Garlic Grass : बहुवार्षिक पौष्टिक द्विदल चारापीक : लसूणघास

Garlic Grass Crop : लसूणघास हे बहुवार्षिक पौष्टिक द्विदलवर्गीय चारा पीक आहे. त्यापासून वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होते. लसूणघासाचे तीन वर्षांतून दोन वेळा बीजोत्पादन घेतल्यास फायदेशीर ठरते.
Garlic Grass
Garlic GrassAgrowon
Published on
Updated on

संजय बडे

Garlic Grass Production : लसूणघास लागवडीसाठी मध्यम पोयटायुक्त; तसेच काळी कसदार व उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. आम्लयुक्त जमिनीत बियाण्याची उगवण कमी होऊन प्रती हेक्‍टरी रोपांची संख्या कमी होते. पर्यायाने उत्पादनात घट येते.

हे पीक तीन वर्षांपर्यंत शेतात राहते. त्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी. लागवडीसाठी तीन मीटर रुंदीचे वाफे तयार करावेत. वरंबे थोडे रुंद व जाड करावेत. जमिनीच्या उतारानुसार वाफ्याची रुंदी ठेवावी किंवा ३ x ४ मीटर अंतराचे वाफे तयार करून घ्यावेत.

जास्त पावसाच्या भागात व काळ्या जमिनीत वरंबे प्रमाणापेक्षा जास्त उंच ठेवू नयेत. पावसाळ्यात वाफ्यामध्ये पाणी साचून मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. मर रोगामुळे पीक विरळ होते.

जमीन, हवामान व पाण्याच्या उपलब्धतेनुसार वार्षिक अथवा बहुवार्षिक सुधारित जातींची निवड करावी. आनंद-२, आनंद-३ आणि आनंद-८ या वार्षिक जाती आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील चारापिके संशोधन प्रकल्पाने ‘आरएल-८८’ ही सुधारीत बहुवार्षिक जात विकसित केली आहे.

लसूणघासाचे भेसळविरहीत न फुटलेले टपोरे व शुद्ध बियाणे पेरणीसाठी वापरावे. आजकाल लसूणघासाच्या बियाण्यामध्ये अमरवेल व इतर बियाण्याची भेसळ आढळते. असे असल्यास बियाणे पेरणीपूर्वी चाळून घ्यावे. घासाच्या बियापेक्षा लहान असलेले अमरवेलाचे बियाणे व इतर तणांचे बी वेगळे करता येते.

Garlic Grass
Grass Conservation : गवत संवर्धनातून वाचली शेते

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास ३० ग्रॅम रायझोबिअम जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. सर्वसाधारण एक हेक्‍टर क्षेत्रावर घासाची पेरणी करावयाची असल्यास चार लिटर पाण्यात ५०० ग्रॅम गूळ मिसळावा. हे मिश्रण उकळून थंड करावे. त्यात २५० ग्रॅम रायझोबिअम जिवाणू संवर्धक मिसळावे. हे द्रावण बारीक चाळलेल्या मातीत चांगले मिसळून घ्यावे. नंतर २५ किलो बियाण्यास हळुवारपणे चोळावे. थोडा वेळ सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी.

लागवड

लसूण घासाची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात केल्यावर अधिक फायदा होतो. पेरणीसाठी हेक्‍टरी २५ किलो बियाणे लागते. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. त्यामुळे आंतरमशागत करणे सोपे जाते.

काही शेतकरी लसूणघासाची पेरणी बी फोकून करतात. त्यामुळे बियाणे जास्त लागते. उगवण एकसारखी होत नाही. पुढे आंतरमशागत करता येत नाही. तणांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास तणासकट घासाचे रोपे मुळासकट उपटली जातात. शेतात नांगे पडतात.

खत व्यवस्थापन

पिकाच्या जोमदार वाढीसाठी हेक्‍टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेवटच्या कुळवणी अगोदर शेतात सारख्या प्रमाणात पसरावे.

पेरणीच्या वेळी हेक्‍टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.

बहुवार्षिक लसूण घासापासून भरपूर चारा उत्पादनासाठी; तसेच चार कापण्यांनंतर खुरपणी करून हेक्‍टरी १५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद किंवा १०० किलो डीएपी द्यावे.

आंतरमशागत

बहुवार्षिक असलेल्या या पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे लसूणघासाच्या प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करावी. तीन कापण्यानंतर कोळपणी करावी. त्यामुळे माती भुसभुशीत राहून जमिनीत हवा खेळती राहते. पिकाच्या मुळाजवळील खोडाच्या भागात मातीची भर लागते. पीक जोमदार वाढते.

Garlic Grass
Grass Conservation : गवत संवर्धनातून पूर नियंत्रणाकडे...

पाणी व्यवस्थापन

जमिनीचा मगदूर व हंगामानुसार वेळेवर पुरेसे पाणी देणे महत्त्वाचे आहे.

हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी, उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी व पावसाळ्यात गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास घासाची रोपे मरण्याचे प्रमाण वाढते.

कापणी

लसूणघासाची पहिली कापणी पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी जमिनीपासून ५ सें.मी. उंचीवरून धारदार विळ्याने करावी. त्यापुढील कापण्या २१ ते २५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.

उत्पादन

लसूणघासाचे सरासरी १०० ते १२० टन हिरव्या चाऱ्याचे (१० ते १२ कापण्या) उत्पादन वर्षभरात मिळते.

बियाण्याचे उत्पादन ४ ते ५ क्विंटल मिळते.

हिरवा चारा आणि बीजोत्पादन

पश्‍चिम महाराष्ट्रात मध्यम खोल जमिनीमध्ये बहुवार्षिक लसूणघास पिकापासून हिरवा चारा व बीजोत्पादनापासून अधिक आर्थिक फायदा होतो. त्यासाठी विद्यापीठाने केलेली शिफारस अशी...

लसूणघासाची पेरणी ३० सें.मी. अंतरावर ओळीत करावी.

पेरणीनंतर दीड वर्ष हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घ्यावे.

दीड वर्षानंतर मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लसूणघासाचे पहिल्या वेळी बीजोत्पादन घ्यावे.

पहिल्या बीजोत्पादनानंतर पुढील वर्षीच्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत हिरवा चाऱ्याचे उत्पादन घेऊन दुसऱ्यांदा बीजोत्पादन घ्यावे.

लसूणघासातील पोषणमूल्य :

प्रथिने१९ ते २२ टक्के , स्निग्ध पदार्थ २.३ टक्के , खनिजे १०.९९ टक्के , काष्ठमय तंतू ३०.१३ टक्के , पिष्टमय पदार्थ ३६ टक्के, कर्बोदके ६२ टक्के.

चाऱ्यात अ आणि ड जीवनसत्त्व असते.

संजय बडे, ७८८८२९७८५९

(कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com