
राजेश कळंबटे
Papaya Farming : देवरुख (जि. रत्नागिरी) येथील सुनील निंबाळकर यांनी मुंबई येथे तीस वर्षे नोकरी केली. त्यानंतर गावी परतून भाडेतत्त्वावर दहा एकर क्षेत्र कराराने घेतले. त्यात पपईची बाग विकसित केली. जोडीला केळी घेतली. अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देत जिद्द, प्रयोगशीलता व हिमतीतून ही पिके यशस्वी करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.
मूळ कोकणात घर असलेले अनेक जण नोकरी, व्यवसायासाठी मुंबई, पुणे आदी शहरे गाठतात. कालांतराने त्यांना शेती खुणावते व मग गावी परतून ते त्यात करिअर करू लागतात. अशी अनेक उदाहरणे पाहण्यास मिळतात. सुनील निंबाळकर यांच्याबाबतही हेच घडले. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील किरबेट-साखरपा हे त्यांचे मूळ गाव. अर्थात, निवासी वास्तव्यासाठी त्यांनी देवरूख हे ठिकाण पसंत केले. मुंबईत ‘प्रिंटिंग ऑपरेटर ते प्रॉडक्शन मॅनेजर’ अशा विविध पदांवर कंपन्यांमध्ये त्यांनी सुमारे तीस वर्षे अनुभव घेतला. साधारण वयाची पन्नाशी गाठल्यानंतर त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील शहरी वातावरणापेक्षा त्यांना गावाकडची शेती अधिक जवळची वाटू लागली होती. मूळ गावी वडिलोपार्जित २८ एकर शेती आहे. त्यातील तीन एकरांत भातशेती व्हायची. मुंबईत असताना सुनील पावसाळ्यात गावी येऊन भातशेती करायचे. त्यामुळे शेतीकामांची पार्श्वभूमी होती. नोकरी सोडून सुमारे सात वर्षांपूर्वी जेव्हा ते देवरूखला परतले त्या वेळी मात्र त्यांनी दहा एकर शेती भाडेतत्त्वावर (लीज) घेण्याचे ठरविले. त्यात कोकणातील अन्य फळांपेक्षा वेगळ्या अशा पपईची निवड सर्वेक्षणातून केली. सांगली भागातील शेतकऱ्यांकडे जाऊन अधिक माहिती घेतली. सुनील ‘अॅग्रोवन’चे वाचक असल्याने त्यातूनही अधिक माहिती घेतली. ‘लीज’वर घेतलेल्या जागेत कुंपणासह सुमारे अडीच लाख रुपये खर्च केला. त्यात पपईची शेती सुरू झाली.
पपईची शेती
तैवान ७८६ या वाणाची रोपे सांगली येथून आणून सात बाय सहा फूट अंतरावर लागवड केली. एकरी सुमारे सहा हजार रोपे बसली. तणांचा त्रास होऊ नये यासाठी पॉली मल्चिंगचा वापर केला. लागवडीनंतर साधारण नऊ महिन्यांनी उत्पादनास सुरुवात होते. कोकणात पावसाचे प्रमाण प्रचंड असते. मात्र योग्य काळजी व व्यवस्थापन करून सुनील यांनी बाग चांगल्या प्रकारे सांभाळली. सातत्यपूर्ण नियोजनातून व अनुभवातून दहा एकरांतून चारशे टनांपर्यंत उत्पादन घेण्यापर्यंतचा टप्पाही गाठला. कोकणातल्या जमिनीत पपईची गोडी अधिक चांगली येत असल्याचे निरीक्षण सुनील यांनी नोंदवले आहे.
विक्री व्यवस्था
सुनील यांनी अनेक वर्षे मुंबईत काम केले असल्याने त्यांना मुंबई येथील बाजार समितींमधील व्यापाऱ्यांशी संपर्क तयार करणे कठीण गेले नाही. मुंबईसह पुणे व सांगली येथील बाजारपेठाही त्यांनी तपासल्या. पहिल्या उत्पादनाच्या वेळेस आपल्या फळांची छायाचित्रे त्यांनी व्यापाऱ्यांना पाठविली. चर्चा करून दरही निश्चित केला. हळूहळू बाजारातील दर ऑनलाइन पद्धतीने पाहून पुढील पावले उचलू लागले. अलीकडील वर्षांत त्यांच्या पपईला किलोला किमान दर सात रुपये, कमाल दर २७ रुपये, तर सरासरी दर १० ते १५ रुपयांच्या दरम्यान राहिला आहे. रमजान महिना तसेच ऑगस्ट ते जानेवारी या कालावधीत पपईला मोठी मागणी असते. हे फळ उष्ण असल्यामुळे थंडीच्या कालावधीत ग्राहकांकडून अधिक खरेदी केले जाते. या काळात दरही चांगला मिळतो. हॉटेलमध्येही सॅलेडसाठी त्याचा उपयोग होतो. सुनील यांच्या पपईची स्थानिक स्तरावर म्हणजे रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, देवरूख येथील व्यापाऱ्यांकडूनही काही प्रमाणात खरेदी होते.
संकटांशी सामना
एकच पीक सतत घेत राहिल्यास जमिनीचा पोत घसरतो आणि उत्पादनावर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी मध्यंतरीच्या काळात पपईचे पीक बदलून काही एकर पपई व काही एकर ब्रॅण्ड नैन वाणाची केळी असा फेरपालटाचा प्रयोगही केला. मात्र २०१९ मध्ये आलेल्या तौक्ते वादळाने घात केला. त्या वर्षी वादळ नसते तर एकूण सुमारे २०० टन उत्पादन हाती आले असते. ६० टन विक्री झाली होती. पण बहुसंख्य झाडे वादळात नष्ट झाली. शासनाकडून आर्थिक मदत मिळाली, पण झालेल्या खर्चाच्या तुलनेत ती अपुरी होती. जागेवरच किलोला अत्यंत कमी म्हणजे ५ ते ६ रुपये दर मिळाला. पण तरीही एवढ्या मोठ्या आपत्तीत खचून न जाता २०२१-२२ मध्ये पुन्हा पपई लागवड केली. त्यातील दोन एकरांत टप्प्याटप्प्याने कलिंगडाचे आंतरपीक घेत एकूण १८ टन उत्पादन मिळाले. उन्हाच्या माऱ्यामुळे त्याचेही नुकसान झाले. कोकणात अतिवृष्टी ठरलेलीच असते. अशावेळी पान- फुलगळीला सामोरे जावे लागते. रसायनांचा काही उपयोग होत नाही. पाऊस थांबेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. या काळात पपई सांभाळणे आव्हानाचे असते. करार संपल्यामुळे सुनील यांनी आता केवळ एक एकरच क्षेत्र ‘लीज’वर घेतले आहे. या वेळी जमिनीत खड्डे खोदून क्रमांक १५ या पपईच्या अन्य वाणाची लागवड केली आहे. लागवडीपासून ते माल बाजारात नेईपर्यंतच्या सर्व कामांमध्ये सुनील कुशल झाले आहेत. एक मजूर वर्षभर कार्यरत असतो. मजुरांवरील खर्चात बचत करण्याचा अधिक प्रयत्न असतो.
सुनील निंबाळकर ९०९६६५४९४९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.