Electricity Bill : २४ तास कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यावरून पटोलेंची फडणविसांना कोपरखळी!

राज्यात शेतकऱ्यांना खंडीत वीज पुरवठ्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय. राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस हजेरी लावत असताना दुसरीकडे मात्र उन्हाच्या चटक्यानं पिकं तहानलेली आहेत.
Nana Patole Devendra Fadanvis
Nana Patole Devendra FadanvisAgrowon
Published on
Updated on

तिसऱ्या दिवशीही गारपीटीचं सत्र सुरूच

राज्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळं शेतकऱ्यांचं हरभरा, गहू, रब्बी ज्वारी, भाजीपाला आणि फळपीक बागांचं नुकसान झालं. मंगळवारी (ता.२७) संध्याकाळी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपुर, नांदुरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक घरांवरील छत उडून गेली. तर शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. अहमदनगरमध्ये जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातही काही ठिकाणी वीजांसह पावसानं हजेरी लावली. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात वादळी पावसासोबत गारपीट झाली. नाशिक मनमाड, चांदवड तालुक्यात तर धुळ्यातील कुंडाणे गावात गारपीटीनं शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट केली. यावरुन विधानसभेत कॉँग्रेस आमदार नाना पटोले यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगितले. 

वीज पुरवठ्यावरून विधानसभेत चर्चा

राज्यात शेतकऱ्यांना खंडीत वीज पुरवठ्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय. राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस हजेरी लावत असताना दुसरीकडे मात्र उन्हाच्या चटक्यानं पिकं तहानलेली आहेत. पण राज्यात विजेचा तुटवडा असल्यानं पिकं होरपळू लागली आहेत. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण तरीही कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याची शेतकरी तक्रार करत आहेत. यावर विधानसभेत कॉँग्रेस आमदार नाना पटोले यांनी फडणवीसांचं या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. पटोले म्हणाले, "फडणवीस दिलदार मनाचे आहेत. मनात आलं तर शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून देतील." यावर उत्तर देताना फडणवीसांनी लवकरच प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं. राज्यात वीज भारनियमनामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. त्यात आता पुरवठा खंडित केला जात असल्याचं शेतकरी सांगतात. 

Nana Patole Devendra Fadanvis
Cotton Production Condition : सोयाबीन व कांदा उत्पादक शेतकऱ्याप्रमाणेच कापूस उत्पादक

शंभू सीमेवर आणखी एका शेतकऱ्याने गमवला प्राण

शंभू सीमेवरील शेतकरी आंदोलनात आणखी एका शेतकऱ्यानं आपला प्राण गमवल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे. कर्नाल सिंह असं शेतकऱ्यांचं नाव आहे. ते ६२ वर्षाचे होते. कर्नाल सिंह पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील अरनो गावाचे रहिवाशी होते. १३ फेब्रुवारी रोजी संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजूर मोर्चानं दिल्ली चलो आंदोलन पुकारलं आहे. पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमवेर हरियाणा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना रोखलेलं आहे. शुभकरण सिंग या तरुण शेतकऱ्याचा पोलिसांशी झालेल्या संघर्षात मृत्यू झाल्यानंतर गुरुवारपर्यंत म्हणजे २९ फेब्रुवारीपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. या दरम्यान दोन्ही बाजूनं म्हणजेच शेतकरी आणि पोलिसांच्या बाजूने शांतता राखण्यात आली आहे. गुरुवारपासून 'दिल्ली चलो'ची हाक देण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि अन्य शेतकरी संघटनांसोबत संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चानं एकत्र येण्याबद्दल चर्चा केली. पण संयुक्त किसान मोर्चानं 'दिल्ली चलो' आंदोलनात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे पंजाब राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप किसान मजूर मोर्चाचे सरचिटणीस श्रवण पंढेर यांनी केला.

पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी महाराष्ट्रातील यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जवळच्या भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हफ्त्याचे चार हजार रूपये आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. या दोन्ही योजनेसाठी राज्यातील ८८ लाख शेतकरी पात्र असून त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. तर पंतप्रधान नमो शेतकरी महासम्मान निधीचा सुमारे ३८०० कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना नाराज शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com