Barley Crop Spraying : केवळ फवारणीची नेमकी वेळ वाचवेल बार्ली पीक

Barley Crop : हिवाळी सातू (बार्ली) पिकामध्ये जेव्हा फ्युजारियम हेड ब्लाइट रोगाचा धोका वाढतो, त्या वेळी त्याच्या नियंत्रणासाठी नेमक्या कोणत्या वेळी बुरशीनाशकांचा वापर करायचा, या संदर्भात अधिक अभ्यास करण्यात आला.
Crops
CropsAgrowon

Barley Spraying : हिवाळी सातू (बार्ली) पिकामध्ये जेव्हा फ्युजारियम हेड ब्लाइट रोगाचा धोका वाढतो, त्या वेळी त्याच्या नियंत्रणासाठी नेमक्या कोणत्या वेळी बुरशीनाशकांचा वापर करायचा, या संदर्भात अधिक अभ्यास करण्यात आला.

बुरशीनाशकांचा वापर करण्याची वेळ ही बार्लीची ओंबी पूर्ण बाहेर पडल्यानंतर पुढील सहा दिवस आहे. या काळात फवारणी केल्यास अधिक चांगले परिणाम मिळत असल्याचा निष्कर्ष प्लॅंट डीसिज या संशोधकपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आला आहेत.

गहू किंवा बार्ली पिकामध्ये फ्युजारियम हेड ब्लाइट या रोगामध्ये बुरशी लहान दाण्यावर हल्ला करते. त्यामुळे ओंबी रंगहीन होतात. तसेच या बुरशीमुळे दाण्यामध्ये मायकोटॉक्सिन डिऑक्सिनिव्हॅलेनोल (DON) हे विषारी संयुग तयार होतो.

या संयुगाला वोमिटॉक्सिन असेही म्हणतात. बार्लीचे धान्य प्रामुख्याने बिअर आणि स्पिरीटच्या निर्मितीमध्ये वापरले जातात. अशा वेळी दाण्यामध्ये थोड्याही प्रमाणात वोमिटॉक्सिन असल्यास बार्लीच्या माल्टिंग प्रक्रियेमध्ये दाणे गळून जातात आणि मोठ्या प्रमाणात फेस तयार होतो. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव असलेले धान्य खरेदीदारांकडून नाकारले जाते. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो.

Crops
Agricultural Drone : ड्रोनद्वारे फवारणीची मार्गदर्शक तत्त्वे

या रोगाच्या नियंत्रणासंदर्भात अमेरिकी कृषी विभागाच्या वतीने कृषी संशोधन सेवा आणि मिन्निसोटा विद्यापीठातील संशोधकांनी चार वर्षे तीन वेगवेगळ्या बुरशीनाशकांच्या वापराचे व त्यांची नेमकी वेळ ठरविण्यासाठी अभ्यास केला.

ओंबीमध्ये दाणे भरण्याच्या वेगवेगळ्या वेळी - अर्धी ओंबी असताना, पूर्ण ओंबी बाहेर पडल्यानंतर आणि पूर्ण ओंबी बाहेर पडल्यानंतर सहा दिवसांनंतर बुरशीनाशकाची फवारणी केल्यानंतर असलेल्या मायकोटॉक्सिन डिऑक्सिनिव्हॅलेनोलचे प्रमाण तपासण्यात आले.

त्याविषयी माहिती देताना रेलेईघ (उत्तर कॅरोलिना) येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ ख्रिस्टिन काऊगर यांनी सांगितले, की ओंब्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये बुरशीनाशकांची फवारणी करण्यापेक्षा ओंबी पूर्णपणे बाहेर पडल्यानंतरच्या काळात केलेली फवारणी अधिक फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे.

त्यापूर्वी केलेल्या फवारणीचा फारसा परिणाम होत नाही. जर स्कॅबचा प्रादुर्भाव अधिक असतानाही शेतकऱ्यांना बार्ली ओंब्या पूर्ण बाहेर पडल्यानंतर सहा दिवसांपर्यंत संयम ठेवून त्यानंतर फवारणी केल्यास त्यातील DON चे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करणे शक्य आहे.

छोट्या बदलाने वाचेल मोठे नुकसान
फ्युजारियम हेड ब्लाइट नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी मध्यम प्रतिकारक जातींची लागवड आणि वेळेवर बुरशीनाशकाची फवारणी या दोन महत्त्वाच्या साधनांवरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. केवळ फवारणीची योग्य वेळ साधली तरी बुरशीनाशकांची परिणामकारकता वाढण्यासोबतच अनावश्यक खर्चामध्ये बचत होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टाळता येईल.

बार्लीच्या जागतिक उत्पादनामध्ये फ्युजारियम हेड ब्लाइट या रोगामुळे अनेक मर्यादा येतात. विशेषतः उत्पादनामध्ये घट आणि आर्थिक नुकसान होते. अमेरिकन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटीच्या अहवालानुसार, या रोगामुळे एकट्या अमेरिकेतून गहू आणि बार्ली शेतकऱ्यांना १९९० पासून दरवर्षी ३ अब्ज डॉलरपेक्षाही अधिक नुकसान होत असल्याचे स्पष्ट होते.

दरवर्षी वाढत चाललेल्या या रोगाच्या धोक्यामुळे गहू आणि बार्ली या या पिकातील फायदा कमी होत चालला आहे. या पिकांच्या व्यवस्थापनातील छोट्या छोट्या बदलाद्वारे रोगाचे नियंत्रण शक्य होऊ शकते, हाच या संशोधनाचे संदेश आहे.


अशाच प्रकारे विविध पिकावरील वेगवेगळ्या रोगांच्या प्रादुर्भावाच्या नेमक्या कोणत्या स्थितीमध्ये फवारणी केल्यास ती अधिक फायदेशीर ठरेल, या दिशेने अधिक संशोधन आपल्या देशातही होण्याची आवश्यकता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com