Orchard Management : पाणी कमतरतेमध्ये फळबागेचे व्यवस्थापन

Orchard Farming : पावसाळा सुरू होईपर्यंत फळबागा जपून, त्यातून बऱ्यापैकी उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. या स्थितीमध्ये फळबागेचे व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती घेऊ.
Orchard Management
Orchard ManagementAgrowon

डॉ. एस. बी. पवार

अल्प मुदतीकरिता करावयाच्या उपाययोजना

आच्छादनाचा वापर

Fruit Crop Management : जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन आणि झाडावरील पानांमधून होणारे बाष्पोत्सर्जन या क्रियेमुळे बागेतील पाणी झपाट्याने कमी होते. या दोन्ही क्रियांना प्रतिबंध करण्यासाठी पॉलिथिन फिल्म किंवा सेंद्रिय पदार्थांच्या आच्छादनाचा वापर करावा. त्यामुळे जमिनीतील ओलावा राखला जातो.

आपल्या आर्थिक क्षमतेनुसार ८० ते १०० मायक्रॉन जाडीची फिल्म किंवा शेतातील पिकांच्या अवशेषांचे सेंद्रिय आच्छादने शेतकऱ्यांना वापरता येते. वाळलेले गवत, लाकडी भुस्सा, उसाचे पाचट, पालापाचोळा, गव्हाचे किंवा भाताचे काड, गिरिपुष्प फळझाडांच्या फांद्या यांचा ड्रीपखाली ४ ते ६ इंच जाडीचा थर द्यावा.

त्या ठिकाणी पसरलेल्या तंतुमय मुळ्या ओलाव्यामुळे कार्यरत राहतात. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सेंद्रिय आच्छादन करण्यापूर्वी म्हणून कीडनाशकांची भुकटी धुरळावी.

मडका सिंचन

फळ झाडांसाठी मडका सिंचनाचा वापर कमी खर्चिक राहू शकतो. कमी वयाच्या लहान फळझाडासाठी ५-६ लिटर क्षमतेचे, तर मोठ्या झाडांसाठी १५ लिटर क्षमतेचे मडके निवडावे. त्याच्या तळाशी लहानसे छिद्र पाडून, त्यात सुती कापडाची वात बसवून घ्यावी.

मडक्याचे तोंड जमिनीवर राहील असे झाडाच्या बुंध्याजवळ पुरावे. ते पाण्याने भरून मडक्याच्या तोंडावर झाकण ठेवावे. मडक्याच्या सच्छिद्र रचनेमुळे ते पाझरते. त्यातील पाणी हळूहळू पसरून जमिनीत ओलावा तयार होतो. त्यामुळे झाडांच्या मुळांना सतत व संथपणे पाणी उपलब्ध होऊ शकते. मडके रिकामे झाल्यानंतर पुन्हा भरावे.

काळजी

मडके ‍सच्छिद्र असावे.

आंतरमशागत करताना किंवा जनावरांकडून मडके फुटणार नाही याची काळजी घ्यावी.

जलशक्तीचा वापर

५ ते १० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखत किंवा गांडूळ खतासोबत मिसळून ३० ते ५० ग्राम जलशक्ती (हायड्रोजेल) वापरल्यास प्रति झाड वापरल्यास झाडांना दिलेले पाणी जास्त दिवस मुळांजवळ राहण्यास मदत होते. जिथून पाणी दिले जाते, त्या चरामध्ये हायड्रोजेल वापरता येते. या जलशक्तीमध्ये त्याच्या वजनाच्या १०० पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते.

काळजी

शक्य झाल्यास योग्य त्या प्रमाणात जलशक्ती पावडर मुळांजवळच द्यावी.

सतत जलशक्तीचा वापर करू नये.

सलाइन बाटल्यांचा वापर

ठिबक सिंचनासारखे थोडेथोडे पाणी कार्यक्षमतेने वापरण्यासाठी आणि अगदी थेट झाडाच्या मुळांजवळ देण्यासाठी सलाइनच्या बाटल्या वापरता येतात. पाणी पडण्याचा वेग सलाइनमधील बटनाद्वारे कमी जास्त करता येतो. पाणी भरलेली बाटली झाडाच्या फांदीला बांधून, तिची नळी मुळाजवळ जमिनीवरील थरात ठेवावी.

काळजी

वेळोवेळी पाणी मुळांजवळ पडते किंवा नाही याची तपासणी करावी.

कचरायुक्त, गढूळ पाणी सलाइन बाटलीमध्ये वापरू नये.

Orchard Management
Jain Irrigation : जैन इरिगेशनला ४४.९ कोटी रुपयांचा नफा

खोडास बोर्डो पेस्ट लावणे

उन्हाळ्याच्या दिवसातही पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या काळात मोसंबी खोडास बोर्डो पेस्ट (१ किलो मोरचूद, १ किलो कळीचा चुना, १० लिटर पाणी) लावणे फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे खोडाचे उष्णतेपासून संरक्षण होईल.

व्यवस्थापन

खोडास बोर्डो पेस्ट लावताना स्वच्छ ब्रशचा वापर करावा.

बोर्डो पेस्टची शक्ती मिश्रणाच्या तीव्रता व सामूवर अवलंबून असते. योग्य त्या प्रमाणातच घटकद्रव्यांचा वापर करावा.

तयार मिश्रणात निळा लिटमस पेपर अथवा लोखंडी खिळा वा चाकू बुडविला असता त्यावर तांबट थर दिसणार नाही, याची काळजी घ्यावी.

तांबट थर दिसल्यास मिश्रणात मोरचूदाचे प्रमाण जास्त असते, त्यात चुन्याचे द्रावण ओतावे.

बोर्डो पेस्ट प्लॅस्टिक किंवा मातीच्या भांड्यातच स्वतंत्रपणे तयार करावी. (लोखंडी बादली वापरू नये.)

झाडाचा पानोळा/फळ संख्या कमी करणे

झाडाच्या पानावरील पर्णरंध्रामधून पाणी बाहेर टाकले जात असते. झाडांची हलकी छाटणी करून पानांची व फळांची संख्या कमी करावी. मोसंबीवरील पानसोट काढून टाकावेत.

त्यामुळे झाड सशक्त राहते. पाण्याची फारच कमी उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांना फळसंख्या मर्यादित ठेवावी.

काळजी

हलकी छाटणी करण्यासाठी अथवा पानोळा कमी करण्यासाठी तीक्ष्ण वा धारदार सिकेटरचा/कात्रीचा वापर करावा.

छाटणी करताना फांदी पिचणार नाही, याची काळजी घ्यावी.

मर्यादेपेक्षा जास्त पानोळा छाटणी करू नये, अन्यथा झाडावर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रत्येक छाटणी केलेले ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी.

बाष्परोधकाचा वापर

पानाच्या पर्णरंध्रातून होणारे पाण्याचे उत्सर्जन नियंत्रण करण्यासाठी व प्रकाश संश्‍लेषणाचा वेग योग्य तो राखण्यासाठी ६ ते ८ टक्के केओलीन या बाष्परोधकाची ६०० ते ८०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने १ ते २ वेळा फवारणी करावी.

काळजी

बाष्परोधक दोन किंवा तीन फवारण्यांपेक्षा जास्त फवारणी करू नये.

खोडास गवत/बारदाना बांधणे

पाण्याचे दुर्भिक्ष आणि प्रखर सूर्यप्रकाश खोडावर पडत असल्यामुळे खोडास इजा पोहोचू शकते. काही वेळा खोड तडकण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यासाठी गवत अथवा बारदाना सुतळीच्या साह्याने खोडाच्या संपूर्ण भागावर घट्टपणे बांधावा.

काळजी

फळबागेमध्ये विडी, सिगारेट पिऊ नये.

शेतात गवताच्या गंजीस, पाचटास आग लावू नये.

गवत बांधण्यापूर्वी खोडावर कीडनाशकाची भुकटी टाकावी.

गवत/बारदान घट्ट बांधावा, त्यामुळे वाऱ्याने उडून जाणार नाही.

कलमी/रोपावर शेडनेटची सावली करणे

रोपावर शेडनेटची सावली करावी. योग्य सावली टक्केवारीच्या शेडनेटमध्ये रोपांच्या उत्सर्जनाचा दर कमी राहतो. रोपे कमी पाण्यावर जगविता येतात.

काळजी

शेडनेट फाटलेली नसावी. शक्य असल्यास शेडनेटखाली फॉगर्सचा वापर करावा. त्यामुळे तापमान व आर्द्रताही नियंत्रणात ठेवता येते.

- डॉ. एस. बी. पवार, ९४२२१७८९८२

(सहयोगी संचालक संशोधन आणि विस्तार कृषी विद्यावेत्ता, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर)

दीर्घ मुदतीकरिता करावयाच्या उपाययोजना

ठिबक सिंचनाचा वापर

उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. आवश्यक तेवढी पाण्याची मात्रा झाडाच्या थेट सूक्ष्म मुळांशीच पुरविली जाते. ठिबक सिंचनाद्वारे खतांचेही योग्य नियोजन करता येत असल्याने फळांचे दर्जेदार उत्पादन मिळवणे शक्य होते. त्यासाठी पुढील प्रकारे काळजी घ्यावी.

वेळोवेळी ड्रीपरची तपासणी करावी. दररोज ठिबक चालविण्याची गरज नाही.

वाफसा स्थिती आल्यावरच ठिबकसंच सुरू करावा. ठिबक संचामध्ये क्षारयुक्त पाणी वापरू नये.

Orchard Management
Agriculture Technology : कोरडवाहू शेतीसाठी शून्य मशागत तंत्रज्ञान

मोसंबी व्यवस्थापन

पाण्याची फारच कमतरता असल्यास पुढील आंबे बहर घेऊ नये. बाग स्वच्छ़ ठेवून हलकीशी मशागत करावी. ठिबक संचाद्वारे प्रत्येक दिवशी १० ते २० लिटर पाणी द्यावे.

मृग बहर असेल तर प्रत्येक दिवशी डिसेंबरपर्यंत ३० लिटर पाणी द्यावे. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये ४० लिटर पाणी द्यावे. एप्रिल- मेमध्ये बाष्परोधकाची (केओलीन) ८ टक्के तीव्रतेची फवारणी करावी.

आच्छादनासाठी प्लॅस्टिकचा वापर केल्यास प्रति दिवशी १० लिटर पाणी एप्रिल- मे महिन्यामध्ये मिळाले तरी झाडे तग धरू शकतील.

ठिबकद्वारे पाणी नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी वरील सर्व बाबीचा एकत्रित अवलंब केल्यास मोसंबीच्या बागा वाचविण्यास मदत होईल.

ठिबक सिंचन संच नसलेल्या शेतातील उपाययोजना

ज्या शेतकऱ्यांनी ठिबक संच बसविलेला नाही, त्यांनी पुढील उपाययोजनांवर भर द्यावा.

एक ते तीन वर्षांच्या फळझाडांच्या ओळीजवळ ४५ सेमी रुंदीची सरी तयार करावी. या सरीतून सिंचनाचे पाणी सोडावे. या सरीत व आळ्यात २.५ ते ५ सें.मी. जाड थर वाळलेल्या गवताचा किंवा धान्याचे तणिसाचा किंवा वाळलेल्या पानांचा थर (आच्छादन) पसरावा.

फळझाडांचे वय ४ ते ६ वर्षे असल्यास झाडांचे ओळीच्या दोन्ही बाजूंना खोडापासून १.२५ मीटर रुंद दोन सऱ्या काढाव्यात आणि या सऱ्यातून पाणी द्यावे. विरळ आच्छादनाने सऱ्या झाकाव्यात. बाष्परोधकांची आठ टक्के तीव्रतेची फवारणी करावी.

फळझाडांचे वय सात वर्षांपेक्षा अधिक असल्यास झाडाच्या दोन ओळींमध्ये १ मीटर रुंदीच्या ४ सऱ्या काढाव्यात. प्रत्येक सरीतून आलटून पालटून पाणी द्यावे. या सऱ्यामध्ये आच्छादन पसरणे आवश्यक असते.

नवीन लावलेल्या कलमाभोवती खुरप्याने किंवा कुशाने २० ते ३० सेंमी खोलीचे खळगे करावे. या खळग्यात चार किंवा पाच दिवसांच्या अंतराने हाताने पाणी भरावे. हे खळगे तणिसाने झाकावे.

ज्या शेतकऱ्याकडे उन्हाळ्यात (म्हणजे एप्रिल - मे या कालावधीत) किमान ५० ते ६० लिटर पाणी प्रतिदिन असेल अशाच शेतकऱ्यांनी आंबे बहर घ्यावा. अन्यथा आंबे बहर घेऊ नये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com