Krishna Flood Diversion Project : ‘कृष्णा फ्लड डायव्हर्जन’ प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे आदेश
Krishna Flood Diversion Project Survey : सोलापूर ः कृष्णा आणि भीमा खोऱ्यांतील पाण्याचा योग्य समतोल साधण्यासाठी कृष्णा नदीच्या पुराचे ५० टीएमसी पाणी ‘कृष्णा फ्लड डायव्हर्जन’ योजनेतून बोगद्याद्वारे वळवून उपखोऱ्यातील दुष्काळी भागास देण्याच्या कामाचे सर्वेक्षण करण्यास आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
कृष्णा फ्लड डायव्हर्जन योजनेच्या कामाच्या सर्वेक्षणाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेकरिता शासनास सादर करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आशियाई विकास बँकेच्या प्रतिनिधींनी नुकतीच पाहणीही केली असून, या प्रकल्पास अर्थसाह्य करण्याविषयी सकारात्मकता दर्शवली आहे.
या प्रकल्पासाठी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष पाठपुरावा केला. यापूर्वी गेल्यावर्षी ७ नोव्हेंबर २०२२ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कायमस्वरुपी पूर नियंत्रण आणि हे पाणी वळवण्याच्या योजनेबाबत सादरीकरण झाले होते.
त्यानंतर आशियायी बँकेकडून अर्थसाह्य मिळवण्याबाबतही अंतिम चर्चा पूर्ण झाली होती. याबाबत प्राथमिक अहवाल करण्याचे ठरवून अलीकडेच यासंबंधीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार आता स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या कामाच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.
प्रकल्पाचा फायदा
कृष्णा नदीतील अतिरिक्त पुराचे पाणी या योजनेद्वारे वळवता येणार आहे. परिणामी पुरामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळता येणार आहे. मुख्यतः भीमा उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी दुष्काळी सोलापुरातील माळशिरस, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, साताऱ्यातील खंडाळा, फलटण, माण, सांगलीतील जत, आटपाटी, खानापूर, कवठेमहांकाळ, आष्टा, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, परंडा, भूम, कळंब, पुण्यातील बारामती, इंदापूर या भागांतील २६ तालुक्यांना देता येईल का, याची चाचपणी या सर्वेक्षणाद्वारे होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.