Agriculture Technology : भातकापणी तंत्र, त्यातील यांत्रिकीकरण

Paddy Harvesting : सध्या मजूरटंचाईमुळे या पिकाच्या कापणीची पारंपारिक कापणी पद्धत मागे पडत आहे. त्यासाठी सुधारित अवजारांचा उपयोग होताना दिसून येत आहे.
Paddy Harvesting
Paddy HarvestingAgrowon
Published on
Updated on

डॉ. उषा डोंगरवार, योगेश महल्ले, लयंत अनित्य

Paddy Farming : भात हे पूर्व विदर्भातील प्रमुख तृणधान्य पीक आहे. सध्या मजूरटंचाईमुळे या पिकाच्या कापणीची पारंपारिक कापणी पद्धत मागे पडत आहे. त्यासाठी सुधारित अवजारांचा उपयोग होताना दिसून येत आहे. भाताची काढणी करताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी त्याची परिपक्वता लक्षात घ्यावी लागते.

कारण या परिपक्वतेचा सरळ संबंध पिकाच्या उत्पादनाशी आहे. पीक अपरिपक्व परिस्थितीत कापले गेल्यास त्याच्या उत्पादनात घट येते व कमी दर्जाची प्रत मिळते. भात निसवल्यांनतर त्याची लोंबीवरून खाली भरत येते. निसवणीनंतर २५ ते ३० दिवसांनी कापणी करून त्या लोंबीमधील ९० टक्क्यांच्या वर लोंबी परिपक्व होऊन वाळल्यानंतर कापणी करावी.

बियाणे म्हणून वापर करताना

जर शेतकऱ्याला त्याच्याच शेतातील भात बियाणे म्हणून वापरायचे असल्यास चांगल्या प्रकारे वाढ झालेल्या बांधीतील भेसळ काढून टाकावी. रोग- कीडमुक्त बांधी बियाण्यासाठी निवडावी. त्या बांधीतील भात १०० टक्के परिपक्व झाल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी कापणी करावी. वाळल्यानंतर बांधणी करावी त्यानंतर मळणी करून ते बियाण्यासाठी वेगळे ठेवावे.

परिपक्वतेची लक्षणे

भाताची पाने पिवळी पडतात व संपूर्ण पीक पिवळे दिसते. साधारणतः पीक ५० टक्के फुलोरा अवस्थेत आल्यानंतर ३० ते ३२ दिवसांनी पीक कापणीस तयार होते. कापणीवेळी लोंबीचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे. लोंबीमध्ये हिरव्या दाण्यांचे प्रमाण ४ ते ९ टक्क्यांपेक्षा जास्त राहणार नाहीत.

दाण्यांतील ओलाव्याचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी कापणी नंतर लगेच मळणी न करता ३ ते ४ दिवस भाताच्या कळपा शेतात पसरवून ठेवाव्यात. दाण्यांतील आणि तणसातील ओलाव्याचे प्रमाण १२ ते १३ टक्के आल्यानंतर कापणी करून ठेवलेले पीक गोळा करावे. त्याचे छोटे भारे बांधून गंजी करावी किंवा मळणी करावी.

Paddy Harvesting
Agriculture Technology : भातकापणी यंत्र ठरले शेतकऱ्यांसाठी वरदान

कापणीची उंची व फायदे

कापणी जमिनी लगत करावी. जेणेकरून खोडकिडासारख्या किडींचा व अन्य रोगांचा प्रादुर्भाव पुढील हंगामात किंवा पुढील वर्षी होणार नाही. कापणी जमिनीपासून जास्त अंतरावरून केली, तर कोषावस्थेत गेलेल्या खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. धसकटे फार मोठी असली तर रब्बी हंगामातील पिके घेताना अडचण होते.

ही धसकटे तिफणीच्या दोन फाळांमध्ये अडकतात. ती गोळा झाल्याने पेरणी खोळंबते. लांब धसकटांमुळे जमिनीवर आच्छादन तयार होते व त्यामुळे तणनाशकाचा वापर करताना ते जमिनीपर्यंत पोहोचत नाही. मात्र धसकटांचा एक फायदा असा होऊ शकतो की त्यापासून जमिनीस सेंद्रिय खत मिळते. जमिनीची सुपीकता वाढते. पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.

कापणीची पारंपारिक पद्धत

काही भागात पारंपरिक पद्धतीने विळ्याचा वापर करून स्त्री मजुरांकडून कापणी केली जाते. परंतु या पद्धतीने कापणी करताना महिलांना वाकून काम करावे लागते. त्यासाठी फार शारीरिक श्रम होतात.

कापणीसाठी ८ ते १० मजुरांची प्रति एकरी गरज पडते. त्यानुसार किमान २२०० रुपये खर्च येतो.वेळही जातो. तसेच भारे बांधणे व गंजी रचणे यासाठी एकरी पंधराशे ते दोन हजार रुपये खर्च येतो. या सर्व बाबी पाहता खालील छोट्या साधनांचा उपयोग महत्त्वाचा ठरेल.

धनलक्ष्मी विळा

पारंपरिक विळ्यापेक्षा हा विळा (२०० ग्रॅम) वजनाने हलका असल्याने वापरण्यासाठी सुलभ आहे. कापणी करतेवेळी बोटांना इजा होण्याची शक्यता कमी असते. वजनाने हलका व रचना वेगळी असल्यामुळे कापणीसाठी वेळ कमी लागतो. त्यामुळे मजूरसंख्या कमी लागते. त्यांना थकवा कमी येतो. साहजिकच श्रम कमी होतात.

भाताची कापणी जमिनीलगत होते. त्यामुळे चाऱ्याच्या उपलब्धतेत वाढ होते. विळयाचा आकार दातेरी असल्याने वारंवार धार लावण्याची गरज पडत नाही. कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे धनलक्ष्मी विळा वापरून प्रथमरेषीय पीक कापणी प्रात्याक्षिके घेण्यात आली. त्यांचे निरीक्षण घेण्यात आले. या विळ्याचा वापर केल्याने भातकापणीसाठी लागणारा वेळ, मजुरीत बचत झाल्याचे आढळले आहे.

भात कापणी यंत्र (रिपर)

भातकापणी यंत्राचा वापर केला असता एक एकर शेताची कापणी एक ते दीड तासामध्ये पूर्ण होते. त्यामुळे कापणीवरील खर्च कमी होतो. तसेच एका सरळ रेषेत व पातळ विभागणी झाल्यामुळे (कळपा पडल्यामुळे) धान वाळण्यास चांगलीच मदत होते. सर्वत्र भातकापणीची वेळ जवळपास एकच असल्यामुळे बऱ्याचवेळी मजुरांचा तुटवडा तर होतोच.

तसेच मजुरीसुद्धा वाढवून द्यावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. मजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने पिकाची परिपक्वता पूर्ण होऊन त्याची गुणवत्ता घसरते. अशा मालाला भाव कमी मिळतो. म्हणून कापणी यंत्राचा वापर केल्यास उत्पादन खर्च बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकतो.

तसेच यंत्राला लागणारे इंधन ताशी दीड ते दोन लिटर लागते. हा खर्च बाकी तुलनेत कमीच आहे. हे यंत्र हाताळणीस सुलभ आहे. कार्बोरेटर व फिल्टर यांसारख्या साध्या व नियमित उपयोगातील भागांमुळे त्याचे व्यवस्थापन सुद्धा सहज शक्य आहे.

यंत्राचे बरेच भाग लोखंडी असल्यामुळे ग्रीस किंवा ऑइलचा वापर करून व्यवस्थापन करता येते. हे यंत्र महिला सहज चालवू शकतात. त्यामुळे त्याचा मोठया प्रमाणात वापर होणे गरजेचे आहे. स्त्री मजुरांचे शारीरिक श्रम यामुळे कमी होऊ शकतात.

Paddy Harvesting
Agriculture Mechanization Scheme : कृषी यांत्रिकीकरण योजनांच्या पूर्वसंमत्यांना निधीअभावी ‘ब्रेक’

‘रिपर कम बाइंडर’

या यंत्रामुळे गहू व भातासारख्या पिकाची कापणी व बांधणी ही दोन्ही कामे एकावेळी शक्य होते. ज्या पिकांची उंची ८० ते ११० सेंमी एवढी असते अशा पिकात वापर करता येतो. या यंत्राची कार्यक्षमता एक एकर प्रति तास आहे. भातकापणीसाठी एकरी इंधन (पेट्रोल वा डिझेल) प्रति तास एक ते १.२५ लिटरपर्यंत लागते. कंपनीच्या निर्मिती मॉडेलनुसार ते वेगवेगळया इंधनावर चालते.

त्याचे इंजिन १०.२ एचपी क्षमतेचे असून त्यास चार गिअर पुढे असतात. तर एक गिअर मागे असतो.. त्याच्या कटरबारची जाडी १.२२ मीटर म्हणजे जवळपास चार फुटांपर्यंत असते. भातासारखे पीक जमिनीपासून ५ सेंमी ते १५ सेंमीपर्यंत कापता येते. यंत्राचे वजन ४०० किलो आहे. परंतु चालकासाठी बैठक व्यवस्था असल्यामुळे त्याला चालवण्याचा त्रास होत नाही. जास्त ‘व्हायब्रेशन्स’ सुद्धा जाणवत नाहीत.

‘कंबाइन हार्वेस्टर’

अलीकडे ‘कंबाईन हार्वेस्टर’मुळे मळणी व काढणीची कामे सुकर झाली आहेत. हे बहुपयोगी व प्रगत असे यंत्र आहे. कापणी व मळणी अशी संपूर्ण प्रकिया या एकाच यंत्रात आहे. ते भातकापणी करण्यासाठी तसेच दाण्यांच्या सफाईसाठी उपयोगात येतो.

त्याचा वापर केल्यामुळे लागणारे मानवी श्रम कमी होतात. वेळेतही बचत होते. या यंत्राच्या मदतीने शेतीकामांमध्ये सुलभता येते. बाजारात विविध कंपन्यांचे विविध क्षमतेचे ‘हार्वेस्टर्स’ उपलब्ध आहेत.

या यंत्राचे फायदे

या यंत्रामुळे मजुरांची समस्या दूर होते. कमी वेळेत जास्त काम केले जाऊ शकते. कापणी, मळणी आणि धान्याची स्वच्छता केली जाते. हे काम कमी खर्चात पूर्ण होते. यंत्राने कापणी केल्यानंतर पिकांचे अवशेष शेतातच राहतात.

कालांतराने ते अवशेष कुजल्याने त्यांचे खतात रूपांतर होते. कापणी केलेल्या धान्याचा उपयोग बीजोत्पादनामध्ये सुद्धा होतो. नामांकित कंपनीचे ‘हार्वेस्टर्स’ एका तासात १ ते २ एकर क्षेत्रात कापणी करतात.

डॉ. उषा डोंगरवार ९४०३६१७११३

वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, साकोली

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथे कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com