Nanded News : जिल्ह्यात यंदा ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पाच लाख ३९ हजार ४८८ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, खरीप ज्वारी या पिकांचे नुकसान झाले. आजपर्यंत चार लाख ९८ हजार ८३१.५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे झाले आहेत.
त्याची टक्केवारी ९२ इतकी आहे. यात हदगाव, नायगाव, अर्धापूर, मुखेड, कंधार तालुक्याचे काम संथ होत आहे. तर धर्माबाद, देगलूर, माहूर, नांदेड, मुदखेड, किनवट, उमरी यात सात तालुक्यात शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यात यंदा जून तसेच जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पेरण्यांची कामे आटोपली. हा पाऊस सर्वच तालुक्यात झाला. यामुळे नांदेड जिल्ह्यात खरिपामध्ये सात लाख ६५ हजार हेक्टरवर पेरणी झाली.
पिकांची वाढही चांगली असताना सप्टेंबर महिना सुरु होताच पावसाने कहर सुरु केला. ता. एक व दोन सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होवून एक तारखेला २६ मंडलात तर दोन तारखेला तब्बल ४५ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे नांदेड, कंधार, लोहा, किनवट, माहूर, मुखेड, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, मुदखेड, नायगाव, उमरी या तालुक्यांना नुकसानीचा जबर फटका बसला.
या तालुक्यातील अनेक मंडळात एकापेक्षा अनेकवेळा अतिवृष्टीची नोंद झाली. अनेक मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस २४ तासात झाल्यामुळे जिरायती, बागायती, फळपिकांच्या नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील एक हजार २२३ गावातील सहा लाख ८९ हजार १२५ शेतकऱ्यांच्या पाच लाख ३९ हजार ४८८ हेक्टरला बसला आहे. शासकीय यंत्रणांकडून पंचनामे सुरु आहेत. हे काम अंतिम टप्यांत आल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्राने दिली. नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मदतीसाठी निधीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्राने दिली.
तालुकानिहाय पूर्ण झालेले पंचनामे (हेक्टरमध्ये, कंसातील टक्केवारी)
हदगाव ४५ हजार १८३ (७६ टक्के), नायगाव २७ हजार ७२० (७८ टक्के), मुखेड १३ हजार ९८७ (८१ टक्के), अर्धापूर २० हजार ४५२ (९० टक्के), कंधार ४८ हजार ६६६.८ (९१ टक्के), बिलोली ३२ हजार १०५.० (९३ टक्के), धर्माबाद २८ हजार ७९५ (१०० टक्के), भोकर ३७ हजार ४२६ (९५ टक्के), लोहा ५३ हजार १८६.७ (९५ टक्के), हिमायतनगर २६ हजार ८१६.० (९७ टक्के), देगलूर ३७ हजार ४६२ (१०० टक्के), माहूर २६ हजार ६२ (१०० टक्के), नांदेड १९ हजार ८४८ (१०० टक्के), मुदखेड २० हजार २६५ (१०० टक्के), किनवट ५२ हजार ७८४ (१०० टक्के), उमरी १६ हजार ८२६ (१०० टक्के) पंचनामे झाले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.