Bedana Market : मुंबईत सुरू होणार बेदाण्याचे खुले लिलाव

अत्याधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण वापरून टिकाऊ बेदाणा तयार करण्याचे तंत्र शेतकऱ्यांनी अवगत केले आहे.
Bedana Market
Bedana Market Agrowon

Pune News : ‘मुंबई ड्रायफ्रूटस आणि डेट्‍स मर्चंट असोसिएशन’ यांच्या वतीने वाशी- मुंबई (Mumbai APMC) येथे बेदाण्याचे खुल्या पद्धतीने लिलाव बाजार सुरू होणार आहेत. त्याचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. ९) ज्येष्ठ राजकीय नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते होणार असल्याचे महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या (Maharashtra Grape Producer Association) वतीने कळवण्यात आले आहे.

या खुल्या लिलाव पद्धतीमुळे बेदाणा उद्योग देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वेगळी उंची गाठेल, अशी आशा संघाने व्यक्त केली आहे.

वाशी- मुंबई येथील इ- २९, एपीएमसी, मसाला मार्केट, सेक्टर १९ येथे खुल्या बाजार उद्‌घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विजय भूता, तसेच महाराष्ट्र डाळिंब आडते असोसिएशनचे सचिव नामदेवराव बजवळकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Bedana Market
Raisin Rate : बेदाणा दरात प्रति किलो २० रुपयांनी घट

सोलापूर येथील विधान परिषदेचे माजी सदस्य दीपक साळुंखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.

या वेळी राजकीय नेते गणेश नाईक, शशिकांत शिंदे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, संदीप नाईक, विक्रमसिंह सावंत, रवींद्र धंगेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, तसेच संघाचे अन्य पदाधिकारीही या वेळी उपस्थित राहणार आहेत.

विक्री व्यवस्था मजबूत होईल

राज्यातील बेदाणे उत्पादनांपैकी सांगली पट्ट्यात ८० टक्के उत्पादन होते. सुमारे ८० हजार टनांपेक्षा जास्त एकूण उत्पादन घेणारा शेतकरी स्पर्धेत ठिकण्यासाठी मानकांच्या निकषांनुसार बेदाण्याची गुणवत्ता टिकवण्यात कुशल झाला आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण वापरून टिकाऊ बेदाणा तयार करण्याचे तंत्र शेतकऱ्यांनी अवगत केले आहे. बेदाण्याची दोन ते तीन टक्केच निर्यात होते.

ती वाढविण्यासाठी व जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी वाशी येथे सुरू होणारा खुले सौदे बाजार शेतकऱ्यांसाठी मजबूत विक्री व्यवस्था तयार करून देईल, असे बागायतदार संघाचे खजिनदार सुनील पवार यांनी म्हटले आहे.

Bedana Market
Sahyadri Farms : ‘सह्याद्री’ खरेदी करणार पंढरपुरातील बेदाणा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल

सांगलीच्या बेदाण्यास भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळाले आहे. त्याद्वारे ‘ब्रॅण्डिंग’, ‘पॅकिंग’सह विक्री साखळी साखळी उभी करण्यासाठी मुंबई ही मोठी संधी आहे. मुंबईत हा बाजार सुरू होणार असल्याने अन्य राज्यांसह विविध देशांतील व्यापारीही येथे जोडले जातील.

दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई आदी प्रमुख शहरांतील व्यापारीही एका दिवसात सौदे करून पुन्हा स्वगृही परतू शकतील. विमानतळ व सागरी बंदर असल्याने युरोप व आखाती देशांना कमी कालावधीत निर्यात साधता येईल.

तसेच मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने बेदाणा उद्योग मोठा आर्थिक स्थर गाठू शकेल, अशी आशाही पवार यांनी बागायतदार संघातर्फे व्यक्त केली आहे.

व्यवहारात पारदर्शकता व सातत्य राखल्यास मुंबईचा बेदाणा व्यापार मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकेल. स्थानिक व्यापाऱ्यांनाही त्यासाठी मोठी संधी आहे. सुमारे पंधरा किलोमीटरच्या परिसरात अनेक अद्ययावत शीतगृहे असल्याने आवक वाढली तरी बेदाणे खरेदीला मर्यादा येणार नाहीत.

मुंबईत बेदाणा थेट उपलब्ध झाल्याने उपपदार्थ निर्मिती उद्योगाला चालना मिळेल. महाराष्ट्रात शेतीमाल विक्री झाल्यानंतर २४ तासांत ‘पेमेंट’ केले पाहिजे, हा पणन खात्याचा नियम आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास मुंबईतील खुला बेदाणा व्यापार वेगळी उंची गाठू शकेल,असेही बागायतदार संघाने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com