Chandrapur News : मागील वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये पावसामुळे नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्याची केवायसी नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही. तालुक्यात केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २,०३२ एवढी आहे.
मागील खरीप हंगामामध्ये जुलै, ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाने तालुक्यात हजेरी लावली. नदी, नाल्याच्या काठावर असलेल्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली.
यात नदीकाठच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. याबाबत महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले. तालुक्यात पाच हजार ७६५ लाभार्थ्यांना शासनातर्फे आर्थिक लाभ मिळणार होता. गाळ साचून, जमीन खरवडणे, अति पावसामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाल्याने त्यांना हेक्टरी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.
त्या अनुषंगाने ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला थेट जमा होणार होती. यामध्ये आतापर्यंत २ हजार ५५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा झाली आहे. एक हजार ४७८ शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यावर काही दिवसांत रक्कम जमा होणार आहे.
मात्र अजूनही तब्बल २ हजार ३२ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे केवायसी नसल्यामुळे लाखो रुपयांची रक्कम ही शासनाकडे अजूनही जमा आहे. काही कालावधीनंतर ही रक्कम शासनाला जमा होण्याची शक्यता आहे. महसूल विभागाने तालुक्यातील नदीकाठच्या व नाल्या काठच्या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाकडे याबाबत माहिती सादर केलेली होती.
तांत्रिक अडचणींचा सामना
तांत्रिक अडचणीच्या नावावर तब्बल वर्षभरानंतर अजूनही शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक मदत मिळाली नाही. जेमतेम आर्थिक मदत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असताना तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. याशिवाय सामायिक खातेदारांचे संमती पत्र नसल्यामुळे ही शासनाकडून मिळणारी रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची माहिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.