
विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Amravati News : अमरावती ः बांगलादेशकडून आयात शुल्कात झालेली वाढ, वाढता उत्पादकता खर्च आणि तुलनेत मिळणारा कमी दर यामुळे संत्रा बागायतदार मेटाकुटीस आले आहेत.
अनेक भागात त्यांच्याकडून बागा काढून टाकण्याबरोबर पर्यायी पिकांवर भर दिला जात आहे. त्यामुळे संत्रा बागा केवळ सरपणासाठीच उरल्याचे चित्र या भागात दिसत आहे.
राज्यात सुमारे दिड लाख हेक्टर, तर विदर्भात एक लाख हेक्टरवर संत्रा बागा आहेत. त्यापासून सुमारे पाच लाख टन संत्र्याचे उत्पादन होते. मात्र गेल्या काही वर्षात संत्रा बागायतदार कमी दरामुळे जेरीस आले आहेत. उत्पादकता खर्चाची भरपाई होत नाही तर दुसरीकडे कीडरोगांमुळे बागा अधिक प्रमाणात बळी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अनेकदा बागांना देण्यासाठी पाणी नसल्याने बागा जागविण्यासाठी टॅंकरचा आधार घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यावरही शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो.
यामुळे संत्रापट्ट्यात नैराश्य निर्माण झाले आहे. त्यातच यंदाच्या हंगामापासून एकमेव आयातदार असलेल्या बांगलादेशने आयात शुल्कात मोठी वाढ केली. त्याचा परिणाम आपसूकच दरावर झाला. दर गडगडल्याने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये आणखी भर पडली.
त्यामुळे संत्रापट्ट्यात बागायतदार संत्रा बागा काढून टाकत आहेत. पर्यायी पिकांचा विचार त्यांच्यामधून होत आहे. पथ्रोट परिसरातही अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या. त्यामुळे विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याखालील क्षेत्र सातत्याने कमी होत असल्यामुळे चिंता वाढली आहे.
त्या पार्श्वभूमीवर संत्रा बागायतदारांना फळ तोडणीसाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अनुदान मिळावे, अशी मागणी होत आहे. एकरी ३० ते ३५ हजार रुपयांचे अनुदान याकरिता असावे, अशी देखील मागणी आहे. मात्र सरकार संत्रा उत्पादकांबाबत गंभीर नसल्याने गेल्या अनेक वर्षात संत्रा उत्पादकांच्या समस्यांची दखलच घेण्यात आली नाही, असा आरोप आहे.
आयात शुल्कात वाढ परिणामी निर्यात ठप्प. दुसरीकडे वाढता उत्पादकता खर्च, कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. संत्रापट्ट्यात बागा काढल्या जात असल्याने क्षेत्र सातत्याने कमी होत आहे. त्याची दखल घेत मनरेगातून जॉबकार्डाची अट न लावता एकरी ३० ते ३५ हजार रुपये अनुदान मिळावे, अशी शासनाकडे मागणी आहे.
- श्रीधर ठाकरे,
कार्यकारी संचालक, महाऑरेंज.
ः
नफा कमविण्याच्या उद्देशाने दर्जाहीन खुंटांवर रोपांची बांधणी होते. त्यामुळे त्यापासून उत्पादन मिळत नाही. मात्र अशा रोपांचे पाच वर्षे संगोपन करावे लागते. त्याच्या व्यवस्थापनावर मोठा खर्च होतो आणि शेवटी उत्पादकता मिळत नाही.
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मी गेल्या वर्षी तीन एकरांवरील संत्रा बाग काढून टाकली. कमी दरामुळे अनेक शेतकरी बागा काढून टाकत आहेत, शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- सतीश मोहोड,
संत्रा बागायतदार, माधान, चांदूरबाजार, अमरावती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.