
Bikaner News: ‘‘सिंदूर’ची गन पावडर झाल्यावर काय घडते, हे देशाच्या शत्रूने पाहिले आहे. भारताच्या सुरक्षा दलांनी असा सापळा निर्माण केला की पाकिस्तानला गुडघे टेकविण्याशिवाय पर्यायच राहिला नाही,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या पहिल्याच भाषणात त्यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानातील बिकानेरमधील पलाना येथे ते बोलत होते. भारताने अवघ्या २२ मिनिटांत पाकमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, असेही त्यांनी सांगितले.
मोदी म्हणाले, की जेव्हा ‘सिंदूर’चे रुपांतर ‘बारूद’ मध्ये (गन पावडर) होते, तेव्हा काय घडते, हे देशाच्या शत्रूने पाहिले. आता तर माझ्या नसांत रक्त नव्हे तर सिंदूर वाहत आहे. पाकिस्तानला प्रत्येक दहशतवादी हल्ल्यासाठी जबर किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. पहलगाम हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने दिलेले प्रत्युत्तर हा सूडाचा खेळ नव्हता तर नव्या प्रकारचा न्याय होता.
केवळ संताप नव्हता तर सक्षम भारताचे हे नवे रूप होते. हा नवभारत आहे. आता पाकिस्तानबरोबर कोणताही व्यापार होणार नाही. चर्चा झालीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरबद्दल (पीओके) होईल.
अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही. यापुढे देशात आणखी दहशतवादी हल्ला झालाच तर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, त्यावेळी आमच्या लष्कराकडून वेळ आणि पद्धत ठरविण्यात येईल. दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना वेगळे पाहिले जाणार नाही, आम्ही त्यांना एकच समजू, असा स्पष्ट इशाराही पंतप्रधानांनी दिला.
‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल सशस्त्र दलांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, ‘‘आमच्या सरकारने सशस्त्र दलांना पूर्ण मोकळीक दिली. त्यानंतर त्यांनी असा सापळा रचला की पाकिस्तानला गुडघे टेकावेच लागले. पाकिस्तानने बिकानेरमधील नाल हवाई तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाकच्या हल्ल्यात काहीही नुकसान झाले नाही. याउलट भारताच्या हल्ल्यात पाकचा रहिमयार खान हवाई तळ उद्ध्वस्त झाला. भारताविरुद्धच्या थेट युद्धात पाकिस्तान कधीही विजय मिळवू शकला नाही. पाकचा पुन्हा पुन्हा पराभवच झाला. त्यामुळे, भारताविरुद्धच्या लढ्यात पाकिस्तान दहशतवादाचा शस्त्रासारखा वापर करीत आहे.’’
२०१९ मधील बालाकोटच्या हल्ल्यानंतर केलेल्या भाषणाचे स्मरणही मोदींनी केले. ‘या देशाच्या मातीची शपथ. मी देशाला झुकू देणार नाही, मिटू देणार नाही,’ या प्रतिज्ञेचा पुनरुच्चारही मोदींनी केला.
पूर्वी भारत दहशतवाद्यांच्या घरात घुसून हल्ले करत असे, मात्र आता थेट त्यांच्या छातीवरच वार केला जात आहे, असे ही २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक व बालाकोट हल्ल्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले.पाकिस्तान पूर्वी भारतात दहशत पसरवित असे. मात्र, भारतमातेचे सेवक, मोदी आता या ठिकाणी उभे असून मोदींचे मन शांत मात्र रक्त गरम आहे, असेही त्यांनी ठणकावले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.