प्रसन्ना खैरे, कोमल रोकडेIndian Agriculture: हवामान बदलामुळे जेथे शेती अधिक जोखमीची होत आहे, तेथे कार्बन क्रेडिट हे जोखीम कमी करणारे उत्पन्न ठरू शकते. विशेष म्हणजे, हे उत्पन्न पिकांच्या बाजारभावावर अवलंबून नसते. याशिवाय, ज्या पद्धतींमुळे कार्बन क्रेडिट मिळते, त्याच पद्धती जमिनीची सुपीकता, ओलावा धरून ठेवण्याची क्षमता आणि दीर्घकालीन उत्पादनक्षमता सुधारतात..हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीसमोरील जोखीम वाढत असताना, कार्बन क्रेडिट ही शेतकऱ्यांसाठी नवी संधी ठरत आहे. मातीतील कार्बन साठवण, शाश्वत शेती पद्धती आणि समूहाधारित प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकरी केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाही, तर अतिरिक्त व स्थिर उत्पन्नाचा मार्गही निर्माण करू शकतो..हवामान बदलाच्या चर्चेत ‘कार्बन क्रेडिट’ हा शब्द अनेकदा उद्योग, वीज प्रकल्प किंवा मोठ्या कंपन्यांपुरताच मर्यादित राहतो. मात्र गेल्या काही वर्षांत हे स्पष्ट झाले आहे. की शेती क्षेत्रातही कार्बन क्रेडिट निर्माण करण्याची मोठी क्षमता आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळू शकतो. मातीमध्ये कार्बन साठवण, झाडांची लागवड, पीक अवशेष व्यवस्थापन आणि संवर्धन शेतीसारख्या पद्धती या सर्व क्रिया केवळ पर्यावरणपूरक नाहीत, तर त्या मोजता येणाऱ्या कार्बन कमी करण्यामध्ये रूपांतरित होऊ शकतात..कार्बन क्रेडिटची मूलभूत कल्पना सोपी आहे. एखाद्या शेतकऱ्याने अशा पद्धती स्वीकारल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड कमी होतो किंवा तो माती, वनस्पतींमध्ये साठवला जातो, तर त्या अतिरिक्त कार्बन कमी होण्याचे प्रमाण वैज्ञानिक पद्धतीने मोजले जाते. ठराविक प्रमाणात (साधारणतः १ टन कार्बन ऑक्साइड समतूल्य) कार्बन घट म्हणजे एक कार्बन क्रेडिट. हे क्रेडिट्स हवामान जबाबदारी स्वीकारू इच्छिणाऱ्या कंपन्या किंवा संस्थांना विकता येतात..Carbon Credit: कार्बन क्रेडिट्समधून व्यावसायिक संधी.कार्बन क्रेडिट निर्मितीशेतकरी स्वतः कार्बन क्रेडिट काढत नाही, तर तो शेती पद्धती बदलतो. त्या बदलाचे रूपांतर क्रेडिटमध्ये होते. उदाहरणार्थ, जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणारी शेती, पीक अवशेष न जाळता जमिनीत मिसळणे, किमान नांगरणी, आंतरपीक, कृषी-वनसंवर्धन या पद्धतींमुळे मातीमध्ये कार्बन साठवण वाढते. .ही साठवण वैज्ञानिक मॉडेल्स, माती चाचण्या आणि उपग्रह/डिजिटल डेटाच्या आधारे मोजली जाते. कार्बन क्रेडिट प्रकल्प राबवणाऱ्या संस्था, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा खाजगी प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना एकत्र करतात. कारण लहान शेतांवरील कार्बन घट स्वतंत्रपणे मोजणे खर्चीक ठरते; समूह पद्धतीमुळे तो खर्च परवडतो..मोजणी, पडताळणी आणि बाजारपेठकार्बन क्रेडिटमध्ये विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असते. म्हणूनच प्रत्येक प्रकल्पात तीन टप्पे असतात :मोजणी : जमिनीतील कर्ब, पद्धतीतील बदल, कालावधीपडताळणी : स्वतंत्र तृतीय-पक्ष संस्थेकडून तपासणीनोंदणी : मान्यताप्राप्त मानकाखाली क्रेडिट नोंद.आंतरराष्ट्रीय स्तरावर Verra (VCS) आणि Gold Standard यांसारखी मानके वापरली जातात. ही प्रक्रिया कठोर असते, कारण खरेच वातावरणात कार्बन घट झाली आहे का, हे सिद्ध करणे आवश्यक असते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा भाग तांत्रिक असला, तरी योग्य संस्थेच्या माध्यमातून तो सुलभ होऊ शकतो..शेतकऱ्यांना मिळणारे प्रत्यक्ष फायदेकार्बन क्रेडिटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतीबरोबर अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत. हवामान बदलामुळे जेथे शेती अधिक जोखमीची होत आहे, तेथे कार्बन क्रेडिट हे जोखीम कमी करणारे उत्पन्न ठरू शकते. विशेष म्हणजे, हे उत्पन्न पिकांच्या बाजारभावावर अवलंबून नसते. याशिवाय, ज्या पद्धतींमुळे कार्बन क्रेडिट मिळते, त्याच पद्धती जमिनीची सुपीकता, ओलावा धरून ठेवण्याची क्षमता आणि दीर्घकालीन उत्पादनक्षमता सुधारतात. म्हणजेच आर्थिक आणि कृषी फायदे एकत्र मिळतात..Carbon Credit : ‘कार्बन क्रेडिट’च्य माध्यमातून उत्पन्नाचा नवा स्रोत मिळवावा.भारतासाठी महत्त्वभारतासारख्या देशात लाखो लहान व सीमांत शेतकरी आहेत. जर हे शेतकरी सामूहिक पद्धतीने कार्बन बाजारात सहभागी झाले, तर हवामान बदलाच्या लढ्यात भारताची भूमिका अधिक प्रभावी होऊ शकते. कृषी आणि अन्न संस्था सातत्याने सांगतात की शेती क्षेत्राशिवाय हवामान उद्दिष्टे साध्य होणे अशक्य आहे. भारतातील नैसर्गिक शेती, मृदा आरोग्य, जलसंधारण आणि कृषी-वनसंवर्धन कार्यक्रम हे अप्रत्यक्षपणे कार्बन क्रेडिटसाठी पूरक ठरू शकतात..वास्तववादी दृष्टिकोनकार्बन क्रेडिट हे झटपट श्रीमंतीचे साधन नाही. त्यासाठी वेळ, सातत्य आणि शिस्त आवश्यक असते. मातीतील कार्बन वाढ हा हळूहळू होणारा बदल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि धोरणकर्त्यांनी दोघांनीही दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक करार आणि विश्वासार्ह संस्थांच्या माध्यमातूनच हा मार्ग शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतो..कार्बन क्रेडिटमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग म्हणजे केवळ बाजारातील नवा व्यवहार नाही; तो शेती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांना जोडणारा नवा दुवा आहे. शेतकरी जर मातीमध्ये कार्बन साठवण करतो, तर तो केवळ पीक पिकवत नाही; तो हवामान बदलावर उपाय घडवतो आणि त्या उपायाची किंमत, आजच्या कार्बन बाजारात, आर्थिक स्वरूपात मिळू शकते. विश्वासार्ह प्रणाली आणि शेतकरी केंद्रित धोरणे असतील, तर भविष्यात भारतीय शेतकरी हवामान बदलाचा भार वाहणारा घटक न राहता, हवामान उपायांचा सक्रिय भाग बनू शकतो..कार्बन क्रेडिटबाबत धोरणात्मक पावलेउत्तर प्रदेश : आयआयटी- रूरकी, कार्बन क्रेडिट मॉडेलउत्तर प्रदेश सरकार आणि आयआयटी- रूरकी यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी स्वीकारलेल्या पर्यावरण अनुकूल शेती पद्धतींमुळे जमिनीत साठणारा कार्बन वैज्ञानिक पद्धतीने मोजून व पडताळून त्याचे कार्बन क्रेडिटमध्ये रूपांतर केले जात आहे. या क्रेडिटच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याची तरतूद आहे. सरकारी, शैक्षणिक सहकार्याने कृषी कार्बन बाजार उभारता येतो, याचे हे महत्त्वाचे उदाहरण आहे..ओडिशा : इक्रिसॅटच्या सहकार्याने कार्बन मार्केट उपक्रमओडिशा सरकार आणि इक्रिसॅट यांच्या संयुक्त प्रयत्नातून शाश्वत शेती, पीक अवशेष व्यवस्थापन आणि मातीतील सेंद्रिय कर्ब वाढविणाऱ्या पद्धतींवर आधारित कृषी-कार्बन मार्केटची पायाभरणी केली जात आहे. हा उपक्रम भारताच्या स्वैच्छिक कार्बन बाजार धोरणाशी सुसंगत आहे. शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा नवा मार्ग उघडतो..ग्रामीण पातळीवरील प्रायोगिक प्रकल्प : त्रिची, तमिळनाडूतमिळनाडूमधील शेतकरी संघटनांच्या पुढाकाराने मातीतील कार्बन वाढविण्यासाठी कृषिवानिकी, मृदा-संवर्धन आणि शाश्वत जमिनीचा वापर यावर आधारित प्रायोगिक प्रकल्प राबवले जात आहेत. समुदाय-नेतृत्वाखालील हे प्रयोग स्थानिक स्तरावर हवामान सहनशील शेतीचे ठोस मॉडेल उभे करत आहेत..भारताचा स्वैच्छिक कार्बन बाजारपेठकेंद्र सरकारने कृषी क्षेत्रासाठी स्वैच्छिक कार्बन बाजाराची धोरणात्मक चौकट जाहीर केली आहे. या चौकटीत मापन-अहवाल-पडताळणी प्रक्रिया, मानकीकरण आणि पारदर्शक व्यवहारावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात कृषी-आधारित कार्बन क्रेडिट्सचे अधिक संघटित व विश्वासार्ह बाजार विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..खासगी व आंतरराष्ट्रीय सहभागआंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कंपन्या भारतातील कृषी-आधारित कार्बन क्रेडीट प्रकल्पांमधून कार्बन क्रेडिट खरेदी करत आहेत, ज्याचा थेट लाभ शेतकरी व पर्यावरणाला होणार आहे.कोमल रोकडे ७४४८०९९०८८(पीएच.डी. विद्यार्थी, मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.