिडा

या किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबरचा तिसरा आठवडा ते ऑक्टोबरचा दुसरा आठवड्यात असतो. म्हणजेच पीक फुलोरा ते ओंबी अवस्थेत असताना प्रादुर्भाव दिसून येतो.

अंडी पुंजक्याच्या स्वरूपात असून पिवळसर तांबड्या तंतुमय धाग्याची पानाच्या शेंड्यावर झाकलेली असतात.

पूर्ण वाढ झालेली अळी २० मि.मी. लांब असून पिवळसर व पांढरी असते.

खोडकिडीची मादी १०० ते २०० अंडी पुंजक्याने धानाच्या शेंड्यावर घालते. अंड्यातून ५ ते ८ दिवसांत अळ्या बाहेर येतात.

अळी अवस्था धानाच्या मुख्य खोडास पोखरून आतमध्ये उपजीविका करते. अळी अवस्था १६ ते २७ दिवसांची असते. अळी खोडामध्येच कोषावस्थेत जाते आणि ९ ते १२ दिवसांनी कोषातून पतंग बाहेर येतो.

किडीचा पतंग १ ते २ सें.मी. लांब, समोरील पंख पिवळे, तर मागील पांढरे असतात. समोरील पिवळ्या पंखावर प्रत्येकी एक ठळक काळा ठिपका असतो.

किडीला जीवनक्रम पूर्ण करण्यास ३१ ते ४० दिवसांचा कालावधी लागतो. एका वर्षात किडीच्या ४ ते ६ पिढ्या पूर्ण होतात.

Paddy Pest
Paddy Pest Management : भातावरील लष्करी अळी, खोडकीड, गादमाशीचे नियंत्रण

प्रादुर्भाव

अळी खोड पोखरते, त्यामुळे रोपाचा गाभा मरतो व फुटवा सुकतो. यालाच कीडग्रस्त फुटवा/गाभेमर/डेडहार्ट असे म्हणतात. हा फुटवा ओढल्यास सहज निघून येतो. अशा फुटव्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या ओंब्या येतात. यालाच पळीज किंवा पांढरी पिशी म्हणतात.

आर्थिक नुकसान पातळी

१ अंडीपुंज प्रति चौ. मी.

५ टक्के सुकलेले फुटवे किंवा ५ टक्के गाभेमर प्रति चौ. मी.

१ पतंग प्रति चौ. मी.

Paddy Pest
Paddy Pest : भातपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव

व्यवस्थापन

पिकाची वेळोवेळी पाहणी करून कीडग्रस्त फुटवे मुळासकट काढून नष्ट करावेत. हे काम हंगामात किमान ३ ते ४ वेळा करावे.

वेळोवेळी बांधातील पाण्याची पातळी वाढवावी. त्यामुळे खोडाच्या खालील बाजूवरील अंडीपुंज पाण्यात बुडून किडीचा नाश होईल.

शक्य झाल्यास ट्रायकोग्रामा झापोनीक्रम या परजीवी किडींची ५०,००० अंडी प्रति हेक्टरी म्हणजेच ७ ते ८ ट्रायकोकार्ड १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा वापरावीत.

धान रोवणीनंतर १० ते १५ दिवसांनी एकरी २ फेरोमोन सापळे लावावेत. दर आठवड्याने सापळ्यातील पतंग नष्ट करावेत.

नियंत्रणासाठी उपाय

अ) फवारणीद्वारे वापर

खालीलपैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. एकच कीटकनाशक पुन्हा पुन्हा वापरू नये. कीटकनाशकांची मात्रा हाय व्हॉल्यूम पंपासाठी (उदा. नॅपसॅक पंप) आहे.

शिफारसीत कीटकनाशके

फिप्रोनिल (५टक्के) २० मिलि किंवा

थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) २ ग्रॅम किंवा

फ्ल्युबेंन्डायअमाइड (३९.३५ टक्के) १ मिलि किंवा

क्विनॉलफॉस (२५ टक्के) २.६ मिलि किंवा

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५टक्के) ५ मिलि किंवा

क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २५ मिलि

ब) बांधीमध्ये वापर

खालीलपैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची प्रति हेक्टरी बांधीमध्ये ७ ते १० सेंमी पाणी असताना वापर करावा. बांधीतील पाणी ४ दिवस बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. एकच कीटकनाशक पुन्हा पुन्हा वापरू नये.

क्विनॉलफॉस (५ टक्के दाणेदार) १५ किलो किंवा

फिप्रोनिल (०.३ टक्के दाणेदार) १६.६७ ते २५ किलो किंवा

कार्बोफ्युरॉन (३ टक्के दाणेदार) २५ किलो किंवा

क्लोरपायरफॉस (१० टक्के दाणेदार) ५ किलो

(लेबक्लेम शिफारस आहे.)

डॉ. ए. व्ही. कोल्हे, ९९२२९ २२२९४

(कीटकशास्त्र विभाग, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही जि. चंद्रपूर)

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत.

फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.

खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.

बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.

लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.

रसायनांचा गट तपासावा.

पीएचआय, एमआरएल तपासावेत.

पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com