
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत परभणी येथील अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्पांद्वारे करडईचे एकाहून एक सरस वाण विकसित करण्यात आले आहेत. हे वाण महाराष्ट्रासह इतर राज्यांत पोहोचले आहे. संशोधन केंद्राच्या शिफारशींमुळे एकरी उत्पादकता वाढली आहे.
रब्बी हंगामातील करडई हे महत्त्वाचे तेलबिया पीक (Oilseed Crop) आहे. अवर्षण स्थितीमध्येही उपलब्ध ओलाव्यावर करडईचे चांगले उत्पादन मिळते. देशात करडईच्या उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे. करडईच्या बियांपासून तेल तसेच फुलांपासून रंगनिर्मिती केली जाते.
मराठवाडा विभागातील जमीन आणि शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित संशोधन सुरू झाल्यानंतर बदनापूर येथील संशोधन केंद्रातर्फे ‘शारदा’ हा वाण विकसित करण्यात आला. त्यानंतर तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठात १९९३ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्पाची सुरुवात झाली. आजवर केंद्राने करडईचे ५ वाण विकसित केले आहेत. केंद्रांचे पहिले प्रभारी अधिकारी आणि पैदासकार डॉ. बी. एम. जोशी, तर दुसरे प्रभारी अधिकारी डॉ. यू. व्ही. काळे होते. डॉ. जोशी यांनी २००२ मध्ये परभणी-१२ (परभणी कुसुम) हा वाण विकसित केला. त्यानंतर २००७ मध्ये डॉ. जोशी आणि डॉ. श्यामराव घुगे यांनी परभणी ४० हा वाण विकसित केला.
मागील १५ वर्षांपासून संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी म्हणून पैदासकार डॉ. श्यामराव घुगे कार्यरत आहेत. डॉ. घुगे यांनी २०१५ मध्ये परभणी ८६ (पूर्णा) आणि २०२१ मध्ये परभणी १८४ आणि पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) हे वाण विकसित केले. डॉ. घुगे यांच्या समवेत सहायक पैदासकार डॉ. व्ही. आर. घुगे, कृषिविद्यावेत्ता डॉ. एस. ए. शिंदे, विकृतिशास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. अंबाडकर, तांत्रिक सहायक व्ही. एम. पांचाळ आणि कृषी सहायक बी. के. शिंदे हे कार्यरत आहेत. कुलगुरू डॉ. इंद्र मणी, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य सुरू आहे.
विकसित वाणांची वैशिष्ट्ये
१) परभणी - १२ (परभणी कुसुम) ः
जिरायती आणि बागायती क्षेत्रासाठी योग्य.
परिपक्वता कालावधी १३० ते १३५ दिवस.
फुलोऱ्यात येण्याचा कालावधी ८५ ते ९० दिवस.
मर रोग व मावा किडीस प्रतिकारक्षम.
खत व पाणी यांना चांगला प्रतिसाद देणारा.
तेलाचे प्रमाण २९ टक्के.
उत्पादकता (हेक्टरी) ः
अ) जिरायती क्षेत्र ः १० ते १२ क्विंटल.
ब) बागायती क्षेत्री ः २० ते २२ क्विंटल.
२) परभणी- ४० ः
निम काटेरी वाण. जिरायती, बागायती क्षेत्रासाठी योग्य.
परिपक्वता कालावधी ११८ ते १२८ दिवस.
फुलोऱ्यात येण्याचा कालावधी ७७ ते ८५ दिवस.
मर रोग व मावा किडीस सहनशील.
खत व पाणी यांना चांगला प्रतिसाद देणारा.
उत्पादकता (हेक्टरी) ः अ) जिरायती क्षेत्र ः ७ ते ८ क्विंटल
ब) बागायती ः १४ ते १५ क्विंटल.
३) परभणी- ८६ (पूर्णा) ः
जिरायती आणि बागायती क्षेत्रासाठी योग्य.
परिपक्वता कालावधी १३० ते १३२ दिवस.
फुलोऱ्यात येण्याचा कालावधी ९० ते ९३ दिवस.
मर रोग (उबळ) आणि मावा किडीस प्रतिकारक्षम.
पानांवरील ठिपके रोगास सहनशील.
तेलाचे प्रमाण ३० टक्के.
उत्पादकता (हेक्टरी) अ) जिरायती क्षेत्र ः १० ते १२ क्विटंल
ब) बागायती क्षेत्र ः १८ ते २० क्विंटल.
४) परभणी- १८४ (पीबीएनएस -१८४ ) ः
जिरायती, बागायती लागवडीस योग्य.
परिपक्वता कालावधी १२० ते १२४ दिवस.
फुलोऱ्यात येण्याचा कालावधी ७८ ते ८१ दिवस.
पानांवरील ठिपके, मर रोग आणि मावा किडीस सहनशील.
तेलाचे प्रमाण ३१.३ टक्के.
उत्पादकता (हेक्टरी) ः अ) जिरायती क्षेत्र ः १२ ते १५ क्विंटल.
ब) बागायती क्षेत्र ः १८ ते २० क्विंटल.
५) पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) ः
जिरायती तसेच बागायती क्षेत्रासाठी योग्य.
परिपक्वता कालावधी ः जिरायती क्षेत्रात १२४ ते १२६ तर बागायती १३४ ते १३६ दिवस.
फुलोऱ्यात येण्याचा कालावधी ः जिरायती क्षेत्रात ७६ तर बागायती ९० दिवस.
मर रोग आणि मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
तेलाचे प्रमाण ३०.९ टक्के.
उत्पादकता (हेक्टरी) ः अ) जिरायती क्षेत्र ः १० ते १२ क्विंटल.
ब) बागायती क्षेत्र ः १५ ते १७ क्विंटल.
राज्यासह परराज्यांत प्रसार
विकसित करडई वाणास मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्याकडून मोठी मागणी आहे. कर्नाटकातील गुलबर्गा आणि धारवाड जिल्हे, तेलंगणातील निजामाबाद आणि आदिलाबाद, आंध्र प्रदेशातील कर्नुल, तर छत्तीसगडमधील रायपूर या जिल्ह्यांमध्ये करडईचे वाण पोहोचले आहेत.
४०० एकरांवर
बीजोत्पादन कार्यक्रम
परभणी येथील संशोधन केंद्राचे प्रक्षेत्र आणि अन्य ठिकाणच्या प्रक्षेत्राच्या ४०० एकरांत दरवर्षी विविध वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो. त्याद्वारे १२०० क्विंटल बियाणे उपलब्ध होते. महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना पैदासकार आणि पायाभूत बियाणांचा पुरवठा होतो. शेतकऱ्यांना सत्यतादर्शक बियाणाचा पुरवठा होतो. मार्च २०२१ आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये करडई बीजोत्पादनावर कार्यशाळा घेण्यात आली.
तंत्रज्ञान शिफारशी..
केंद्राने आजवर एकूण १३ संशोधन शिफारशी केल्या आहेत. शिफारशींमुळे एकरी उत्पादकता वाढण्यास मदत झाली आहे.
पेरणीवेळी जिरायती क्षेत्रात हेक्टरी ६० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद देण्याची शिफारस आहे. बागायती क्षेत्रात नत्राची मात्रा २ वेळा विभागून म्हणजेच ३० किलो प्रमाणे द्यावी. त्यासोबत गंधकाची हेक्टरी ३० किलो मात्रा द्यावी.
मर, मूळकुज रोगास प्रतिबंध करण्यासाठी ट्रायकोडर्मा हर्जानियम या जैविक घटकाची प्रतिकिलो बीजप्रक्रिया १० मिलि याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
ॲझोटोबॅक्टर आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया केल्यानंतरच पेरणी करावी.
पानावरील ठिपके रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम प्रति १लिटर पाण्यात मिसळून फवारणीची शिफारस करण्यात आली आहे.
केंद्रामार्फत तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी २०१९ ते २०२१-२२ या कालवधीत २५ प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले.
संशोधन केंद्राने तेलाचे प्रमाण अधिक असलेले वाण विकसित केले आहेत. त्यामुळे केंद्रीय जैव तंत्रज्ञान विभागाने त्याअनुषंगाने अधिक संशोधनासाठी तीन वर्षांसाठी ५० लाख रुपये निधी मंजूर केला आहे. राष्ट्रीय पातळीवर ३ वाणांची तर राज्य पातळीवर २ वाणांची शिफारस करण्यात आली आहे.
- डॉ. श्यामराव घुगे ९४२१४६०१४३
(प्रभारी अधिकारी, अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
दरवर्षी ४ ते ५ एकरावर परभणी १२, परभणी ८६ या वाणांची लागवड करतो. संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पीक व्यवस्थापन केले जाते. पाण्याच्या २ ते ३ पाळ्यांत एकरी ८ ते १० क्विटंल उत्पादन मिळते.
- बाळासाहेब रेंगे ९८८१६९४५३४
(शेतकरी, जांब, जि.परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.