Rabi Season : रब्बी हंगामासाठी कमी पाण्यात येणाऱ्या पिकामध्ये ओवा हे पीक अत्यंत फायदेशिर आहे. हे पीक किती दिवसात येत?, बियाणे कुठे मिळत?, ओव्याला मार्केट कुठे आहे? भाव काय मिळतो? आणि लागवड तंत्राविषयी कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर चे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी दिलेली माहिती पाहुया.
कमी पाण्यातही तग धरणारे आणि कीड रोगाचा फारसा प्रादुर्भाव नसलेले पीक म्हणून ओवा पिकाकडे पाहण्याची गरज आहे. कारण कमी उत्पादन खर्च आणि जास्त काळ साठवण करता येत असल्यामुळे चांगला भाव मिळवण्याची क्षमता या पिकात आहे. राजस्थान, गुजरातच्या काही भागामध्ये ओव्याची लागवड केली जाते.
पण आता आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कमी पावसाच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी ओव्याला प्रमुख पीक बनवल आहे. त्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळण्याची गरज आहे.
लागवड तंत्र
विगवेगळ्या विभागातील परिस्थितीनूसार या पिकाची पेरणी सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत करता येते. लेट खरिपासाठीही ओवा पीक उत्तम पर्याय ठरतो. फक्त बियाणे तयार होताना वातावरण कोरड आणि पाऊस नसेल अशा प्रकारे आपल्याला ओव्याची पेरणी करायची आहे. हे पीक १५० ते १६० इतक्या कमी दिवसात तयार होत. या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी वाळुयुक्त जमीन निवडा. पेरणीसाठी हेक्टरी अडीच ते तीन क्विटल बियाण लागत.
पेरणी करताना बियाणे वाळूत मिसळून पेरणी करावी लागते. पेरताना दोन ओळीतील अंतर ३० सेंटीमीटर तर रोपातील अंतर २० ते ३० सेंटीमीटर ठेवा. एकही पाणी न देता उपलब्ध ओलाव्यावर एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळत आणि जर पाणी असेल तर हेच उत्पादन वाढत जात. म्हणजे पाण्याची सोय असल्यास एकरी दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत. मावा कीड व भुरी रोग वगळता इतर कीड-रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. काढणीनंतर ओवा जास्त काळ साठवून ठेवता येतो आणि साठवणीत कीडही लागत नाही.
बियाणे कुठे मिळेल?
ओव्याच बियाण तुम्हाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मिळेल. विद्यापीठाने ओव्याच ए ए- १-१९ हे वाण महाराष्ट्रासाठी विकसीत केल आहे. याशिवाय ओव्याच्या काही गावरान जातींचीही पेरणी तुम्ही करु शकता. कारण ओव्याच्या गावराण जातींनाही मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो.
मार्केट कुठे आहे? आणि भाव काय मिळतो?
ओव्याची तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासुर स्टेशन येथील बाजारात विक्री करु शकता. शेगाव, नंदूरबार या ठिकाणीही ओव्याच मार्केट आहे. याशिवाय आपल्या भागातील आठवडे बाजारातही तुम्ही ओव्याची विक्री करु शकता.
ओव्याची जर स्वच्छता, प्रतवारी यासह आकर्षक पॅकिंग केल्यास उत्तम ब्रँड तयार होऊ शकतो. या पिकावर आधारीत एखाद्या प्रक्रिया उद्योगाची उभारणी शक्य झाल्यास जास्त दर मिळू शकेल. ओव्याला प्रतवारीनूसार क्विंटल ला १० ते १२ हजार रुपये भाव मिळतो.
बेकरी इंडस्ट्री, वाइन इंडस्ट्री, मसाला उद्योग आणि आयुर्वेदिक क्षेत्रात भारतात आणि भारताबाहेर ओव्याला मागणी वाढतेय. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामासाठी ओवा पिकाचा नक्की विचार करा.
माहिती आणि संशोधन - डॉ. किशोर झाडे कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.