Agriculture Technology : भातकापणी यंत्र ठरले शेतकऱ्यांसाठी वरदान

Paddy Harvesting Machine : पारंपरिक भात कापणीत शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांचा अभ्यास पालघर कृषी विज्ञान केंद्राने केला. त्यातून स्वयंचलित भातकापणी यंत्राचे (रिपर) तंत्रज्ञान उपलब्ध केले.
Harvesting Machine
Harvesting MachineAgrowon
Published on
Updated on

Technology of Rice Harvester (Ripper) : पालघर हा बहुतांश आदिवासी जिल्हा असून भात हे इथले प्रमुख पीक आहे. जिल्हात या पिकाची जवळपास एकाच वेळी लागवड होत असल्याने पीकही एकाच वेळी कापणीला तयार होते. अनेकवेळा हवामानातील अनिश्चितता, मजुरांचा तुटवडा व अन्य कारणांमुळे भात कापणी वेळेवर करणे शक्य होत नाही.

मजुरांचा तुटवडा जाणवल्यास शेतकरी वाढीव दराने मजुरी देऊन पीक कापून घेतात. काही ठिकाणी पीकच वाट्यावर देण्याची पद्धत आहे. परिणामी मोठी आर्थिक झळ बसते.

पारंपरिक कापणीतील समस्या

भाताची पारंपरिक कापणी मजुरांकरवी म्हणजे विळ्याने होते. यासाठी हेक्टरी ३० ते ३५ मनुष्य दिवस खर्ची पडतात. एकूण मनुष्यबळापैकी सुमारे ७० टक्के बळ कापणी, ती गोळाकरून पेंढ्या बांधण्यासाठी खर्ची पडते.

कमी मजूर उपलब्ध झाल्यास पूर्ण पिकाची कापणी होतनाही. उभे पीक पावसात सापडल्यास प्रत खराब होऊन योग्य दर मिळत नाही. कापणीस वेळ लागल्यास पुढील पिकांच्या पेरणीस उशीर होतो.

आणले यांत्रिकीकरण

पालघर येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) पारंपरिक कापणीतील सर्व समस्या लक्षात घेतल्या. त्यातून स्वयंचलित कापणी यंत्राचे (रिपर) तंत्रज्ञान उपलब्ध केले. केव्हीके प्रक्षेत्रासह शेतकऱ्यांच्या शेतावर त्याच्या २०१६- १७ पासून चाचण्या घेण्यास सुरवात केली. चढउताराचे क्षेत्र, भाताची छोटी खाचरे, वाहतुकीस अडचणीची क्षेत्रे आदींचा विचारही केला.

जिल्ह्यातील एकहजार शेतकरी व ४० ते ४५ गावांपर्यंत हे तंत्रज्ञान पोचवण्यात केव्हीके आज यशस्वी ठरली आहे. या सर्व प्रयत्नांत केव्हीकेच्या कृषी अभियांत्रिकी विषयाच्या विशेषज्ज्ञ व अभियंता अनुजा दिवटे यांनी पुढाकार घेतला. त्यांना केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले.

Harvesting Machine
Paddy Harvesting : रब्बीच्या तोंडावर भात काढणीला वेग

असे आहे ‘रिपर’ यंत्र व त्याचे तंत्रज्ञान

साडेतीन एचपी एअर कुल्ड इंजिन. पेट्रोलवर चालते. एक व्यक्ती चालवण्यास पुरेशी. पुरुषच नव्हे तर महिलाही चालवू शकतात.

यंत्राचे इंजिन, शक्ती (उर्जा) संचारण यंत्रणा, दोन चाके, कटर बार, ‘क्रॉप रो डिव्हायडर’, कन्व्हेअर बेल्ट’, ‘स्टार व्हील’, ‘ऑपरेटिंग कंट्रोल्स’ हे प्रमुख भाग.

पुढील भागात ‘रिपर’ व मागील भागात इंजिनची जोडणी. इंजिनची शक्ती संचारण यंत्रणेद्वारे कापणी करणारी यंत्रणा व चाकांना पुरविली जाते. यंत्राच्या पुढे असलेल्या १.२ मीटर लांबीचा ‘कटर बार’आहे. त्यावर असलेल्या त्रिकोणी आकाराच्या दातेरी पात्यांद्वारे कापणी पट्ट्यापट्ट्याने व जमिनीलगत केली जाते.

कापणी दरम्यान यंत्र स्टार व्हील व फिरत्या पट्ट्यांच्या मदतीने कापलेल्या पिकाची एकारांगेत उजव्या बाजूने मांडणीही करीत जाते. अशा प्रकारे सरळ पट्ट्यात अंथरलेल्या पिकाच्यापेंढ्या बांधण्याचे काम मजुरांकरवी सहज शक्य होते.

यंत्र आकाराने लहान, वजनास हलके. त्यास दोन रुंद रबरी चाके असल्याने लहान आकाराच्या, चढउताराच्या व ओल्या जमिनीतही कार्य करू शकते.

‘रिपर’ चे फायदे

ओळीत लागवड असलेल्या किंवा नसलेल्या अशा दोन्ही पिकांची कापणी सहज करता येते.

शेताचे सलग वा तुकड्यांतील क्षेत्र, चढउतार व चालकाचे कौशल्य यानुसार एका दिवसात दोन एकरांपासून चार एकरांपर्यंत कापणी शक्य होऊ शकते. एकरी दीड ते दोन लिटर पेट्रोल लागते. 

यंत्राच्या वापरामुळे कापणी खर्चात ६० ते ७० टक्के तर वेळ व श्रमात ५० ते ६० टक्के बचत होते.

भाडेतत्त्वावर गावपातळीवर यंत्र उपलब्ध केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

तंत्रज्ञान प्रसार

कोसबाड केव्हीकेने या स्वयंचलित भात कापणी यंत्र चालवण्यासह देखभाल- दुरुस्ती प्रशिक्षणही शेतकऱ्यांना दिले आहे. कृषी विभाग- आत्मा, पालघर, दीपक फाउंडेशन, मोखाडा, ‘आरोहन’,जव्हार, वाडिया फाउंडेशन आदी संस्थांची त्यासाठी मदत घेतली.

आत्तापर्यंत आयोजित प्रशिक्षण

प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षण संख्या शेतकरी गावे

केव्हीके प्रक्षेत्र १९ ६७९ २८

गावपातळीवर १५ ३५० १६

एकूण ३४ १०२९ ४४

सर्वांच्या प्रयत्नांतून जिल्हात रिपरच्या वाढत्या वापराचे चित्र दिसू लागले आहे. कृषी विभाग तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदान मिळाल्याने गटस्तरावर काही शेतकऱ्यांना हे यंत्र घेणे शक्य झाले. भाडेतत्त्वावरही ते देण्यात येत आहे.  

पालघर जिल्ह्यात तालुकानिहाय रिपरची संख्या

डहाणू, पालघर प्रत्येकी २२ वाडा - ३८ विक्रमगड -१५ तलासरी ५

जव्हार १२ वसई ३ मोखाडा ११

Harvesting Machine
Paddy Harvesting Implements : भात कापणी, काढणीपश्‍चात कामांसाठी यंत्रे

भात उत्पादकांचे अनुभव

यंत्राच्या वापरामुळे भात कापणी लवकर होत असून वेळ, पैसा आणि श्रमामध्ये बचत होत असल्याचा अनुभव मला आला आहे. गावपातळीवर भाडेतत्वावर यंत्र दिल्याने त्यातूनही तीस ते ३५ हजार रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे.
गंगाराम मौळे, ब्राम्हणगाव, ता. मोखाडा
आमच्या बळीराजा सेंद्रिय शेतकरी गटाने २०२१ मध्ये हे यंत्र खरेदी केले. सुरवातीला आमच्याच गावात ते भाडेतत्वावर देण्यास सुरवात केली. आता यंत्राद्वारे आजूबाजूच्या १२ गावांमध्ये भात कापणी करून देणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांकडून त्यास चांगला प्रतिसाद आहे. दरवर्षी या उपक्रमातून गटाला ७० हजार ते ९० हजार रुपयांचा फायदा होत आहे.
कोंडू पस्टे, अध्यक्ष, बळीराजा सेंद्रिय शेतकरी गट, निचोळे ता. वाडा
मजूरटंचाई आणि अनियमित पाऊस यामुळे हाताशी आलेला भात लवकर घरी किंवा खळ्यात पोचविण्याच्या दृष्टीने हे यंत्र शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे. कारण कापणी सहज आणि लवकर होतहोते. भातशेतीतील अन्य कामे लवकर उरकतात. परिणामी भातमोड कमी होते व पदरी आख्खा तांदूळ मिळतो.
भालचंद्र गणपत पाटील, चहाडे, ता. पालघर
भाडेतत्वावर यंत्र घेऊन भात कापणी चार वर्षांपासून करीत आहे. त्यातून खर्चात ४० टक्के बचत झाली आहे. मजुरांवर अवलंबून राहावं लागत नाही. वेळ वाचतो. दुसऱ्या पिकाची लागवड वेळेवर करता येते.
विजय वाघात, रामपूर, ता. डहाणू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com