Pune News : ग्रामीण भागात स्थानिक महिलांचा कृषी पर्यटन उद्योगात देखील सहभाग हळूहळू वाढत आहे. भारतात महिला कृषी पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आणि पुणे हा महाराष्ट्र राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
पुणे विभागातून तब्बल ७६ महिला कृषी पर्यटक व्यावसायिकांची नोंद महाराष्ट्र पर्यटन विभागाकडे झाली आहे. त्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून उत्पन्नाचा नवा स्रोत व शेतीपूरक व्यवसाय म्हणून आता कृषी पर्यटनाकडे पाहिले जाते. महाराष्ट्रात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः पुणे, ठाणे, कोकण, नागपूर, सातारा या भागांत कृषी पर्यटन व्यवसाय वाढीस लागला आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात कृषी पर्यटन केंद्रे अडचणीत आली होती.
त्यानंतर पुन्हा कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर पर्यटकांनी महिलांचा सहभाग, वृक्षारोपणावर भर, स्वच्छता, सोशल मीडियाद्वारे जनजागृतीसारखे अनेक बदल केले आहे. त्यामुळे आता हा व्यवसाय उभारी घेत असून, महिलादेखील कृषी पर्यटन व्यवसायाकडे वळू लागल्या आहेत.
सध्याच्या धावपळ, धकाधकीच्या जीवनशैलीत निवांतपणा गरजेचा झाला आहे. आठवड्याची सुट्टी शहरापासून दूर निवांत ठिकाणी घालविण्यावर भर दिला जात आहे. यातूनच ग्रामीण भागातील पर्यटनास महत्त्व प्राप्त झाले आहे.
चैन म्हणून नव्हे तर गरज म्हणून आता पर्यटन केले जात आहे. यातूनच कृषी पर्यटन ही संकल्पना राज्यात उदयास आली. शहरी लोक असे पर्यटन करणे पसंत करू लागले.
महिलांना रोजगाराच्या अनेक संधी...
कृषी पर्यटन उद्योगात महिलांना देखील रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये पर्यटन केंद्रातील झाडांना पाणी देणे, झाडांची देखभाल करणे, परिसराची साफसफाई करणे, पर्यटन केंद्रात येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागताची तयारी व स्वागत करणे, स्वच्छतापूर्ण स्वयंपाक बनविणे (पुरणपोळी, मासवडी इ.),
शेणाच्या गोवऱ्या बनविणे, गोधडी शिवणे व विक्री करणे, झाडू व टोपल्या बनविणे, हस्तकलेच्या वस्तूंची विक्री करणे. ताज्या स्वच्छ भाज्या पॅकिंग करून विक्री करणे, कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग चालविणे, टोमॅटो सॉस, फळांचे पल्प, लोणची, पापड, कुरडया, मसाले, चटण्या, ठेचा, धान्य, डाळी साफ करून विक्री करणे. इ याच संकल्पनेवर कृषी पर्यटन उद्योग आधारित आहे.
कृषी पर्यटन उद्योगातील या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील स्थानिक महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन त्यांना आपल्याच गावामध्ये काम करण्याची संधी ग्रामीण कृषी पर्यटनात प्राप्त होते. त्याचबरोबर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल, असे मोरगाव येथील निसर्ग संगीत कृषी पर्यटनाच्या अध्यक्षा संगीता भापकर यांनी सांगितले.
राज्यातील कृषी पर्यटनाचे सहा विभाग असे :
कोकण विभाग : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
पुणे विभाग : पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर.
नाशिक विभाग : नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव.
छत्रपती संभाजीनगर विभाग : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड.
अमरावती विभाग : अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ.
नागपूर विभाग : नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.