
New Delhi News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारताने सुरू केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही चालू असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी (ता. ८) सकाळी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले. त्याच्या काही तासांत संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानच्या लाहोरजवळील एअर डिफेन्स सिस्टीम (हवाई संरक्षण प्रणाली) उद्ध्वस्त केल्याचे नमूद केले आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत एअर स्ट्राईकमध्ये भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ लक्ष्य केले होते. गुरुवारी सकाळच्या कारवाईत पाकिस्तानात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या एअर डिफेन्स रडार सिस्टीमला भारतीय हवाई दलाने लक्ष्य केल्याची माहिती या निवेदनात देण्यात आली आहे. ‘‘पाकिस्तान ज्या प्रकारे कारवाई करेल, त्याच पद्धतीने भारताकडून उत्तर दिले जाईल, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. लाहोरजवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झाली आहे,’’ असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
‘‘ सात आणि आठ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानकडून उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले. त्यात अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कापुरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंडीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज या १५ शहरांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हे हल्ले करण्यात आले. इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने पाकिस्तानचे हे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. हे पाकिस्तानचेच हल्ले असल्याचे या ड्रोन व क्षेपणास्त्रांच्या अवशेषांवरून स्पष्ट होत आहे,’’ अशी माहिती या निवेदनात देण्यात आली आहे.
पंजाब, राजस्थानला सावध राहण्याचा इशारा
चंडीगड/जयपूर : ‘आॅपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या पंजाब आणि राजस्थान या राज्यांना अत्याधिक सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबची ५३२ किलोमीटर तर राजस्थानची एक हजार ७० किलोमीटर सीमा ही पाकिस्तानला लागून आहे.
पंजाबमधील पोलिस दलातील सर्व कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची सुटी रद्द करण्यात आली असून त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पंजाबमधील पाक सीमेलगतच्या सहा जिल्ह्यांतील सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे, अशी माहिती गुरुवारी सूत्रांनी दिली. राजस्थान सरकारनेदेखील राज्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करून त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
या जिल्ह्यातील शाळांना सुटी
पंजाब : फिरोजपूर, पठाणकोट, फाझिल्का, अमृतसर, गुरदासपूर आणि तरन-तारन
राजस्थान : श्री गंगानगर, बिकानेर, जैसलमेर आणि बारमेर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.